गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:06 IST)

मास्कमुक्ती कधी मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिली महत्वाची माहिती

महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. तिसरी लाट जवळजवळ संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेले निर्बंध शिथील होणार असल्याचे संकेत मिळत आहे. अशात  करोना आणि मास्कमुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. 
 
मास्कमुक्ती कधी मिळणार असे प्रश्न विचारले जात असताना त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आता आपल्याला हा जो काळ मिळाला आहे, तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. 
 
तसेच साथ शिखरावर असताना लसीकरण करणे, कितपत योग्य आहे, याबद्दल डॉक्टर सांगतील. परंतु आता लाट कमी होत असताना लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही करोनाची लागण होते पण त्याची घातकता नक्कीच कमी होते. जीव वाचवण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
 
अलिबाग येथील उसरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील करोना परिस्थिती, मास्कमुक्ती आणि लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली.