रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (15:37 IST)

इंदुरीकर महाराजांबद्दल आदर, पण संयम ठेवावा

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला असला तरी, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि विविध संघटनांचा त्यांना पाठिंबा आहे. आता भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराजांबद्दल नितांत आदर आहे. मात्र, त्यांनी थोडा संयम ठेवावा, त्यांचा देवच त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे विखेपाटील यांनी म्हटले आहे. 
 
यावेळी त्यांनी श्रीरामपूर येथील संपर्क कार्यालयात लावलेल्या फलकाबाबतही भूमिका स्पष्ट केली. मी जो मार्ग निवडला आहे, तो योग्य असून, मी समाधानी आहे. आता मार्ग बदलण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
 
इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर विविध स्तरांतून त्यांना पाठिंबाही मिळत आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीने त्यांना नोटीसही बजावली होती. त्याला इंदुरीकरांनी उत्तरही दिलं आहे. दुसरीकडे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना पाठिंबा दिला जात असला तरी, अशा प्रकारच्या वक्तव्याचे समर्थन करता येत नाही, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. तसेच भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नगरमध्ये येऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच येत्या दोनतीन दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला होता. त्यानंतर, इंदुरीकर महाराजांकडून जिल्हा आरोग्य विभागाने पाठवलेल्या नोटिसीला उत्तरही देण्यात आले आहे. पण त्यांनी नेमके काय स्पष्टीकरण दिले आहे, हे अद्याप समजू शकले नाही.