अशी आहे कोरोना रूग्णांची वर्गवारी, ९०% रुग्ण रहिवाशी इमारतींमध्ये तर फक्त १०% रुग्ण झोपडपट्टीतले
मुंबईत जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात मुंबईत २३ हजार २ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ९०% रुग्ण हे रहिवाशी इमारतींमध्ये तर फक्त १०% रुग्ण हे झोपडपट्टीत आढळून आले असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. ९ मार्चपर्यंत पालिकेने ५ पेक्षाही जास्त कोरोना रुग्ण आढळून आलेल्या २१४ इमारती सील करताना तब्बल २ हजार ७६२ मजले सील केले आहेत. या ठिकाणी ४ हजार १८३ रुग्णाढळून आले आहेत. याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना अधिकाधिक कठोर केल्या आहेत. दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्या यांच्या तुलनेत रहिवासी इमारतीमधील रुग्ण संख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिबंधित निवासी इमारतीमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत.
गृह विलगीकरण नियम मोडून, कोरोनाचे रुग्ण व त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती घराबाहेर पडले तसेच सार्वजनिकरित्या फिरताना आढळल्यास शेजारील रहिवाशांनी आणि संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाला कळवावे. तसेच विभाग कार्यालयांनी अशा नियम मोडणाऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय पथकाने मागील आठवड्यात मुंबईतील एम/ पूर्व, एम/ पश्चिम, एन, एस आणि टी विभाग क्षेत्रांमध्ये दौरा करून पाहणी केली होती. ज्या निवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा जास्त बाधित रुग्ण आहेत, अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये सूचना फलकांवर संबंधित घराचा आणि मजल्याचा क्रमांक दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे बाधित रुग्ण तसेच त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या हातावर गृह विलगीकरणाचे शिक्के मारलेले असणार आहेत. एकाच घरामध्ये बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती गृह विलगीकरणात राहत असतील तर रुग्ण आणि कुटुंब यांच्यासाठी स्वतंत्र खोली तसेच स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. अशी व्यवस्था घरी उपलब्ध नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रांमध्ये नेण्यात येईल.