रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : शनिवार, 11 डिसेंबर 2021 (17:19 IST)

गुरुचरित्र – अध्याय छत्तिसावा भाग 3

षण्मुखाधोमुखं चैव व्यापकांजलिकं तथा । शकटं यमपाशं च ग्रंथितं चोल्मुकोल्मुकम ॥४१॥
प्रलंबं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहकम्‍ । सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं पल्लवं तथा ॥४२॥
एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फला भवेत्‍ । एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठिता ॥४३॥
अस्यार्थः । सुमुखं ॥१॥ संपुटं ॥२॥ विततं ॥३॥ विस्तृतं ॥४॥ द्विमुखं ॥५॥ त्रिमुखं ॥६॥
चतुर्मुखं ॥७॥ पंचमुखं ॥८॥ षण्मुखं ॥९॥ अधोमुखं ॥१०॥ व्यापकांजलिकं ॥११॥
शकटं ॥१२॥ यमपाशं च ॥१३॥ ग्रंथितं ॥१४॥ चोल्मुकोल्मुकं ॥१५॥ प्रलंबं ॥१६॥
मुष्टिकं ॥१७॥ मत्स्यः ॥१८॥ कूर्मः ॥१९॥ वराहः ॥२०॥
सिंहाक्रांतं ॥२१॥ महाक्रांतं ॥२२॥ मुद्गरं ॥२३॥ पल्लवं ॥२४॥
मुद्राविण गायत्रीमंत्र । जप करितां सर्व व्यर्थ । या कारणे करावे पात्र । मुद्रापूर्वक जप करावा ॥४४॥
गौप्प्य करावा मुद्रायुक्त । प्राणायाम करा निश्चित । समस्त पापक्षयार्थ । म्हणोनि अष्टोत्तरीय संकल्पावे ॥४५॥
या गायत्रीप्रथमपादासी । म्हणा ऋग्वेद असे ऋषि । भूमितत्त्व परियेसी । ब्रह्मा देवता त्रिष्टुप्‍ छंद ॥४६॥
द्वितीयपाद गायत्रीसी । यजुर्वेद असे ऋषि । रुद्रदेवता प्राणापानव्यालतत्त्वेसी । जगती म्हणा अहर्निशी ॥४७॥
गायत्री तृतीयपादासी । ऋग्यजुः सामतत्त्व परियेसी । विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी । समस्तपापक्षयार्थ विनियोग ॥४८॥
भूमिस्तंभ परियेसी । गायत्री छंदासी । म्हणावे ब्रह्मपदासी । ब्रह्मा दैवत जाणावे ॥४९॥
गायत्रीचे ध्यान । सांगेन तुम्हा विधान । एकचित्ते करा पठण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४५०॥
श्लोक । मुक्ताविदुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम्‍ ।
गायत्री वरदाभयांकुशकशां शुभ्रं कपालं गदां शंखं चक्रमथारविदयुगलं हस्तैर्वहन्ती भजे ॥५१॥
ऐसे ध्यान करोनि । जप करावा नासिकाग्रनयनी । अंती षडंग न्यासोनि । जप करा येणेपरी ॥५२॥
गायत्रीमंत्राची प्रशंसा । एकचित्ते परियेसा । मंत्रनाम असे विशेषा । अक्षरे दोनी पाप हरे ॥५३॥
मकार म्हणजे आपुले मन । त्रकार नाम आपुला प्राण । मन प्राण एकवटोन । जप करावा एकचित्ते ॥५४॥
जप म्हणजे अक्षरे दोनी । प्रख्यात असती त्रिभुवनी । जकार जन्म विच्छेदोनि । पकारे जन्मपाप दुरी ॥५५॥
चारी वेदांस मूळ एका । गायत्रीनाम नाशी पातका । याचि कारणे करावा निका । वेदपठणफळ असे ॥५६॥
ऐसा मंत्र न जरी जपे नर । वृथा जन्म जैसा सूकर । जप करा हो निर्धार । चिंतिले फल पाविजे ॥५७॥
न करावा उदकी बैसोन । त्वरित होय प्रज्ञाहीन । याचि कारणे सांगेन विस्तारोन । अग्नि तीनि विप्रमुखी ॥५८॥
आहवनीय गार्हपत्य । दक्षिणाग्नि तिसरा विख्यात । अग्निउदकसंपर्कै त्वरित । तेजत्व जाय अग्नीचे ॥५९॥
या कारणे उदक वर्जोनि । बैसिजे उत्तम आसनी । हस्तस्पर्शी नाभिस्थानी । जपावा माळ धरोनिया ॥४६०॥
उभेनी जपावा प्रातःकाळी । बैसोनि कीजे माध्याह्नकाळी । अथवा उभा ठाकोनि । उभय पक्षी करावा ॥६१॥
माध्याह्नी ह्रदयस्थानी । जपावा माळ धरोनि । हस्त मुखे स्पर्शोनि । सायंकाळी जपावा ॥६२॥
बैसोनि जपावा सायंकाळी । पहावा वृक्ष निर्मळी । जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्रानयनी जपावा ॥६३॥
ब्रह्मचारी गृहस्थासी । जप नेमिला अष्टोत्तरेसी । वानप्रस्थ संन्यासी यासी । सहस्त्र मुख्य करावा ॥६४॥
संधिविग्रह होय जरी । अष्टाविंशति तरी करी । अशक्ति होय जरी । दहा वेळ जपावा ॥६५॥
उत्तम पक्ष मानसी । मध्यम गौप्य सुमुखेसी । अक्षरे प्रगट वाक्येसी । कनिष्ठ पुकार परियेसा ॥६६॥
त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि न म्हणावी परियेसी । म्हणता होय महादोषी । महानरक अवधारा ॥६७॥
पृथक करोनि त्रिपदासी । जपा मंत्र अतिहर्षी । ब्रह्महत्यादि पापे नाशी । अनंत पुण्य लाधिजे ॥६८॥
अंगुष्ठजपे एक पुण्य । पर्वांगुलीने दशगुण । शंखमणीने होय शतगुण । प्रवालमाला सहस्त्रफळ ॥६९॥
स्फटिकमणि दहासहस्त्र । मौक्तिके पुण्य लक्षाधिक । पद्माक्षी निर्गुण जप । दशलक्ष पुण्य असे ॥४७०॥
कोटुगुणे सुवर्णमाला । कुश रुद्राक्ष अनंतफला । जप करा नित्य काळा । गौप्यमाला धरोनिया ॥७१॥
गौप्यमाला करकमळी । जप करा निश्चली । सौख्य पावे अनंत फळी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥७२॥
जप करिता नुल्लंघिजे मेरु । उल्लंघिता पाप बोलिले अपारु । प्राणायाम केलिया त्रिवारु । मेरुलंघनपाप जाय ॥७३॥
गायत्रीजप तीन दिवस । प्रत्यही करावा एकादश । सर्व पातके होती नाश । त्रिरात्रीचे पाप जाय ॥७४॥
अष्टोत्तरशत जप करिता । अघोर पातक जाय त्वरिता । करोनि सहस्त्र जप एकाग्रता । उपपातके नासती ॥७५॥
महापातकादि दोषासी । कोटि जप करावा परियेसी । जे जे कर्म इच्छिसी । त्वरित होय अवधारा ॥७६॥
जप करावा मन दृढे । न पहावे मागे पुढे । शूद्रादिक यातीकडे । संभाषण न करावे ॥७७॥
द्रव्य घेवोनि एखाद्यासी । जपता होय अनंतदोषी । चांडाळयोनीत भरवसी । जन्म पावे परियेसा ॥७८॥
कंडू नये शरीर आपुले । नेणता जरी इतुके घडले । श्रोत्राचमन करा वहिले । दोष नाही अवधारा ॥७९॥
ब्राह्मणाचे दक्षिणकर्णी । सप्त देवता ऐका निर्गुणी । स्पर्श करिता तत्क्षणी । पापे जाती परियेसा ॥४८०॥
दृष्टी पडता चांडाळासी । द्विराचमने शुद्ध होसी । संभाषण झालिया पतितासी । आचमनस्नान करावे ॥८१॥
जपता निद्रा येई जरी । अधोवायु जांभई आलियावरी । क्रोधरूपे जपता जरी । पापरूपे अवधारा ॥८२॥
मौन्य करावे हे उत्तमी । अगत्ये बोलिजे संधिविषयी । तद्विष्णो मंत्र जपता कर्मीं । पापे जाती सकळिक ॥८३॥
नेणता घडे इतुके जरी । आचमन करावे श्रोत्री । अग्नि सूर्यधेनुदर्शन करी । विष्णुमंत्र जपावा ॥८४॥
ऐसा जप करावा विधीने । मनकामना होय पूर्ण । ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि सांगे पराशर ॥८५॥
गायत्री जपावी ऐशी । प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषि । उदुत्यं मंत्र माध्याह्नेसी । इमं मे वरुण सायंकाळी ॥८६॥
शाखापरत्वे मंत्र असती । म्हणावे विधि जैसे असती । गोत्र प्रवर म्हणा भक्ती । वृद्धाचाराप्रमाणे ॥८७॥
चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा करावी सगुणी । गोत्र प्रवर उच्चारोनि । नमस्कार करा परियेसा ॥८८॥
ऐसी संध्या करून । मग करावे औपासन । सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥८९॥
साय्म्प्रातवेला दोन्ही । औपासन करावे सगुणी । मिळोनि न करावे द्विजजनी । सर्वांनी पृथक्‍ पृथक्‍ हेचि जाणा ॥४९०॥
न करावे वेळणी आळंद्यात । भूमीवरी न करा नित्य । स्थंडिली करावे विहित । अथवा उदके सारवावे ॥९१॥
कुंडी स्थापोनि अग्नीसी । करावे नित्य उपासनेसी । वारा घालो नये त्यासी । हाते पर्णी आणि सुपे ॥९२॥
व्याधिष्ठ पर्णवाते होय । सुपे दरित्र धनक्षय । मुखे फुंकिलिया आयुष्य जाय । हस्तमूली होय मृत्यु ॥९३॥
फुंकणी अथवा विंझण्यासी । वायु घालावा अग्नीसी । काष्ठे समृद्धि परियेसी । ज्वलित असावा अग्नि देखा ॥९४॥
ज्वाला निघती जये स्थानी । आहुति घालावी तया वदनी । समिधा आणाव्या ब्राह्मणी । शूद्रहस्ते घेऊ नये ॥९५॥
समिधा पुष्पे दूर्वा देखा । आणो नये शूद्रे ऐका । होमद्रव्ये होती विशेखा । सांगेन नावे परियेसा ॥९६॥
साळी सावे नीवार । तंदुल असती मनोहर । गोधूम जव निर्धार । यावनाळ मुख्य असे ॥९७॥
साठी दाणे मिति प्रमाण । आहुति मुख्य कारण । अधिक न कीजे अथवा न्यून । घृतसंपर्क करावे ॥९८॥
घृत नसेल समयासी । तिल पवित्र होमासी । तिळांचे तैल परियेसी । तेही पवित्र असे देखा ॥९९॥
औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ तर्पण करी । सांगेन विधि अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥५००॥
मुख्य सकळ प्रातःकर्म सारोनि । ब्रह्मयज्ञ करावा माध्याह्नी । उपासनादि कर्मै करोनि । मग करावा ब्रह्मयज्ञ ॥१॥
उदकसन्निध मुख्य स्थानी । करावे तर्पण ब्राह्मणी । प्राणायाम तीन करोनि । विद्युदसि मंत्र जपावा ॥२॥
दूर्वा घेऊनि दक्षिण करी । पूर्वमुख अथवा उत्तरी । बसावे वाम पादावरी । दक्षिण पाद ठेवोनि ॥३॥
उभयहास्तसंपुटेसी । ठेवावे दक्षिण जानुवासी । म्हणावे तीन प्रणवांसी । मग म्हणावे ऋचाक्षर ॥४॥
ॐ भू० ऐसे म्हणोनि । त्रिपदा गायत्री उच्चारोनि । तत्स० म्हणोनि । मग जपावी दश वेळा ॥५॥
स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसी । अनध्याय होय तया दिवसी । एक ऋचा म्हणा पन्नासा ॥६॥
तोही नये एखाद्यासी । मंत्र म्हणावा विशेषी । नमो ब्रह्मणे मंत्रासी । तीन वेळा जपावा ॥७॥
वृष्टिरासि मंत्रासी । जपोनि स्पर्शावे उदकासी । तर्पण करावे परियेसी । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥८॥
ब्रह्मयज्ञ करावयासी । द्रव्य दर्भ परियेसी । वसुरुद्रआदित्यांसी । तृप्त समस्त देव पितर ॥९॥
एखादे दिवसी न घडे जरी । अथवा होय समय रात्री । जप करावा गायत्री । वेदपठण फल असे ॥५१०॥
देवतर्पण कुशाग्रेसी । मध्यस्थाने तृप्त ऋषि । मुळे पितृवर्गासी । तर्पण करावे परियेसा ॥११॥
न करावे तर्पण पात्रात । करावे आपण उदकात । भूमीवरी घरी नित्य । निषिद्ध असे करू नये ॥१२॥
दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण करावे अवधारी । विधियुक्त भक्तिपुरःसरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥
तीळ धरोनि आपुल्या करी । तर्पण करावे अवधारी । ठेवो नये शिळेवरी । भूमी काष्ठपात्री देखा ॥१४॥
रोमकूपादि स्थानी देखा । तीळ ठेविता पावती दुःखा । तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध बोलली स्थाने पाच ॥१५॥
घरी तर्पण करावयासी । तीळ अग्राह्य परियेसी । करावे आपण उदकासी । ऐका समस्त ऋषिजन ॥१६॥
श्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण ऋषिजनांसी । कृष्णवर्ण पितरांसी । तीळतर्पण करावे ॥१७॥
यज्ञोपवीती सव्ये देवांसी । निवीती करावी ऋषींसी । अपसव्य पितरांसी । तर्पण करावे येणे रीती ॥१८॥
देवासी अंजुलि एक । ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक । पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण ऐसे करावे ॥१९॥
स्त्रियांसी अंजुलि एक देखा । व्यतिरिक्त बंधूसी एक । सपत्‍नी आचार्य नामिका । द्वयांजुलि करावे ॥५२०॥
देवब्रह्मऋषीश्वरांसी । अक्षता मुख्य तर्पणासी । कृष्णतिलतर्पण पितरांसी । अनंत पुण्ये परियेसा ॥२१॥
आदित्य शुक्रवारेसी । प्रतिपदा मघा नक्षत्रासी । षष्ठी नवमी एकादशीसी । तिलतर्पण करू नये ॥२२॥
अथवा विवाह उपनयनासी । जन्मनक्षत्र जन्मदिवसी । आपुल्या घरी शुभदिवसी । तिलतर्पण करू नये ॥२३॥
जधी न करी तिलतर्पण । उदके मुख्य करा जाण । मुद्रिका हस्ती सुवर्ण । दर्भपवित्रे करावे ॥२४॥
पाय न धुता मंगलस्नान । तिलावीण करिता तर्पण । श्राद्ध करी दक्षिणेविण । निष्फल असे अवधारी ॥२५॥
निषिद्ध बोलिले ज्या दिवसी । तर्पण करावे उदकेसी । दिपवाळी चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसा ॥२६॥
अंगारक कृष्ण चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसी । यमाचे नावे विधींसी । यज्ञोपवीत सव्याने ॥२७॥
एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि देऊनि । यमाचे नाव उच्चारोनि । तर्पण करावे भक्तीने ॥२८॥
यमाची नावे त्रयोदशी । सांगेन ऐका विस्तारेसी । यम धर्मराजा परियेसी । मृत्यु अंतक चौथा जाणा ॥२९॥
वैवस्वत काल देखा । सर्वभूतक्षय ऐका । आठवा औदुंबरनामिका । नीलाय परमेष्ठी दहा जाणा ॥५३०॥
वृकोदर चित्ररेखा । चित्रगुप्त त्रयोदशिका । प्रत्येक नामे म्हणोनि एकेका । नदीत द्यावे परियेसा ॥३१॥
समस्त पातके नासती । रोगराई न पीडिती । अपमृत्यु कधी न येती । ग्रहपीडा न बाधे ॥३२॥
शुक्लपक्षी माघमासी । तर्पण करावे अष्टमीसी । भीष्मनामे परियेसी । वर्षपातके परिहरती ॥३३॥
ऐसे तर्पण करोनि । सूर्यनामे अर्घ्यै तिन्ही । द्यावी समस्त द्विजजनी । म्हणे नृसिंहसरस्वती ॥३४॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । कृपामूर्ति स्वामी कर्मविधिसी । सांगता झाला ब्राह्मणासी । येणेपरी विहिताचार ॥३५॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । ऐसा ब्राह्मणांचा आचार । वर्तता होय मनोहर । सर्वाभीष्टे साधतील ॥३६॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । नामधारक शिष्य संवादत । वेदोपनिषदमतितार्थ । आचारनिरूपणाध्याय हा ॥५३७॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्‍त्रिंशोऽध्यायः ॥३६॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु । ओवीसंख्या ॥५३७॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु