कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पोहोचली तीन लाखावर
राज्यात मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.
पाठविण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.