आम्ही भारताला आत्मविश्वासामुळेच २00३ मध्ये हरवले होते - मार्टिन
२00३च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात भारताने चांगली कामगिरी केली होती. मात्र, आत्मविश्वासामुळेच आम्ही सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अंतिम फेरीच्या सामन्यात पराभूत करू शकलो होतो, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिनने म्हटले आहे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या माजी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाने रिकी पाँटिंग (१४0) आणि मार्टिन (८८) यांच्यादरम्यान तिसर्या विकेटसाठी झालेल्या २३४ धावांच्या नाबाद भागीदारीमुळे ३५९ धावांचा डोंगर रचला होता. त्यानंतर भारतीय संघ ३९.२ षटकांमध्येच २३४ धावांत गारद झाला होता. मधल्या फळीतील माजी फलंदाज मार्टिनने म्हटले आहे की, आम्ही सर्वजण रोमांचित झालो होतो आणि संघामध्ये अंतिम फेरीचा सामना जिंकण्यासाठी बरीच ऊर्जा होती. चांगली खेळपट्टी, चांगले आउटफिल्ड आणि चांगले प्रेक्षक होते.
आम्ही चांगली फलंदाजी केली आणि मोठी धावसंख्या रचली. आम्ही धावांचा डोंगर रचल्याने भारत दबावाखाली आला. आम्ही भारताला हरवू शकतो, असा आम्हाला विश्वास होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना मोठी धावसंख्या रचल्याने आम्ही निम्मी लढाई आधीच जिंकली होती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने (५३ धावांत तीन बळी) सचिन तेंडुलकरचा (४) महत्त्वपूर्ण बळी स्वस्तात मिळवला. वीरेंद्र सेहवाग (८२) आणि राहुल द्रविड (४७) यांनी काही वेळ संघर्ष केला, मात्र ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात वरचढ ठरला आणि आम्ही सोपा विजय मिळवला, असे मार्टिन म्हणाला.