बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : सोमवार, 6 डिसेंबर 2021 (15:03 IST)

गुरुचरित्र – अध्याय सोळावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
 
विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे पुसत ।
सांगा स्वामी वृत्तांत । गुरुचरित्र विस्तारुनि ॥१॥
 
शिष्य समस्त गेले यात्रेसी । राहिले कोण गुरुपाशीं ।
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें दातारा ॥२॥
 
ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषी झाले सिद्ध मुनि ।
धन्य धन्य शिष्या शिरोमणि । गुरुभक्ता नामधारका ॥३॥
 
अविद्यामायासुषुप्तींत । निजलें होतें माझें चित्त ।
तुजकरितां जाहलें चेत । ज्ञानज्योति-उदय मज ॥४॥
 
तूंचि माझा प्राणसखा । ऐक शिष्या नामधारका ।
तुजकरितां जोडलों सुखा । गुरुचरित्र आठवलें ॥५॥
 
अज्ञानतिमिरउष्णांत । पीडोनि आलों कष्‍टत ।
सुधामृतसागरांत । तुवां मातें लोटिलें ॥६॥
 
तुवां केले उपकारासी । संतुष्‍ट झालों मानसीं ।
पुत्रपौत्रीं तूं नांदसी । दैन्य नाहीं तुझे घरीं ॥७॥
 
गुरुकृपेचा तूं बाळक । तुज मानिती सकळ लोक ।
संदेह न करीं घे भाक । अष्‍टैश्चर्ये नांदसी ॥८॥
 
गुरुचरित्रकामधेनु । सांगेन तुज विस्तारुनु ।
श्रीगुरू राहिले गौप्य होऊन । वैजनाथसंनिधेसीं ॥९॥
 
समस्त शिष्य तीर्थेसी । स्वामीनिरोपें गेले परियेसीं ।
होतों आपण गुरुपाशीं । सेवा करीत अनुक्रमें ॥१०॥
 
संवत्सर एक तया स्थानीं । होते गौप्य श्रीगुरु मुनि ।
अंबा आरोग्यभवानी । स्नान बरवें मनोहर ॥११॥
 
असतां तेथें वर्तमानीं । आला ब्राह्मण एक मुनि ।
श्रीगुरुतें देखोनि । नमन करी भक्तिभावें ॥१२॥
 
माथा ठेवूनि चरणांवरी । स्तोत्र करी परोपरी ।
स्वामी मातें तारीं तारीं । अज्ञानसागरीं बुडालों ॥१३॥
 
तप करतों बहु दिवस । स्थिर नव्हे गा मानस ।
याचि कारणें ज्ञानास । न दिसे मार्ग आपणातें ॥१४॥
 
ज्ञानाविणें तापसा । वृथा होती सायास ।
तुम्हां देखतां मानसा । हर्ष जाहला आजि मज ॥१५॥
 
गुरुची सेवा बहुत दिवस । केली नाहीं सायासें ।
याचिकारणें मानस । स्थिर नव्हे स्वामिया ॥१६॥
 
तूं तारक विश्वासी । जगद्गुरू तूंचि होसी ।
उपदेश करावा आम्हांसी । ज्ञान होय त्वरितेसीं ॥१७॥
 
ऐकोनि मुनीचें वचन । श्रीगुरू पुसती हांसोन ।
जाहलासी तूं केवीं मुनि । गुरुविणें सांग मज ॥१८॥
 
ऐसें म्हणतां श्रीगुरुमूर्ति । मुनीच्या डोळां अश्रुपाती ।
दुःख दाटलें अपरमिति । ऐक स्वामी गुरुराया ॥१९॥
 
गुरु होता आपणासी एक । अतिनिष्‍ठुर त्याचें वाक्य ।
मातें गांजिलें अनेक । अकृत्य सेवा सांगे मज ॥२०॥
 
न सांगे वेदशास्त्र आपण । तर्कभाष्यादि व्याकरण ।
म्हणे तुझें अंतःकरण । स्थिर नव्हे अद्यापि ॥२१॥
 
म्हणोनि सांगे आणिक कांहीं । आपुलें मन स्थिर नाहीं ।
करी त्याचे बोल वायी । आणिक कोप करी मज ॥२२॥
 
येणेंपरी बहुत दिवशीं । होतों तया गुरुपाशीं ।
बोले मातें निष्‍ठुरेसीं । कोपोनि आलों तयावरी ॥२३॥
 
ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन ।
म्हणती ऐकें ब्राह्मणा । आत्मघातकी तूंचि होसी ॥२४॥
 
एखादा मूर्ख आपुले घरीं । मळ विसर्जी देव्हारीं ।
आपुलें अदृष्‍ट ऐसेपरी । म्हणोनि सांगे सकळिकां ॥२५॥
 
तैसें तुझें अंतःकरण । आपुलें नासिक छेदून ।
पुढिल्यातें अपशकुन । करुनि रहासी तूंचि एक ॥२६॥
 
न विचारिसी आपुले गुण । तूतें कैंचें होय ज्ञान ।
गुरुद्रोही तूंचि जाण । अल्पबुद्धि परियेसा ॥२७॥
 
आपुले गुरूचे गुणदोष । सदा उच्चार करिसी हर्षे ।
ज्ञान कैंचें होय मानस । स्थिर होय केवीं आतां ॥२८॥
 
जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु ।
गुरु असतां कामधेनू । वंचूनि आलासी आम्हांजवळी ॥२९॥
 
गुरुद्रोही कवण नर । त्यासी नाहीं इह पर ।
ज्ञान कैंचें होय पुरें । तया दिवांधकासी ॥३०॥
 
जो जाणे गुरुची सोय । त्यासी सर्व ज्ञान होय ।
वेदशास्‍त्र सर्व होये । गुरु संतुष्‍ट होतांचि ॥३१॥
 
संतुष्‍टवितां श्रीगुरुसी । अष्‍टसिद्धि आपुले वशी ।
क्षण न लागतां परियेसीं । वेदशास्‍त्र त्यासी साध्य ॥३२॥
 
ऐकोनि श्रीगुरूचें वचन । माथा श्रीगुरुचरणीं ठेवून ।
विनवीतसे कर जोडून । करुणावचनेंकरुनियां ॥३३॥
 
जय जया जगद्गुरु । निर्गुण तूं निर्विकारु ।
ज्ञानसागर अपरांपरु । उद्धरावें आपणातें ॥३४॥
 
अज्ञानमाया वेष्‍टोन । नेणे गुरु कैसा कवण ।
सांगा स्वामी प्रकाशोन । ज्ञान होय आपणासी ॥३५॥
 
कैसा गुरु ओळखावा । कोणेपरी आहे सेवा ।
प्रकाश करोनि सांगावा । विश्ववंद्य गुरुमूर्ति ॥३६॥
 
जेणें माझें मन स्थिरु । होऊनि ओळखे सोयगुरु ।
तैसा करणें उपकारु । म्हणोनि चरणीं लागला ॥३७॥
 
करुणावचन ऐकोनि । श्रीगुरुनाथ संतोषोनि ।
सांगताति विस्तारोनि । गुरुसेवाविधान ॥३८॥
 
श्रीगुरु म्हणती ऐक मुनि । गुरु म्हणजे जनकजननी ।
उपदेशकर्ता आहे कोणी । तोचि जाण परम गुरु ॥३९॥
 
गुरु विरिंचि हर जाण । स्वरुप तोचि नारायण ।
मन करुनि निर्वाण । सेवा करावी भक्तीनें ॥४०॥
 
यदर्थी कथा एक । सांगों आम्ही तत्पर ऐक ।
आदिपर्वी असे निक । गुरुसेवा भक्तिभावें ॥४१॥
 
द्वापारांतीं परियेसीं । विप्र एक धौम्यऋषी ।
तिघे शिष्य होते त्यासी । वेदाभ्यास करावया ॥४२॥
 
