श्रीदत्तात्रेयांची अष्टके : अष्टक ३ - जय नमोस्तुते श्रीदिगंबरा ...
जय नमोस्तुते श्रीदिगंबरा । सद्गुरु निरूपाधिं तूं बरा । उरुं न देसि दैवाचि बाकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥१॥
सुकुळिं जन्म हा, लाभला मला । जरि तुझा न बा, लाभ लाभला ॥ तरि वृथा कृती, गेलि पंकिं ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥२॥
तुज म्हणावया, लाज वाटती । मुळिंच चूकलों, मीच वाट ती ॥ परि तुझ्या सुरी, मान ही हतीं । करुं विनंति दत्तात्रया किती ॥३॥
विषय वीष हे सोमलादिक । खचित वाटतें तें मलाऽधिक ॥ परि नसे दुजी, भक्षितां गती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥४॥
जरि प्रपंच चिंताग्नि पोळवी । तरिही त्यामधें, मोह लोळवी । विविध ऊठती, कल्पना भिती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥५॥
कनक द्रव्य लावण्य कामिनी । चटक लागली दिवस यामिनी ॥ विषय ध्यानिं लाचावली मती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥६॥
षडविकार कामादि बापुडे । गमति काजवे बा । तुझ्यापुढें ॥ दिनमणी तुं ये, ऊदयाप्रती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥७॥
अठवितों तुला, मी ज्यव्हां ज्यव्हां । पळसि दुरचि कां, तू त्यव्हां त्यव्हां ॥ स्तवन कानचि का न ऐकती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥८॥
निपट हा करावा विचारची । अनसूया वडीलो-पचारची ॥ मनिं अणून दात्याचि नेकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥९॥
करिसी भक्तिच्या कागदा सही । म्हणुनि प्रार्थितों, विष्णुदासही ॥ मज प्रसन्न हो, ऐकुनी स्तुती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥१०॥
शुद्धकामदा