करोनाचे मृत्यू लपवले हे आरोप मी कधीही सहन करणार नाही : टोपे
महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये करोनाबाधितांची संख्या आणि करोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली होती. नव्या बाधितांचा आकडा ५० ते ६० हजार तर रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या ८०० ते ९०० पर्यंत गेल्याचं देखील काही दिवशी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर अजूनही राज्यात मृतांचे आकडे लपवले जात असल्याचे आरोप केले जात असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. “राज्यात करोनाचे मृत्यू लपवले हे आरोप मी कधीही सहन करणार नाही, ते अत्यंत खोटे आरोप आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
राजेश टोपे यांनी राज्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी देखील राज्य सरकारच्या नियोजनाची माहिती दिली.आम्ही कधीही मृत्यू लपवले नाहीत!आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्र सरकारने किंवा आरोग्य विभागाने कधीही करोनामुळे होणारे मृत्यू लपवले नसल्याचं सांगितलं. “महाराष्ट्राच्या बाबतीत मृत्यू लपवले हे आरोप कधीही सहन करणार नाही. हे अत्यंत खोटं आहे. महाविकासआघाडीने मृत्यू लपवलेले नाहीत. देशात महाराष्ट्र अॅक्टिव्ह केसेसमध्ये आणि मृतांच्या बाबतीत क्रमांक एकवर होता. ते आम्ही कधीही लपवलेलं नाही. खासगी रुग्णालयांनी तिथे झालेल्या मृतांचे आकडे वेळेवर दिले पाहिजेत. बऱ्याचदा खासगी रुग्णालयांकडून १५ दिवस आकडे उशिरा दिले जातात, हे याचं कारण असू शकतं. शिवाय, रिकन्सिलिएशनमुळे देखील मृतांची संख्या पोर्टलवर अपलोड झालेली नसेल. त्यामुळे ही संख्या कमी राहाते, पण ती लपवली असं होत नाही. एकही मृत्यू लपवला जात नाही”, असं ते म्हणाले.