एकाचवेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊ शकतो : राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करुन 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे 9 मिनिटे एकाचवेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य आणि देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो.
संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या राज्यात, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र या सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती लावावेत असे आवाहन ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे.
ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा आणि आवश्यक तितके लाईट चालू ठेऊन, दिवे किंवा मेणबत्ती लावावी, असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.