रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (11:26 IST)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक कधी येणार?

ऋजुता लुकतुके
देशात आता दर दिवशी 3,50,000 लाखांच्या वर नवीन रुग्णांची नोंद होत आहे. अशावेळी एक स्वाभाविक प्रश्न मनात येत असेल हे कधी थांबणार? हे समजण्यासाठी एक गणिती मॉडेल संशोधकांनी विकसित केलं आहे. त्यातून आपल्याला दुसऱ्या लाटेचा उच्चांक कधी येईल आणि ही लाट कधी ओसरणार याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
 
मागचे काही दिवस तुम्ही बघितलं असेल की, मुंबई आणि पुण्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. मुंबईत तर ती पाच हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. नवी दिल्लीतही रुग्ण संख्या 22,000वर स्थिरावल्यासारखं दिसतंय. पण, याचा अर्थ या दोन शहरांमध्ये कोरोनाची लाट ओसरतेय असा घ्यायचा का?
साथीच्या रोगांच्या बाबतीत शास्त्र असं सांगतं की, रोगाची लाट येते किंवा लाटा येतात तेव्हा त्यांचा एक उच्चांक किंवा पीक येतो आणि पीकवर काही काळ थाबल्यानंतरच लाटेचा भर ओसरायला सुरुवात होते.
 
आता देशात दुसरी कोरोना लाट थैमान घालतेय. अशावेळी तुमच्या मनातही हा प्रश्न आला असणार की या लाटेचा परमोच्च बिंदू नक्की कुठला? तो कधी येणार? आणि त्यानंतर ती ओसरणार कधी? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
 
दुसऱ्या लाटेचा पीक कधी येणार?
 
दुसऱ्या लाटेत देशातली रुग्णसंख्या दिवसाला साडेतीन लाखांपर्यंत पोहोचलीय. आणि मागचे चार दिवस ती सातत्याने 3 लाखांपेक्षा जास्त आहे. अशावेळी संसर्गजन्य आणि विषाणूंच्या माध्यमातून पसरणाऱ्या आजारांवर अभ्यास करणाऱ्या देशातल्या महत्त्वाच्या संस्थांनी दुसऱ्या लाटेबद्दलचे आपले अहवाल प्रसिद्ध केले आहेत.
 
सगळ्यांत आधी बघूया इंडियन सेंटर फॉर मेडिकल रिसर्च आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या मते भारतातल्या दुसऱ्या लाटेचा पीक नक्की कधी येणार आहे?
 
नीती आयोग आणि आयसीएमआरने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर एक सादरीकरण केलं. आणि इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्या म्हणण्यानुसार, "देशात दुसऱ्या लाटेचा पीक मे महिन्याच्या मध्यावर येईल. तोपर्यंत दिवसाला पाच ते साडेपाच लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाईल. आणि हा भर ओसरायला जून ते जुलै उजाडेल."
 
व्ही के पॉल यांच्याच शब्दात सांगायचं तर, "लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यांना धोका जास्त आहे. आणि अतीगंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी या राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा पुरेशी सक्षम नाही. संसर्ग ग्रामीण भागात पसरले तेव्हा जास्त सावध राहण्याची गरज आहे."
 
दुसरीकडे आयआयटी कानपूरच्या भौतिकशास्त्र विभागाने कोव्हिडचा आतापर्यंत उपलब्ध डेटा बघून आपलं एक मॉडेल तयार केलं आहे.
 
गणितावर आधारित हे मॉडेल असं सांगतं की, दुसऱ्या लाटेचा पीक मेच्या मध्यावर येईल. आणि तेव्हा किमान साडे तीन लाखांना दररोज संसर्ग होत असेल. शिवाय संसर्ग ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे देशाचा कोव्हिड मृत्यू दरही तोपर्यंत वर जाईल. दिवसाला सरासरी 2000 लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
 
ससेप्टिबल इन्फेक्शन रिमूव्ह्ड किंवा SIR हे तंत्र वापरून आयआयटी संस्थेनं हे मॉडेल तयार केलं आहे. दर दिवशी होणारी कोव्हिड रुग्णांची नोंद, ते कुठल्या प्रांतातून येतात, तिथे असलेलं टेस्टिंगचं प्रमाण, आर रेट म्हणजे संसर्गाचा दर, कोरोनाचे नवे व्हॅरिएंट जन्माला येण्याची शक्यता, उपलब्ध उपचार पद्धती या सगळ्याचा विचार करून एक गणिती सूत्र तयार करण्यात आलं आहे.
 
दुसऱ्या लाटेत मृत्यू वाढतील का?
अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाच्या एपिडिमिओलॉजिस्ट आणि जैवसांख्यिकीतज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांचे पहिल्या लाटेच्या वेळी केलेले सगळे अंदाज बरोबर निघाले होते. यावेळी द वायरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, "1 ते 8 मे दरम्यान भारतात दररोज पाच लाख केसेसची नोंद होईल, तीन हजार मृत्यू होतील. आणि मेच्या मध्यापर्यंत रोजची रुग्णसंख्या आठ लाखांपर्यंत जाईल."
 
हे आकडे खूप घाबरवणारे आहेत. पण, जर कोरोनाला हरवायचं असेल तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. आणि मग ठरवता येईल की, इथून पुढे आपल्याला कसं वागलं पाहिजे?
 
याविषयी भ्रमर मुखर्जी सांगतात, "पहिल्या लाटेत लोकांमध्ये तयार झालेली रोग प्रतिकारक शक्ती फेब्रुवारीपर्यंत कमी झाली होती. त्यातच लॉकडाऊन उघडल्यामुळे लोकांचं एकमेकांत मिसळणं सुरू झालं आणि निवडणुका तसंच धार्मिक कार्यक्रमांमुळेही कोरोना देशात सर्वदूर पसरला. शिवाय लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारखे नियम पाळणंही कमी केलं."
 
आता नवीन लाटेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी दहा मुद्दे असलेली रणनिती सुचवली आहे.
 
1. जिनोम सिक्वेन्सिंगची व्याप्ती वाढवून येणारे नवे व्हॅरिएंट ओळखण्याची क्षमता विकसित करणे
 
2. लसीकरणाचा वेग वाढवणे
 
3. रोगाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आंतर-जिल्हा, आंतर-राज्य वाहतूक कमी करणे
 
4. टेस्टिंग आणि उपचार पद्धतीला चालना देणं
 
5. वापरात असलेल्या लसींचा वेगवेगळ्या लोकांवर कसा परिणाम होतोय याचा संपूर्ण अभ्यास
 
6. हॉटेल, सिनेमागृह, मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ कमी करणे
 
7. कोव्हिडची लक्षणं सतत बदलत असतात. कुठल्या रुग्णांमध्ये कुठली लक्षणं दिसतात याचा नियमित अभ्यास
 
8. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सक्तीचं विलगीकरण
 
9. गरीब आणि कोव्हिड संसर्गाला निष्कारण बळी पडणाऱ्या लोकांना आरोग्य आणि सामाजिक संरक्षण
 
10. हर्ड इम्युनिटीवर पूर्णपणे विश्वास न ठेवता कोरोनाचं अस्तित्व स्वीकारणं आणि नियमांचं पालन करत राहणं.
 
कोरोनाची लाट कधी ओसरेल?
रुग्णांची संख्या अशी वाढत राहिली तर आरोग्य यंत्रणा त्याला पुरे पडणार नाही. आताच ऑक्सिजन आणि औषधांसाठी दिल्ली, मुंबईत लोकांची झालेली तडफड आपण पाहतो आहोत. अशावेळी पुढचे दोन महिने आपल्यासाठी आव्हानात्मक आहेत. पण, काळजी घेतली तर आपण यातून पारही होऊ.
 
देशात आणि महाराष्ट्रातही ही लाट नेमकी कधी आणि कशी ओसरेल याविषयी महाराष्ट्र कोव्हिड कृतीदलाचे एक सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्याकडून जाणून घेऊया.
 
"कोणतीही साथीच्या रोगाची लाट जेव्हा येते तेव्हा एका गणिताच्या सूत्रानुसार ती 100-120 दिवस टिकते. त्यानंतर आधी आकडे स्थिर होतात. आणि नंतर ते ओसरू लागतात. आताही महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यातून ही लाट पसरत गेली. तर देशात महाराष्ट्र आणि केरळमधून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. आता जिथे लाट सुरू झाली होती तिथले आकडे थोडेफार स्थिरावले आहेत. जसं की, महाराष्ट्रात नवीन रुग्णांचा आकडा 60,000च्या घरात स्थिर आहे. तेव्हा इथले आकडे ओसरू लागले की आठवडा-पंधरा दिवसांनी देशात सर्वोच्च बिंदू येईल. आणि मग महिनाभराने देशातले आकडे ओसरू लागतील," डॉ. पंडित सांगतात.
 
पण, त्याबरोबर त्यांनी हे ही स्पष्ट केलं की, दुसरी लाट म्हणजे कोरोना संपलेला नाही. उलट 2021 आणि काही प्रमाणात पुढेही आपल्याला कोरोनाचे नियम हे पाळावेच लागणार आहेत.
 
"जगभरात पहिली आणि दुसरी लाट आली की, त्या देशांत तिसरी लाटही आली आहे. भारतातही तिसरी लाट वाचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. त्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिमिंग या त्रिसूत्रीचा काटेकोर अवलंब करण्याची गरज आहे. प्रत्येक लाटेत निदान चाचण्या आणि रुग्णांचा माग काढणं या गोष्टी करायला वेळही मिळत नाही. तेव्हा या गोष्टीही खुबीने म्हणजे जिथे संसर्ग जास्त आहे तिथे वेगाने करून जिनोम सिक्वेन्सिंग वाढवून आपल्याला भविष्यात कोरोना आटोक्यात आणावा लागेल," डॉ. पंडित यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.
 
आपल्या शेजारी पाकिस्तानमध्ये सध्या तिसरी लाट आहे. जपान, दक्षिण कोरियातही तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन सदृश निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. युरोपात दुसऱ्या लाटेतला उद्रेक आता कुठे आटोक्यात येत आहे. अशा वेळी कोरोनाबरोबर जगताना जलद गतीने लसीकरण आणि कोरोनाचे सर्व नियम पाळणं एवढंच आपल्या हातात आहे.