एक 'आरुणी' पांचाळ । दुसरा 'बैद' केवळ ।
तिसरा 'उपमन्यु' बाळ । सेवा करिती विद्येलागीं ॥४३॥
 
पूर्वी गुरुची ऐसी रीति । शिष्याकरवीं सेवा घेती ।
अंतःकरण त्याचें पहाती । निर्वाणवरी शिष्याचें ॥४४॥
 
पाहोनियां अंतःकरण । असे भक्ति निर्वाण ।
कृपा करिती तत्क्षण । मनकामना पुरविती ॥४५॥
 
ऐसा धौम्यमुनि भला । तया आरूणी-पांचाळा ।
एके दिवशीं निरोप दिल्हा । ऐक द्विजा एकचित्तें ॥४६॥
 
शिष्यासी म्हणे धौम्यमुनि । आजि तुवां जावोनि रानीं ।
वृत्तीसी न्यावें तटाकपाणी । जंववरी होय तृप्त भूमि ॥४७॥
 
असे वृत्ति तळें खालीं । तेथें पेरिली असे साळी ।
तेथें नेवोनि उदक घालीं । शीघ्र म्हणे शिष्यासी ॥४८॥
 
ऐसा गुरुचा निरोप होतां । गेला शिष्य धांवत ।
तटाक असे पाहतां । कालवा थोर वहातसे ॥४९॥
 
जेथें उदक असे वहात । अतिदरारा गर्जत ।
वृत्तिभूमि उन्नत । उदक केवीं चढों पाहे ॥५०॥
 
म्हणे आतां काय करुं । कोपतील मातें श्रीगुरु ।
उदक जातसे दरारू । केवीं बांधूं म्हणतसे ॥५१॥
 
आणूनियां शिळा दगड । बांधिता जाहला उदका आड ।
पाणी जातसे धडाड । जाती पाषाण वाहोनियां ॥५२॥
 
प्रयत्‍न करी नानापरी । कांहीं केलिया न चढे वारी ।
म्हणे देवा श्रीहरि । काय करुं म्हणतसे ॥५३॥
 
मग मनीं विचार करी । गुरूचे शेतीं न चढे वारी ।
प्राण त्यजीन निर्धारीं । गुरुचे वृत्तीनिमित्त ॥५४॥
 
निश्चय करुनि मानसीं । मनीं ध्याई श्रीगुरुसी ।
म्हणे आतां उपाय यासी । योजूनि यत्‍न करावा ॥५५॥
 
घालितां उदकप्रवाहांत । जाती पाषाण वहात ।
आपण आड पडों म्हणत । निर्धारिलें तया वेळीं ॥५६॥
 
दोन्ही हातीं धरीं दरडी । पाय टेकी दुसरेकडी ।
झाला आपण उदकाआड । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥५७॥
 
ऐसा शिष्यशिरोमणि । निर्वाण मन करितांक्षणीं ।
वृत्तीकडे गेलें पाणी । प्रवाहाचें अर्ध देखा ॥५८॥
 
अर्ध पाणी जैसें तैसें । वाहतसे नित्यसरिसें ।
तयामध्यें शिष्य संतोषें । बुडाला असे अवधारा ॥५९॥
 
ऐसा शिष्य तया स्थानीं । बुडाला असे प्रवाहपाणीं ।
गुरुची वृत्ति जाहली धणी । उदकपूर्ण परियेसा ॥६०॥
 
त्याचा गुरु धौम्यमुनि । विचार करी आपुले मनीं ।
दिवस गेला अस्तमानीं । अद्यापि शिष्य न ये म्हणे ॥६१॥
 
ऐसें आपण विचारीत । गेला आपुले वृत्तींत ।
जाहलें असे उदक बहुत । न देखे शिष्य तया स्थानीं ॥६२॥
 
म्हणे शिष्या काय जाहलें । किंवा भक्षिलें व्याघ्रव्याळें ।
उदकानिमित्त कष्‍ट केले । कोठें असे म्हणतसे ॥६३॥
 
