शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 24 मे 2020 (17:36 IST)

लॉकडाउनमुळे टळले 78 हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू सरकारची माहिती

देशातील काही स्तरांमधून लॉकडाउनवर कितीही टीका होत असली, तरीदेखील लॉकडाउनने 14 ते 19 लाख नागरिकांना कोरोनाबाधित होण्यापासून  वाचवले आहे. तसेच लॉकडाउनमुळे 37,000 ते 78,000 कोरोनाबाधित रुग्णांचे संभाव्य  मृत्यूही टळले आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

नीती आोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतचे विश्लेषण दिले आहे. लॉकडाउन आणि विविध नियमांच्या अंलबजावणीमुळे कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला प्रसार रोखला गेला, असे डॉ. पॉल यांचे म्हणणे आहे.

भारतात 3 एप्रिल रोजी 22.6 टक्के रुग्ण आढळत होते. मात्र, एप्रिल 4 नंतर हे प्रमाण  कमी होत ते आता 5.5 टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे, असे डॉ. पॉल म्हणाले. देशात 25 मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे रुग्णांची संख्या रोखण्यात यश आले असून हा बदल स्पष्टपणे दाखवण्यासाठी काही कालावधी जावा लागला, असे डॉ. पॉल म्हणाले.

लॉकडाउनमुळे देशातील मृत्यूचे प्रमाण घटण्याबरोबरच आरोग्याची साधने आणि आवश्यक ती व्यवस्था निर्माण करण्यासाठीही सरकारला अवधि मिळाला. त्याचप्रमाणे वैद्यकीय मदत आणि कंटेनमेंट झोनमधील अनुभव तपासण्याचाही अवसर मिळू शकला. त्याचप्रमाणे आवश्यक ती औषधांचा पुरवठा आणि संशोधनासाठीही वेळ मिळाला असेही, डॉ. पॉल यांनी सांगितले.