शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मार्च 2020 (17:44 IST)

नवी दिल्लीतील 'हे' ठिकाण आहे कोरोनासाठी मोठे संकट

tablighi jamaat nizamuddin
नवी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 350 भाविकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत यापैकी 24 जणांची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तब्लिग-ए-जमातमध्ये सहभागी झालेल्या तब्बल 700 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
 
दिल्लीत हजरत निझमुद्दीनमध्ये प्रसिद्ध दर्गा असून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. जमातच्या मुख्यालयात 1 ते 15 मार्च दरम्यान ‘तब्लिग-ए-जमात’ हा कार्यक्रम झाला होता. नमाज अदा करत असताना कोरोनाबाधित व्यक्तीमुळे 200 पेक्षा अधिक व्यक्तींना संसर्ग झाल्याची शंका आहे. भाविक सहभागी होऊन मूळगावी परतल्याने समूह संसर्गाची भीती आहे.
 
निमाझमुद्दीनमधील सर्व रहिवाशांना दिल्ली पोलीस बसने जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये तपासणीसाठी घेऊन जात आहेत. यातून संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
 
याआधीच, कार्यक्रमात सहभागी झालेल्या 9 जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील सहा जणांचा, तर कर्नाटक, जम्मू-काश्मिर, तामिळनाडूतील प्रत्येकी एकाचा मृत्यू ‘कोरोना’मुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे.