बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (16:26 IST)

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टीलची माणुसकी; सोशल मीडियावर होतंय कौतुक

टाटा उद्योग समूहातील टाटा स्टील कंपनीने एक अनोखं पाऊल उचललं आहे.कोरोना संकट काळात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत. काहींच्या घरातला कर्ता पुरुष किंवा महिला गेली आहे. अशा वेळी कुटुंबीयांसाठी रोजच्या जगण्याची भ्रांत निर्माण झाल्याचं चित्र अनेक घरांमध्ये आहे.
 
Agilitywithcare या हॅशटॅगसह टाटा स्टील कंपनीने भूमिका मांडली.
 
कोरोना संकटात जीव गमावलेल्या टा स्टीलच्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर 60 वर्षं म्हणजे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबाला संपूर्ण वेतन दिलं जाणार आहे. याबरोबरच संबंधित कुटुंबीयांना वैद्यकीय आणि राहण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील.
 
फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा खर्च कंपनी उचलणार असल्याचं टाटा स्टीलने म्हटलं आहे.
 
कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्टीलप्रमाणे भक्कमपणे पाठीशी उभी राहील, असं टाटा स्टीलने म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यासाठी कटिबद्ध आहोत असंही कंपनीने म्हटलं आहे.
 
सोशल मीडियावर टाटा स्टीलच्या या भूमिकेचं कौतुक होत आहे.
 
टाटा स्टीलने अतिशय कौतुकास्पद असं पाऊल उचललं आहे. समाजाप्रती असलेलं आपलं देणं निभावणं तुम्ही चांगलंच जाणता. असंच चांगलं काम सुरू ठेवा, असं सय्यद शकील अली यांनी म्हटलं आहे.
कर्मचाऱ्यांप्रती अशी माणुसकी हे टाटा उद्योग समूहाचं वैशिष्ट्य आहे, असं संदीपसिंग चौहान यांनी म्हटलं आहे.
 
ही टाटांची कार्यपद्धती आहे. टाटा हा उद्योगसमूह नाही, ती एक संस्कृती आहे, असं अमित शांडिल्य यांनी लिहिलं आहे.
 
टाटा स्टीलच्या या भूमिकेचं शब्दात वर्णन करता येणार नाही. कर्मचाऱ्यांनी हे ऐकलं तर भारावून जातील, असं रुपेश कुमार राऊत यांनी म्हटलं आहे.