गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (09:30 IST)

कोविड रुग्णांवर बीसीजीची लस परिणामकारक, संशोधनातून झाले सिद्ध

कोविडच्या रुग्णाला श्वसनाला अडचण येत असेल तर त्यावर बीसीजी लसीचा वापर करता येऊ शकेल असे एका संशोधनातून समोर आले आहे. परेलच्या हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने यासंदर्भात संशोधन केले. त्यात क्षयरोगावर वापरण्यात येणाऱ्या बीसीजी लसीचा डोस कोरोनाच्या रुग्णाला दिला असता त्याची श्वसनाची अडचण दूर होते.
 
या लसीचा कोरोनाच्या रुग्णांवर काही परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी या दोन संस्थांच्या संयुक्त संशोधन गटाने अभ्यास केला. या संशोधनासाठी ६० अशा कोरोना रुग्णांना बीसीजी लस देण्यात आली, ज्यांना न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास होत होता. त्यापैकी अर्ध्या रुग्णांची श्वसनाची समस्या तीन ते चार दिवसांत कमी झाली. या रुग्णांपैकी कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही. परंतु ज्यांना या लसीचा डोस दिला नाही अशा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. या संशोधनाची अजून इतर तज्ज्ञांकडून खातरजमा व्हायची आहे, पण ज्यांना बीसीजीची ही लस देण्यात आली आहे त्यांच्या शरीरात प्रतिकारक शक्तीची वाढ झाल्याचे मत संशोधकांनी नोंदवले.