एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित
करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केला आहे.
या संदर्भात आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोवेल करोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक 22 मार्च 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 26 एप्रिल 2020 व 10 मे 2020 रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत.
दोन्ही परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारित दिनांक आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील. तसेच परीक्षेच दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एसएमसद्वारे कळवण्यात येणार आहे.उमेदवारांनी वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळाचे अवलोकन करणे उमेदवारांसाठी हितकारक राहील असेही सांगण्यात आले आहे.