मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले 'हे' आहेत महत्वपूर्ण निर्णय

कोरोनाचा फैलाव झालेल्या महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरांत जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सोडून अन्य सर्व दुकानं आणि ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जनतेला संदेश देताना हा निर्णय जाहीर केला.
 
महामुंबईमध्ये मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही शहरंही बंद राहणार आहेत. महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर बंद ठेवण्याची अंमलबजावणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. 
 
जगण्यासाठी आपल्याला घरातच थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे १५ दिवस अत्यंत महत्वाचे असून संसर्ग टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे.
 
रेल्वे आणि बस सेवा बंद करण्याचा सल्ला अनेकजणांनी दिला असला तरी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु ठेवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रेल्वे आणि बस बंद करण्याचा पर्याय शेवटचा असेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
 
सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचारी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता २५ टक्केच कर्मचारी बोलावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
 
दुकानं आणि आस्थापनं बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. पण कामगारांचं किमान वेतन बंद करू नका, संकटात माणुसकी महत्वाची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आस्थापनांच्या मालकांना बजावलं आहे. 
 
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील दुकानं बंद ठेवण्यात येणार असली तरी औषधं, अन्नधान्य, दूध, भाजीपाला अशी अत्यावश्यक गरजेची दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेले १० मोठे निर्णय
१. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत राज्यातील मोठी शहरं बंद
२. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर बंद राहणार
३. या शहरांतील जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सोडून सर्व दुकानं आणि ऑफिसेस बंद राहणार
४. औषधं, अन्नधान्य, दूध, भाजीपाला अशी जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरु राहणार
५. या शहरांतील बँका मात्र सुरु राहणार
६. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे आणि बससेवा सुरु ठेवणार
७. गर्दी कमी झाली नाही तर रेल्वे आणि बससेवा दोन दिवसांनी बंद करण्यात येणार
८. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० वरून २५ टक्क्यांवर आणणार
९. कष्टकऱ्यांना सुट्टीच्या काळात किमान वेतन किमान वेतन द्या, माणुसकी महत्वाची आहे.
१०.  नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी घरीच थांबावे, घराबाहेर पडू नये