शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 6 मे 2020 (13:09 IST)

तेव्हा वाटले ‘सोशल डिस्टन्सिंग' गेले खड्‌ड्यात : सचिनने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगात दहशतीचे वातावरण आहे. अनेकांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायसशी झुंज देत आहे. विविध उपायोजना करण्यात येत आहेत.

कोरोनाच काळात सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग' हा शब्द खूप परिचयाचा झाला आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे, पण नुकत्याच एक कार्यक्रमात सचिनने सोशल डिस्टन्सिंगबद्दल एक आठवण सांगितली. क्रीडा क्षेत्राशी संबंधित एका वाहिनीच्या ‘क्रिकेट कनेक्टेड' कार्यक्रमात बोलताना ‘सचिनने एकेकाळी सोशल डिस्टन्सिंग' खड्‌ड्यात गेले असे वाटले असल्याचे सांगितले.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 1998 साली शारजाच्या मैदानावर केलेली खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. सचिनने त्या मैदानावर 3 दिवसात 2 शतके ठोकली होती. सचिन नावाच्या वादळाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा पार धुव्वा उडवला होता. पण त्यावेळी शारजाच्या मैदानावर खरोखर एक वादळ आले होते. सचिनसाठी अशा प्रकारचे वादळ येणे हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे सचिनला नक्की काय करावेसे वाटले त्याबद्दल सचिनने सांगितले.
अशा प्रकारे वाळवंटात वाळूचे वादळ पाहण्याची माझी पहिलीच वेळ होती. मी असे आधी कधीच पाहिले नव्हते. सर्वप्रथम जेव्हा मी वादळ
पाहिले, तेव्हा मला वाटले की आता मी उडून जाणार.
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट माझ्या मागे उभा होता. वादळ इतके वेगवान आणि जोरदार होते की मी असा विचार केलाच होता की सोशल डिस्टन्सिंग वैगेरे खड्‌ड्यात गेले आणि मी गिलख्रिस्टला पकडण्याच्या तयारीत होतो. वादळाचा वेग वाढला तर मी आणि गिलख्रिस्ट दोघे मिळून किमान 80-90 किलोचे वजन तरी होईल असा माझा विचार होता, पण तितक्यात पंचांनी मैदान सोडून सगळ्यांना आतमध्ये जायला सांगितले, अशी भन्नाट आठवण सचिनने सांगितली.
दरम्यान, सचिनने त्या सामन्यात शतक ठोकले. त्याच्या शतकाने केवळ भारत जिंकलाच नाही, तर भारताला चांगल्या धावगतीच्या  आधारावर अंतिम फेरीत स्थान देखील मिळाले.