ऐसें मनीं विचारीत । उंच स्वरें पाचारीत ।
अरे शिष्या सखया म्हणत । प्रेमभावें बोलावी ॥६४॥
 
येणेंपरी करुणावचनीं । पाचारीतसे धौम्यमुनि ।
शब्द पडे शिष्यकानीं । तेथूनि मग निघाला ॥६५॥
 
येवोनियां श्रीगुरुसी । नमन केलें भावेसीं ।
धौम्यमुनीं महाहर्षी । आलिंगोनि आश्वासिलें ॥६६॥
 
वर दिधला तया वेळीं । ऐक शिष्या स्तोममौळी ।
तूतें विद्या आली सकळी । वेदशास्त्रादि व्याकरण ॥६७॥
 
ऐसें म्हणतां तत्क्षणीं । झाला विद्यावंत ज्ञानी ।
लागतसे गुरुचरणीं । भक्तिभावेंकरुनियां ॥६८॥
 
कृपानिधि धौम्यमुनि । आपुले आश्रमा नेऊनि ।
निरोप दिल्हा संतोषोनि । विवाहादि आतां करीं म्हणे ॥६९॥
 
निरोप घेऊनि शिष्यराणा । गेला आपुले स्थाना ।
आणिक दोघे शिष्य जाणा । होते तया गुरुजवळी ॥७०॥
 
दुसरा शिष्‍य 'बैद' जाणा । गुरुची करी शुश्रूषणा ।
त्याचे पहावया अंतःकरणा । धौम्य गुरु म्हणतसे ॥७१॥
 
धौम्य म्हणे शिष्यासी । सांगेन एक तुजसी ।
तुवां जाऊनि अहर्निशीं । वृत्ति आमुची रक्षिजे ॥७२॥
 
रक्षूनियां वृत्तीसी । आणावें धान्य घरासी ।
ऐसें म्हणतां महाहर्षी । गेला तया वृत्तीकडे ॥७३॥
 
वृत्ति पिके जंववरी । अहोरात्रीं कष्‍ट करी ।
राशी होतां अवसरीं । आला आपुले गुरुपाशीं ॥७४॥
 
सांगता जाहला श्रीगुरुसी । म्हणे व्रीही भरले राशीं ।
आतां आणावें घरासी । काय निरोप म्हणतसे ॥७५॥
 
मग म्हणे धौम्यमुनि । बा रे शिष्या शिरोमणि ।
कष्‍ट केले बहुत रानीं । आतां धान्य आणावें ॥७६॥
 
म्हणोनि देती एक गाडा । तया जुंपोनि एक रेडा ।
गुरु म्हणे जावें पुढा । शीघ्र यावें म्हणतसे ॥७७॥
 
एकीकडे जुंपी रेडा । आपण ओढी दुसरीकडा ।
येणेंपरी घेवोनि गाडा । आला तया वृत्तीजवळी ॥७८॥
 
दोनी खंडी साळीसी । भरी शिष्य गाडियासी ।
एकीकडे रेडियासी । जुंपोनि ओढी आपण देखा ॥७९॥
 
रेडा चाले शीघ्रेंसीं । आपण न ये तयासरसी ।
मग आपुले कंठासी । बांधिता झाला जूं देखा ॥८०॥
 
सत्राणें तयासरसी । चालत आला मार्गासी ।
रुतला रेडा चिखलेंसीं । आपुले गळां ओढीतसे ॥८१॥
 
चिखलीं रुतला रेडा म्हणोनि । चिंता करी बहु मनीं ।
आपण ओढी सत्राणीं । गळां फांस पडे जैसा ॥८२॥
 
सोडूनियां रेडियासी । काढिलें शिष्यें गाडियासी ।
ओढितां आपुले गळां फांसी । पडूनि प्राण त्यजूं पाहे ॥८३॥
 
इतुकें होतां निर्वाणीं । सन्मुख पातला धौम्यमुनि ।
त्या शिष्यातें पाहोनि नयनीं । कृपा अधिक उपजली ॥८४॥
 
