सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (16:35 IST)

कोरोना : अनुपम खेर 'आएगा तो मोदीही' म्हटल्याने ट्रोल का होत आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एका ट्वीटमुळे अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
 
देशात दररोज वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला टीकेला सामोरे जावं लागत आहे. दुसरीकडे अनुपम खेर यांनी सरकारची बाजू घेणारं ट्वीट केलं आहे. यामुळे नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
 
पत्रकार शेखर गुप्ता यांनी एक ट्वीट केलं होतं. त्याला उत्तर देताना अनुपम यांनी ट्वीट केलं, जे चर्चेत आहे.
शेखर गुप्ता यांनी लिहिलं की, "60च्या दशकापासून अनेक संकटं पाहिली. तीन युद्धं पाहिली, अन्नधान्याची टंचाई पाहिली. नैसर्गिक आपत्ती ओढवल्या. परंतु कोरोना हे फाळणीनंतरचं सगळ्यात मोठं संकट आहे. देशाने हे कधीच अनुभवलं नाही की सरकार गायब आहे. कॉल करण्यासाठी कंट्रोल रूम नाहीये, उत्तरं द्यायला कोणीच नाहीये."
 
याला उत्तर देताना अनुपम खेर लिहितात, "आदरणीय शेखर गुप्ताजी हे थोडं जास्तच झालं. तुमच्या मानकांपेक्षाही. कोरोनाचं संकट हे फक्त आपल्या देशापुरतं नाही तर जगासमोरचं संकट आहे. कोरोनाचा आपण याआधी कधीही सामना केलेला नाही. सरकारवर टीका करा. खोटे आरोप करू नका. कोरोनाचा मुकाबला करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. घाबरू नका. मदतीसाठी मोदीजीच येणार आहेत. जय हो."
हे ट्वीट टाकताक्षणी अनुपम खेर ट्रोल होऊ लागले. नेटिझन्सनी मीम्सच्या माध्यमातूनही त्यांच्यावर टीका केली.
 
देशभरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन, बेड्स तसंच अन्य सोयीसुविधांसाठी वणवण सुरू आहे. अशा परिस्थितीत आएगा तो मोदीही या अनुपम यांच्या वक्तव्यामुळे टीकाकारांनी झोड उठवली आहे.
 
'आएगा तो मोदीही' या ट्वीटनंतर अनुपम खेर पंतप्रधान मोदी यांच्याशी बातचीत करताना 'हम आपके है कौन' चित्रपटातील अनुपम खेर यांच्या सीनचे फोटो टाकले आहेत.
एका युझरने म्हटलं की अनुपम खेर यांनी खरे रंग दाखवले.
 
रवी कुमार मीना यांनी म्हटलं की आएगा तो मोदीही ही टिप्पणी म्हणजे देशवासीयांना चिडवल्यासारखं आहे.
रोहित मल्होत्रा लिहितात, 'अन्य सेलिब्रेटी देशातल्या परिस्थितीसंदर्भात चिंतेत. अनुपम खेर-आएगा तो मोदीही लिहिण्यात व्यग्र. तुमची लाज वाटते.'
 
साहीर सईद म्हणतात की 'अनुपम खेर यांनी पायाभूत सुविधांसाठी वणवण करावं लागलेल्या लोकांशी बोलावं. त्यांना आएगा तो मोदीचं उत्तर दिलं पाहिजे तेव्हाच त्यांचा आवाज भारताचा खरा आवाज होईल.'
रॉलेट गांधी नावाच्या युझरने अनुपम खेर यांच्या बाजूने लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, लोक अनुपम खेर यांना भलंबुरं बोलत आहेत. त्यांच्याकडे आयुष्याचा जेवढा अनुभव आहे तेवढा तुमच्या सात पिढ्यांकडेही नाही. अनुपमजी आमचं प्रेरणास्थान आहे.