शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (07:21 IST)

राज्यावर ओमिक्रॉनचे संकट ! आज पुन्हा रुग्णांच्या संख्येत भर, पुणे …

राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा भर झाली आहे. आज पुणे आणि लातूरमधील प्रत्येकी एका रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय.
पुण्यात दुबईवरुन आलेल्या महिला डॉक्टरचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. दोन रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे.
आतार्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 5, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 2, कल्याण-डोंबिवलीत 1, नागपूरमध्ये 1 आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.
आज आढळलेल्या या रुग्णांच्या संपर्कातील तीन जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिलासा मिळालाय. महत्वाची बाब म्हणजे पुणे आणि लातूरमधील ओमिक्रॉनची लागण झालेल्या दोघांनीही कोरोना लस घेतलेली होती.
तर लातूर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण दुबईवरुन भारतात आला होता. या 35 वर्षीय रुग्णात लक्षणं आढळून आली होती.
लातूर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे. परदेशातुन आलेल्या 51 पैकी एका रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता.
त्याचा अहवाल आज आल्यानंतर तो रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.हा रुग्ण औसा इथला रहिवासी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.