मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (21:58 IST)

Omicron BA.2 व्हेरिएंट काय आहे? तो किती धोकादायक?

प्रंचंड संसर्गजन्य असलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं जवळपास अर्ध्या जगाला कोव्हिड-19 चा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं.
पण ओमिक्रॉन ही SARS-Cov-2 कोरोना विषाणूच्या प्रकारांशी संबंधित विषाणूंबाबतची एक संकल्पना आहे, त्यातील सर्वात सामान्य म्हणजे BA.1 हा प्रकार आहे.
 
आता बहुतांश देशांमध्ये प्रामुख्यानं आशिया आणि युरोपात BA.2 कारणीभूत असलेल्या प्रकरणांचा समावेश असल्याचं समोर येत आहे.
 
'छुपा' व्हेरिएंट
BA.2 हा व्हेरिएंट छुपा व्हेरिएंट म्हणून ओळखला जातो. त्यामागचं कारण म्हणजे, अभ्यासक संसर्ग हा डेल्टा ऐवजी नेहमीच्या BA.1 ओमिक्रॉन व्हेरिएंटचा आहे, हे सांगण्यासाठी ज्या अनुवांशिक खुणांचा वापर करतात त्या यामध्ये आढळत नाहीत.
 
इतर प्रकारांप्रमाणेच BA.2 चा संसर्ग हा लॅटरल फ्लो आणि पीसीआर कोव्हिड टेस्ट किटद्वारे शोधता येऊ शकतो. मात्र, त्यांना BA.2 आणि डेल्टा यांच्यात फरक आढळत नाही. त्यासाठी अधिक खात्रीशीरपणे सांगण्यासाठी जास्तीच्या चाचण्या कराव्या लागतात.
 
BA.2 हा व्हेरिएंट यापूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, सुदैवानं तो अधिक गंभीर असल्याचं आढळलेलं नाही.
 
मग अशा स्थितीत या नव्या व्हेरिएंटबाबत आपण किती चिंता करायला हवी? याबाबतची काही माहिती आम्ही देत आहोत.
 
BA.2 काय आहे ?
विषाणूंचं उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊन त्यापासून वेगवेगळे व्हेरिएंट्स तयार होत असतात. कधी कधी ते वेगळ्या शाखांमध्ये किंवा विषाणूच्या उपवंशामध्ये विभागले जातात. उदाहरण द्यायचं झाल्यास डेल्टा व्हेरिएंटचे जवळपास 200 वेगवेगळे उपप्रकार आहेत.
ओमिक्रॉनबाबतही तेच झालं आहे. त्यात BA.1, BA.2, BA.3 आणि B.1.1.529 या उपप्रकारांचा समावेश आहेत.
 
बहुतांश संसर्गासाठी BA.1 कारणीभूत आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या मते, ग्लोबल GISAID डाटाबेसकडे सादर करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी जवळपास 99% व्हायरल डीएनए याचे या उपप्रकाराचे असल्याचं स्पष्ट झालं होतं.
 
हे नेमके कुठून समोर आले हे अद्याप स्पष्ट नसलं तरीही, नोव्हेंबर महिन्यात फिलिपाईन्समधून अपलोड केलेल्या माहितीमधून ते सर्वांत आधी समोर आलं होतं.
BA.2 चा संसर्ग कुठे होत आहे?
नोव्हेंबर महिन्यापासून जवळपास 40 देशांमधून डाटाबेसमध्ये BA.2 च्या हजारो नमुन्यांची माहिती अपलोड केली जात आहे.
 
व्हेरिएंटचा हा उपप्रकार फिलिपाईन्सस नेपाळ, कतार, भारत आणि डेन्मार्कमध्ये यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर पसरला असल्याचं WHO चं म्हणणं आहे. काही ठिकाणी तर त्यामध्ये अत्यंत झपाट्यानं वाढ झालेली आहे.
 
डेन्मार्कच्या स्टॅटेन्स सीरम इन्स्टिट्यूट (SSI) च्या मते, सध्या देशात आढळणाऱ्या नव्या कोव्हिड रुग्णांमध्ये जवळपास अर्धी प्रकरणंही BA.2 या व्हेरिएंटच्या उपप्रकारामुळे आहेत.
 
भारतातही BA.2 हा व्हेरिएंट अत्यंत वेगानं डेल्टा आणि ओमिक्रॉन या BA.1 च्या उपप्रकारांची जागा घेत आहे, अशं जीवशास्त्रज्ञ बिजया ढकाल यांनी म्हटलं.
 
