सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,
कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे |
कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ||
या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी,
घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी,
केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१||
या रानी, माझी करुणावाणी, काया कष्टील प्राणी,
ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी,
संकट होउनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२||
त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा,
लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा,
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३||