सोडूनियां शिष्यातें । आलिंगोनि करूणाभरितें ।
वर दिधला अभिमतें । संपन्न होसी वेदशास्त्रीं ॥८५॥
 
वर देतां तत्क्षणेसीं । सर्व विद्या आली त्यासी ।
निरोप घेऊनियां घरासी । गेला शिष्य परियेसा ॥८६॥
 
तिसरा शिष्य उपमन्यु । सेवेविषयीं महानिपुण ।
गुरुची सेवा-शुश्रूषण । बहु करी परियेसा ॥८७॥
 
त्यासी व्हावा बहुत आहार । म्हणोनि विद्या नोहे स्थिर
। त्यासी विचार करीत तो गुरु । यातें करावा उपाय एक ॥८८॥
 
त्यासी म्हणे धौम्यमुनि । तुज सांगतों म्हणोनि ।
नित्य गुरें नेऊनि रानीं । रक्षण करीं तृणचारें ॥८९॥
 
ऐसें म्हणतां गुरुमुनि । नमन करी त्याचे चरणीं ।
गुरें नेऊनियां रानीं । चारवीत बहुवस ॥९०॥
 
क्षुधा लागतां आपणासी । शीघ्र आणिलीं घरासी ।
कोपें गुरु तयासी । म्हणे शीघ्र येतोसि कां रे ॥९१॥
 
सूर्य जाय अस्तमानीं । तंववरी राखीं गुरें रानीं ।
येणेंपरी प्रतिदिनीं । वर्तावें तुवां म्हणतसे ॥९२॥
 
अंगीकारोनि शिष्यराणा । गुरें घेवोनि गेला राना ।
क्षुधाक्रांत होऊनि जाणा । चिंतीतसे श्रीगुरुसी ॥९३॥
 
चरती गुरें नदीतीरीं । आपण तेथें स्नान करी ।
तयाजवळी घरें चारी । असती विप्रआश्रम तेथें ॥९४॥
 
जाऊनियां तया स्थाना । भिक्षा मागे परिपूर्ण ।
भोजन करी सावधान । गोधन रक्षी येणेंपरी ॥९५॥
 
येणेंपरी प्रतिदिवशीं । रक्षूनि आणी गुरें निशीं ।
वर्ततां ऐसें येरे दिवशीं । पुसता झाला धौम्यमुनि ॥९६॥
 
गुरु म्हणे शिष्यासी । तूं नित्य उपवासी ।
तुझा देह पुष्‍टीसी । कवणेपरी होतसे ॥९७॥
 
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे शिष्य उपमन्य ।
भिक्षा करितों प्रतिदिन । विप्रांघरीं तेथें देखा ॥९८॥
 
भोजन करुनि प्रतिदिवसीं । गुरें घेवोनि येतों निशीं ।
श्रीगुरु म्हणती तयासी । आम्हां सांडूनि केवीं भुक्ती ॥९९॥
 
भिक्षा मागोनि घरासी । आणोनि द्यावी प्रतिदिवसीं ।
मागुती जावें गुरांपाशीं । घेऊन यावें निशिकाळीं ॥१००॥
 
गुरुनिरोपें येरे दिवशीं । गुरें नेऊनि रानासी ।
मागे भिक्षा नित्य जैसी । नेऊनि दिधली घरांत ॥१॥
 
घरीं त्यासी भोजन । कधीं नव्हे परिपूर्ण ।
पुनरपि जाई तया स्थाना । भिक्षा करुनि जेवीतसे ॥२॥
 
नित्य भिक्षा वेळां दोनी । पहिली भिक्षा देवोनि सदनीं ।
दुसरी आपण भक्षूनि । काळ ऐसा कंठीतसे ॥३॥
 
येणेंपरी किंचित्काळ । वर्ततां जाहला महास्थूळ ।
एके दिवशीं गुरु कृपाळ । पुसतसे शिष्यातें ॥४॥
 
शिष्य सांगे वृत्तांत । जेणें आपुली क्षुधा शमत ।
नित्य भिक्षा मागत । वेळ दोनी म्हणतसे ॥५॥
 
एक वेळ घरासी । आणोनि देतों प्रतिदिवसीं ।
भिक्षा दुसरे खेपेसी । करितों भोजन आपण ॥६॥
 
ऐसें म्हणतां धौम्यमुनि । तया शिष्यावरी कोपोनि ।
म्हणे भिक्षा वेळ दोनी । आणूनि घरीं देईं पां ॥७॥
 
गुरुनिरोप जेणेंपरी । दोनी भिक्षा आणूनि घरीं ।
देता जाहला प्रीतिकरीं । मनीं क्लेश न करीच ॥८॥
 
गुरेंसहित रानांत । असे शिष्य क्षुधाक्रांत ।
गोवत्स होतें स्तन पीत । देखता जाहला तयासी ॥९॥
 
स्तन पीतां वांसुरासी । उच्छिष्‍ट गळे संधींसी ।
वायां जातें भूमीसी । म्हणोनि आपण जवळी गेला ॥११०॥
 
आपण असे क्षुधाक्रांत । म्हणोनि गेला धांवत ।
पसरुनिया दोनी हात । धरी उच्छिष्‍ट क्षीर देखा ॥११॥
 
ऐसें क्षीरपान करीं । घेऊनि आपुलें उदर भरी ।
दोनी वेळ भिक्षा घरीं । देतसे भावभक्तीनें ॥१२॥
 
अधिक पुष्‍ट जाहला त्याणें । म्हणे गुरु अवलोकून ।
पहा हो याचें शरीरलक्षण । कैसा स्थूळ होतसे ॥१३॥
 
मागुती पुसे तयासी । कवणेपरी पुष्‍ट होसी ।
सांगे आपुले वृत्तांतासी । उच्छिष्‍ट क्षीर पान करितों ॥१४॥
 
ऐकोनि म्हणे शिष्यासी । मतिहीन होय उच्छिष्‍टेसीं ।
दोष असे बहुवसी । भक्षूं नको आजिचेनी ॥१५॥
 
भक्षूं नको म्हणे गुरू । नित्य नाहीं तया आहारु ।
दुसरे दिवशीं म्हणे येरु । काय करुं म्हणतसे ॥१६॥
 
येणेंपरी गुरेंसहित । जात होता रानांत ।
गळत होतें क्षीर बहुत । एका रुईचे झाडासी ॥१७॥
 
म्हणे बरवें असे क्षीर । उच्छिष्‍ट नव्हे निर्धार ।
पान करूं धणीवर । म्हणोनि तेथें बैसला ॥१८॥
 
पानें तोडूनि कुसरीं । तयामध्यें क्षीर भरी ।
घेत होता धणीवरी । तंव भरिलें अक्षियांत ॥१९॥
 
तेणें गेले नेत्र दोनी । हिंडतसे रानोवनीं ।
गुरें न दिसती नयनीं । म्हणोनि चिंता करीतसे ॥१२०॥
 
काष्‍ट नाहीं अक्षिहीन । करीतसे चिंता गोधना ।
गुरें पाहों जातां राना । पडिला एका आडांत ॥२१॥
 
पडोनियां आडांत । चिंता करी तो अत्यंत ।
आतां गुरें गेलीं सत्य । बोल गुरुचा आला मज ॥२२॥
 
पडिला शिष्य तया स्थानीं । दिवस गेला अस्तमानीं ।
चिंता करी धौम्यमुनि। अजूनि शिष्य न येचि कां ॥२३॥
 
म्हणोनि गेला रानासी । देखे तेथें गोधनासी ।
शिष्य नाहीं म्हणोनि क्लेशीं । दीर्घस्वरें पाचारी ॥२४॥
 
पाचारितां धौम्यमुनि। ध्वनि पडला शिष्यकानीं ।
प्रत्योत्तर देतांक्षणीं । जवळी गेला कृपाळू ॥२५॥
 
ऐकोनियां वृत्तांत । उपजे कृपा अत्यंत ।
अश्विनी देवा स्तवीं म्हणत । निरोप दिधला तये वेळीं ॥२६॥
 
निरोप देतां तये क्षणीं । अश्विनी देवता ध्याय मनीं ।
दृष्‍टि आली दोनी नयनीं । आला श्रीगुरुसन्मुखेसीं ॥२७॥
 
येवोनि श्रीगुरुसी । नमन केलें भक्तीसीं ।
स्तुति केली बहुवसी । शिष्योत्तमें तये वेळीं ॥२८॥
 
संतोषोनि धौम्यमुनी । तया शिष्या आलिंगोनि ।
म्हणे शिष्या शिरोमणी । तुष्‍टलों तुझ्या भक्तीसी ॥२९॥
 
प्रसन्न होऊनि शिष्यासी । हस्त स्पर्शी मस्तकेसी ।
वेदशास्त्रादि तत्क्षणेसीं । आलीं तया शिष्यातें ॥१३०॥
 
गुरु म्हणे शिष्यासी । जावें आपुले घरासी ।
विवाहादि करुनि सुखेसीं । नांदत ऐस म्हणतसे ॥३१॥
 
होईल तुझी बहु कीर्ति । शिष्य होतील तुज अत्यंती ।
'उत्तंक' नाम विख्याति । शिष्य तुझा परियेसीं ॥३२॥
 
तोचि तुझ्या दक्षिणेसी । आणील कुंडलें परियेसीं ।
जिंकोनियां शेषासी । कीर्तिवंत होईल ॥३३॥
 
जन्मेजय रायासी । तोच करील उपदेशी ।
मारवील समस्त सर्पांसी । याग करुनि परियेसा ॥३४॥
 
तोचि उत्तंक जाऊन । पुढें केला सर्पयज्ञ ।
जन्मेजयातें प्रेरुन । समस्त सर्प मारविले ॥३५॥
 
ख्याति जाहली त्रिभुवनांत । तक्षक आणिला इंद्रासहित ।
गुरुकृपेचें सामर्थ्य । ऐसें असे परियेसा ॥३६॥
 
जो नर असेल गुरुदूषक । त्यासी कैंचा परलोक ।
अंतीं होय कुंभीपाक । गुरुद्रोह-पातक्यासी ॥३७॥
 
संतुष्‍ट करितां गुरुसी । काय न साधे तयासी ।
वेदशास्त्र तयासी । लाघे क्षण न लागतां ॥३८॥
 
ऐसें तूं जाणोनि मानसीं । वृथा हिंडसी अविद्येसीं ।
जावें आपुले गुरुपाशीं । तोचि तुज तारील सत्य ॥३९॥
 
त्याचें मन संतुष्‍टवितां । तुज मंत्र साध्य तत्त्वता ।
मन करुनि सुनिश्चिता । त्वरित जाईं म्हणितलें ॥१४०॥
 
ऐसा श्रीगुरू निरोप देतां । विप्र जाहला अतिज्ञाता ।
चरणांवरी ठेवूनि माथा । विनवीतसे तया वेळीं ॥४१॥
 
जय जया गुरुमूर्ति । तूंचि साधन परमार्थी ।
मातें निरोपिलें प्रीतीं । तत्त्वबोध कृपेनें ॥४२॥
 
गुरुद्रोही आपण सत्य । अपराध घडले मज बहुत ।
गुरुचें दुखविलें चित्त । आतां केवीं संतुष्‍टवावें ॥४३॥
 
सुवर्णादि लोह सकळ । भिन्न होतां सांधवेल ।
भिन्न होतां मुक्ताफळ । केवीं पुन्हा ऐक्य होय ॥४४॥
 
अंतःकरण भिन्न होतां । प्रयास असे ऐक्य करितां ।
ऐसें माझें मन पतित । काय उपयोग जीवूनि ॥४५॥
 
ऐसें शरीर माझें द्रोही । काय उपयोग वांचून पाहीं ।
जीवित्वाची वासना नाहीं । प्राण त्यजीन गुरुप्रति ॥४६॥
 
ऐसेपरी श्रीगुरुसी । विनवितो ब्राह्मण हर्षी ।
नमूनि निघे वैराग्येसीं । निश्चय केला प्राण त्यजूं ॥४७॥
 
अनुतप्त जाहला तो ब्राह्मण । निर्मळ जाहलें अंतःकरण ।
अग्नि लागतां जैसें तृण । भस्म होय तत्क्षणीं ॥४८॥
 
जैसा कापूरराशीसी । वन्हि लागतां परियेसीं ।
जळोनि जाय त्वरितेसीं । तैसें तयासी जहालें ॥४९॥
 
याकारणें पापासी । अनुतप्त होतां मानसीं ।
क्षालण होय त्वरितेसीं । शतजन्मींचें पाप जाय ॥१५०॥
 
निर्वाणरुपें द्विजवर । निघाला त्यजूं कलेवर ।
ओळखोनियां जगद्गुरु । पाचारिती तयावेळीं ॥५१॥
 
बोलावोनि ब्राह्मणासी । निरोप देती कृपेसीं ।
न करीं चिंता तूं मानसीं । गेले तुझे दुरितदोष ॥५२॥
 
वैराग्य उपजलें तुझ्या मनीं । दुष्कृतें गेलीं जळोनि ।
एकचित्त करुनि मनीं । स्मरें आपुले गुरुचरण ॥५३॥
 
तये वेळीं श्रीगुरुसी । नमन केलें चरणासी ।
जगद्गुरु तूंचि होसी । त्रिमूर्तीचा अवतार ॥५४॥
 
तुझी कृपा होय जरी । पापें कैंचीं या शरीरीं ।
उदय होतां भास्करीं । अंधकार राहे केवीं ॥५५॥
 
ऐसेपरी श्रीगुरुसी । स्तुति करी तो भक्तीसीं ।
रोमांचळ उठती हर्षी । सददित कंठा जाहला ॥५६॥
 
निर्मळ मानसीं तयावेळीं । माथा ठेवी चरणकमळीं।
विनवीतसे करुणाबहाळीं । म्हणे तारीं तारीं श्रीगुरुमूर्ति ॥५७॥
 
निर्वाण देखोनि अंतःकरण । प्रसन्न जाहला श्रीगुरु आपण ।
मस्तकीं ठेविती कर दक्षिण । तया ब्राह्मणासी परियेसा ॥५८॥
 
परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय बावनकसी ।
तैसें तया द्विजवरासी । ज्ञान जहालें परियेसा ॥५९॥
 
वेदशास्त्रादि तात्काळी । मंत्रशास्त्रें आलीं सकळीं ।
प्रसन्न जहाला चंद्रमौळी । काय सांगूं दैव त्या द्विजाचें ॥१६०॥
 
आनंद जाहला ब्राह्मणासी । श्रीगुरु निरोपिती तयासी ।
आमुचें वाक्य तूं परियेसीं । जाय त्वरित आपुले गुरुपाशीं ॥६१॥
 
जावोनियां गुरुपाशीं । नमन करीं भावेसीं ।
संतोषी होईल भरंवसीं । तोचि आपण सत्य मानीं ॥६२॥
 
ऐसेपरी श्रीगुरुमूर्ति । तया ब्राह्मणा संभाषिती ।
निरोप घेऊनियां त्वरिती । गेला आपल्या गुरुपाशीं ॥६३॥
 
निरोप देऊनि ब्राह्मणासी । श्रीगुरु निघाले परियेसीं ।
'भिल्लवडी' ग्रामासी । आले भुवनेश्वरी-संनिध ॥६४॥
 
कृष्णापश्चिमतटाकेसी । औदुंबर वृक्ष परियेसीं ।
श्रीगुरु राहिले गुप्तेसीं । एकचित्तें परियेसा ॥६५॥
 
सिद्ध म्हणे नामधारकासी । राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी ।
महिमा जाहली बहुवसी । प्रख्यात तुज सांगेन ॥६६॥
 
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥१६७॥
 
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे गुरुशुश्रूषणमाहात्म्यवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥
 
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या १६७ ॥
 
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