हा काही राज्यांमध्ये अत्यंत प्रभावी असा व्हेरिएंट ठरत असून देशात नुकत्याच आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तो कारणीभूत असण्याची शक्यता आहे.
 
जानेवारीच्या अखेरीस मिळालेल्या नमुन्यांमध्ये आधीच BA.2 व्हेरिएंटचे उपप्रकार आढळले असल्याचं फिलिपाईन्सच्या आरोग्य विभागानं म्हटलं आहे.
 
तर इंग्लंडमध्ये जवळपास 1000 पेक्षा अधिक BA.2 ची प्रकरणं आढळून आलू असल्याचं युकेमधील आरोग्य संरक्षण संस्था (UKHSA)नं म्हटलं आहे.
 
ब्रिटिश आरोग्य विभागानं याचा तपास सुरू असलेला व्हेरिएंट असं म्हटलं आहे. याचा अर्थ म्हणजे यावर ते लक्ष ठेवून आहेत, मात्र त्यांना त्याची फारशी चिंता नाही.
 
जर्मनीमध्येही BA.1 आणि डेल्टाच्या तुलनेत BA.2 व्हेरिएंटचा संसर्ग वेगानं पसरत असल्याचं UKHSA मधील कोव्हिड 19च्या संचालक डॉ. मीरा चंद यांनी म्हटलं आहे.
 
BA.2 अधिक संसर्गजन्य आहे का?
डेन्मार्कमधील SSI संस्थेतर्फे 8500 कुटुंबं आणि 18000 व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये BA.1 च्या तुलनेत BA.2 अधिक संसर्गजन्य असल्याचं आढळून आलं.
 
लसीकरण झालेल्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी असली तरी, यामुळं लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्यांनाही संर्सर्ग होण्याचं प्रमाण भरपूर होतं.
 
तर युकेमध्ये झालेल्या एका स्वतंत्र अभ्यासामध्येही BA.1 च्या तुलनेत BA.2 संसर्गक्षमता अधिक असल्याचं आढळून आलं.
 
मात्र, लशी या कोणत्याही उपव्हेरिएंट किंवा लक्षण असलेल्या आजाराच्या बाबतीत कमी प्रभावी आहेत याचे कोणतेही पुरावे प्राथमिक मुल्यांकनामध्ये आढळून आले नाहीत.
 
BA.2 अधिक धोकादायक आहे का?
ओमिक्रॉनच्या यापूर्वीच्या उपव्हेरिएंट्सपेक्षा BA.2 मुळं अधिक गंभीर आजार उद्भवतो हे दर्शवणारे कोणतेही पुरावे माहितीतून समोर आलेले नाहीत.
 
"ज्याठिकाणी BA.2 चं प्रमाण वाढत आहे, अशा इतर देशांचा विचार करता रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झालेली दिसत नाही," असं WHO च्या कोव्हिड रिस्पॉन्स टीमचे डॉ. बोरीस पॅव्हलिन यांनी मंगळवारी म्हटलं.
 
BA.2 नं जर BA.1 ची जागा पूर्णपणे घेतली तरी, त्याचा या साथीवर किंवा त्याच्या उपचारांवर फारसा काही परिणाम होईल, असं वाटत नसल्याचंही ते म्हणाले.
 
"याबाबत आणखी माहितीची आवश्यकता असली तरीही त्याचा परिणाम फारसा बदलणार नाही," असंही डॉ. पॅव्हलिन म्हणाले.
 
यापूर्वी समोर आलेल्या व्हेरिएंट्सप्रमाणेच या व्हेरिएंट्सवरही लशी या गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होण्याची गरज आणि मृत्यू यावर प्रभावी असतील, असं तज्ज्ञांचं मत आहे.
"लसीकरणामुळे कोरोनापासून उद्भवणाऱ्या गंभीर आजारांबरोबरच ओमिक्रॉनवरही संरक्षण मिळत असल्याचंही," डॉ. पॅव्हलिन म्हणाले.
 
"BA.2 मुळं ओमिक्रॉन BA.1 च्या तुलनेत अधिक गंभीर आजारी पडण्याची शक्यता असते, हे दर्शवणारे पुरेसे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, सध्या अपुरी माहिती असून UKHSA अभ्यास करत आहे."
 
"आपण सतर्कपणे लसीकरण करत राहिलं पाहिजे. तसंच लक्षणं आढळल्यास आपण नियमितपणे LFDs (लॅटरल फ्लो डिव्हाईस) आणि PCR (पॉलिमर्स चेन रिअॅक्शन) चाचणी करत राहायला हवी," असंही चंद म्हणाल्या.