राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या 20 वर
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात सोमवारी आणखी 2 ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे. आता राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. यात मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपा क्षेत्रात 2, कल्याण डोंबिवलीत 1, नागपूरमध्ये 1 आणि लातूरमध्ये 1 रूग्ण आहे.
या 20 ओमायक्रॉन रूग्णांपैकी 9 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आढळलेल्या ओमायक्रॉन बाधित दोन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. पुण्यातील रुग्ण 39 वर्षाची महिला आहे, तर लातूरमधील रुग्ण 33 वर्षाचा पुरुष आहे. सध्या दोघेही विलगीकरणात आहेत. या रूग्णांच्या प्रत्येकी 3 निकटसहवासितांची चाचणी करण्यात आली. त्यांचे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते.