शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (22:23 IST)

ओमिक्रॉन म्हणजे 'नॅचरल व्हॅक्सीन' या दाव्यात तथ्य आहे का?

ओमिक्रॅानमुळे होणारा संसर्ग सौम्य स्वरूपाचा दिसून येतोय. रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही कमी आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्याही कमी आहे.
त्यामुळे तीव्र संसर्गजन्य असूनही ओमिक्रॅान व्हेरियंट कोरोना विरोधातील लढाईत 'नॅचरल व्हॅक्सीन' असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे.
पण, ही थेअरी महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॅा शशांक जोशी खोडून काढतात. ते म्हणतात, "हा अत्यंत चुकीचा समज आहे. ओमिक्रॅाममुळे मृत्यू होतायत."
मग ओमिक्रॅानला 'नॅचरल व्हॅक्सीन' का म्हटलं जातंय? या दाव्यात तथ्य आहे का? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
ओमिक्रॅानला 'नॅचरल व्हॅक्सीन' का म्हटलं जातंय?
ओमिक्रॅानला 'नॅचरल व्हॅक्सीन' का म्हटलं जातंय यासाठी आधी आपण समजून घेऊया लस म्हणजे काय?
कोणत्याही आजाराविरोधात लस तयार करण्यासाठी अत्यंत दुबळा झालेला सूक्ष्मजीव किंवा व्हायरस घेण्यात येतो. काही लशींमध्ये मेलेला व्हायरसही लस निर्मितीसाठी वापरण्यात येतो.
तज्ज्ञ सांगतात,की माणसाच्या शरीरात गेल्यानंतर व्हायरस गंभीर आजार निर्माण करत नाही. पण रोगाविरोधात लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती तयार करतो.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपलब्ध लशींमध्ये देखील अशाच प्रकारचा व्हायरसचा वापर करण्यात आलाय.
महाराष्ट्राचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॅा. प्रदीप आवटे ओमिक्रॅानला काही जण 'नॅचरल व्हॅक्सीन' का म्हणतात, याबद्दलचे तीन महत्त्वाचे मुद्दे सोप्या शब्दात सांगतात-
 
ओमिक्रॉनमुळे गंभीर आजार होत नाहीये. मात्र याची पसरण्याची क्षमता अत्यंत तीव्र आहे.
त्यामुळे अधिक लोकांना कोरोना संसर्ग होईल, पण आजार गंभीर नसेल.
प्रत्येकाच्या शरीरात पोहोचल्यामुळे अॅन्टीबॅाडीज किंवा रोगप्रतिकारशक्ती तयार होईल
"या कारणांमुळे ओमिक्रॉन हे 'नॅचरल व्हॅक्सिनेशन' आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे," डॉ. आवटे सांगतात.
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसाठी ओमिक्रॉन व्हेरियंट कारणीभूत आहे. ओमिक्रॉनने जवळपास जीवघेण्या डेल्टा व्हेरियंटची जागा घेतलीये.
डॅा. गौतम भन्साळी मुंबईच्या खासगी रुग्णालयांचे समन्वयक आणि बॉम्बे हॅास्पिटलचे कोव्हिड रुग्णांवर उपचार जनरल फिजिशियन आहेत. त्यांच्याकडून आम्ही ओमिक्रॉन 'नॅचरल व्हॅक्सीन' आहे का, हे जाणून घेतलं.
ते म्हणाले, "ओमिक्रॅान खरंच देवाने पाठवलेली 'नॅचरल व्हॅक्सीन' आहे. संसर्ग झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. रुग्णांना लक्षण नाहीत किंवा अत्यंत कमी आहेत."
तज्ज्ञ सांगतात, की सध्याच्या परिस्थितीत ओमिक्रॅानच्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची गरज आणि व्हेंटिलेटर लागत नाहीये.
डॅा. गौतम भन्साळी पुढे म्हणाले, "डेल्टाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाची तीव्रता या लाटेत दिसत नाहीये. रुग्णांना औषधाची गरज भारत नाही. त्यामुळे उपलब्ध डेटाच्या आधारे आपण असं म्हणू शकतोय."
 
ओमिक्रॉनला 'नॅचरल व्हॅक्सीन' म्हणणं चुकीचं?
ओमिक्रॅान व्हेरियंटची लाट महाराष्ट्रात वेगाने पसरते आहे. ओमिक्रॉन नवीन आहे. डेल्टापेक्षा सौम्य असला म्हणून याकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य ठरणार नाही.
महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, "ओमिक्रॉनला 'नॅचरल व्हॅक्सीन' म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येक संसर्गाचा साईड इफेक्ट असतो. ओमिक्रॉनमुळे मृत्यू होत नाहीत असं नाही. कमी प्रमाणात पण मृत्यू झाले आहेत."
"ओमिक्रॉनबाधित रुग्णांना लाँग कोव्हिडचा त्रास होऊ शकतो. याच्या परिणामांची अजून माहिती नाहीये. ओमिक्रॉन 'नॅचरल व्हॅक्सीन' असं म्हणायला शास्त्रीय आधार नाही," डॉ. जोशी पुढे म्हणतात.
भारतात ओमिक्रॅानची लागण झालेल्या व्यक्तीचा हृदयविकाराचा झटका आल्याने पिंपरी-चिचवडमध्ये मृत्यू झाला होता.
 
काही तज्ज्ञ ओमिक्रॉनला 'नॅचरल व्हॅक्सीन' म्हणणं एक 'धोकादायक' कल्पना आहे, असं म्हणतायत.
प्रसिद्ध व्हायरोलॅाजिस्ट (विषाणुतज्ज्ञ) डॉ. शाहीद जमील यांना आम्ही ओमिक्रॉनला 'नॅचरल व्हॅक्सीन' म्हणता येईल का? याबाबत विचारलं.
ते म्हणाले, "ही एक न सिद्ध झालेली कल्पना आहे. हे अत्यंत धोकादायकही आहे. कारण अशामुळे आत्मसंतुष्टपणा (complacency) वाढेल."
कोरोना संसर्गामुळे गंभीर आजार झालेल्या रुग्णांना लाँग कोव्हिडच्या समस्येचा सामना करावा लागला होता.
डॉ. जमील पुढे म्हणाले, "कोरोनाच्या सौम्य संसर्गाचा लाँग कोव्हिडवर काय परिणाम होईल हे आपल्याला अजूनही माहित नाहीये."
तज्ज्ञ म्हणतात, भारतात अनेकांना सहव्याधी आहेत. डायबिटीस, हृदयरोग आणि इतर समस्या आहेत. अशा रुग्णांना चुकीने विषाणूला एक्स्पोज करावं, हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही.
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॅा. गिरिधर बाबू ट्विटरवर लिहितात, "अशा चुकीच्या माहितीपासून दूर रहा. ओमिक्रॅान सौम्य जरी असला तरी व्हॅक्सीन नक्कीच नाही. ओमिक्रॉनमुळे मृत्यू होतात आणि लोक रुग्णालयात दाखल होत आहेत."
ते पुढे सांगतात, "लशीच्या तुलनेत नॅचरल संसर्ग मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून रोखत नाहीत."
ओमिक्रॉन संसर्गामुळे मृत्यू होत नाही असा सल्ला देणं चुकीचं असल्याचं मत IGIB चे संचालक डॅा अनुराग अग्रवाल यांनी व्यक्त केलंय.
"ओमिक्रॉनचा प्रत्येक व्यक्तीला धोका कमी असेल पण, समाज म्हणून याचा धोका अधिक आहे. याचं कारण जास्त लोकांना संसर्ग झाला तर रुग्ण वाढतील. ही निसर्गाने निर्माण केलेली लस नाहीये," डॉ. अग्रवाल सांगतात.
 
ओमिक्रॉन कोरोनाची साथ संपवेल का?
ओमिक्रॅान व्हेरियंटने डेल्टाची जागा घेतलीये. हा सौम्य दिसून येतो. त्यामुळे तीव्रतेने पसरला तरी मृत्यू होणार नाहीत अशी तज्ज्ञांना अपेक्षा आहे.
डॉ. गौतम भन्साळी म्हणतात, "ओमिक्रॉनचे जर डेल्टाची जागा घेतली तर हे पॅन्डेमिक (साथ) नियंत्रणात येण्याची शक्यता नक्कीच आहे."
गेल्या काही दिवंसात लोकांमध्ये कोरोना संसर्गाचं गांभीर्य कमी होताना पाहायला मिळतंय. त्यामुळे लोकांनी मास्क घालावं आणि लस घ्यावी, असं तज्ज्ञ सांगतात.