रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (12:30 IST)

गुरुचरित्र – अध्याय पस्तीसावा

Shri Guru Charitra Adhyay 35
॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
नामधारक सिद्धासी । विनवीतसे परियेसी ।
रुद्राध्याय विस्तारेसी । दंपतीसी सांगितला ॥१॥
 
पुढे काय वर्तले । विस्तारोनि सांगा वहिले ।
मन माझे वेधले । गुरुचरित्र ऐकावया ॥२॥
 
सिद्ध म्हणे ऐक ताता । अपूर्व असे पुढे कथा ।
तेचि जाण पतिव्रता । श्रीगुरूते विनवीत ॥३॥
 
कर जोडोनि गुरूसी । विनवीतसे भक्तीसी ।
आम्हा गति पुढे कैसी । कवणेपरी असावे ॥४॥
 
या कारणे आपणासी । एखादा मंत्र उपदेशी ।
जेणे होय स्थिर जीवासी । चरणस्मरण सनातन ॥५॥
 
श्रीगुरु म्हणती तियेसी । स्त्रियांसी मंत्र उपदेशी ।
पतिभक्तीविणे त्यांसी । उपदेशासी देऊ नये ॥६॥
 
देता उपदेश स्त्रियांसी । विघ्न असे मंत्रासी ।
पूवी शुक्राचार्यासी । झाले असे परियेसा ॥७॥
 
ऐसे ऐकता गुरुवचन । विनवीतसे कर जोडून ।
स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥
 
विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥
 
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ।
युद्ध देवदैत्यांसी । सदैव होय अवधारा ॥१०॥
 
दैत्यसैन्य पडे रणी । शुक्र जपे संजीवनी ।
सकळ सैन्य उठवूनि । पुनरपि युद्धा पाठवीत ॥११॥
 
इंद्र वज्रे असुर मारी । शुक्र अमृत जप करी ।
सवेचि येती निशाचरी । देवसैन्य मारावया ॥१२॥
 
ऐसे होता एके दिवसी । इंद्र गेला कैलासासी ।
सांगे स्थिति शिवासी । शुक्राचार्याची मंत्रकरणी ॥१३॥
 
कोपोनिया ईश्वर । नंदीस सांगे उत्तर ।
तुवा जावोनि वेगवक्त्र । शुक्राचार्या धरोनि आणी ॥१४॥
 
स्वामीचे वचन ऐकोनि । नंदी गेला ठाकोनि ।
होता शुक्र तपध्यानी । मुखी धरिला नंदीने ॥१५॥
 
नंदी नेत शिवापासी । आकांत वर्तला दैत्यांसी ।
ईश्वरे प्राशिले शुक्रासी । अगस्ती सिंधूचियापरी ॥१६॥
 
ऐसा कित्येक दिवसांवरी । होता शुक्र शिवाचे उदरी ।
निघूनि गेला मूत्रद्वारी । विसर पडला शिवासी ॥१७॥
 
पूर्वी होते शुक्र नाव । ईश्वर-उदरी झाला उद्‍भव ।
नाव पावला भार्गव । पुनः संजीवनी जपे तो ॥१८॥
 
इंद्र मनी विचारी । पुरोहितासी पाचारी ।
कैसा शुक्र जिवंत करी । पुनः दैत्यजनांसी ॥१९॥
 
त्यासी विघ्न करावे एक । तू पुरोहित विवेकयुक्त ।
बुद्धि विचारी अनेक । बृहस्पति गुरुराया ॥२०॥
 
पाहे पा दैत्यांचे दैव कैसे । शुक्रासारिखा गुरु विशेषे ।
देतो जीवासी भरवसे । दैत्य येती युद्धासी ॥२१॥
 
तैसा तू नव्हेस आम्हांसी । आम्हाते का उपेक्षिसी ।
देवगुरु तू म्हणविसी । बुद्धि करी शीघ्र आता ॥२२॥
 
तू पूज्य सकळ देवांसी । जरी आम्हा कृपा करिसी ।
शुक्राचार्य काय विशेषी । तुजसमान नव्हे जाणा ॥२३॥
 
ऐसे नानापरी देख । इंद्र अमरनायक ।
पूजा करी उपचारिक । बृहस्पति संतोषला ॥२४॥
 
गुरु म्हणे इंद्रासी । यासी ऐक तू उपायासी ।
षट्‍कर्णी करावे मंत्रासी । सामर्थ्य राहील शुक्राचे ॥२५॥
 
एखादा पाठवावा शुक्रापासी । विद्यार्थी करून त्वरेसी ।
मंत्र शिकेल भरवसी । विद्यार्थिरूपेकरूनिया ॥२६॥
 
आपुला पुत्र कच असे । त्याते पाठवू विद्याभ्यासे ।
मंत्र शिकेल आहे कैसी । संजीवनी अवधारा ॥२७॥
 
कचाते आणूनि बुद्धियुक्ति । सांगतसे बृहस्पति ।
तुवा जावे शुक्राप्रती । विद्यार्थिरूप धरोनि ॥२८॥
 
आमुची निंदा तेथे करी । मनोभावे सेवा करी ।
संजीवनी कवणेपरी । मंत्र शिके पुत्रराया ॥२९॥
 
इंद्रादिक देवतांचा । निरोप घेऊनि पितयाचा ।
शुक्राप्रति गेला कचा । विद्यार्थिरूप धरोनि ॥३०॥
 
नमन केले साष्टांगी । उभा राहिला करुणांगी ।
शुक्र पुसतसे वेगी । कवण कोठूनि आलासी ॥३१॥
 
बोले आपण द्विजकुमार । तुझी कीर्ति ऐकिली थोर ।
विद्याभ्यासीन मनोहर । म्हणोन आलो सेवेसी ॥३२॥
 
सेवक होईन तुमचे चरणी । आलो इच्छेसी धरूनि ।
तू भक्तवत्सलशिरोमणि । अनाथांचा प्रतिपालक ॥३३॥
 
बोलोनि ऐसे कचवचन । विनवीतसे कर जोडून ।
शुक्रकन्या जवळी येऊन । पितयालागी विनवित ॥३४॥
 
पितयासी म्हणे देवयानी । विप्र भला दिसे नयनी ।
याते तुम्ही शिष्य करूनि । विद्याभ्यास सांगावा ॥३५॥
 
कच सुंदर सुलक्षण । जैसा दिसे की मदन ।
देवयानी करी चिंतन । ऐसा पति व्हावा म्हणे ॥३६॥
 
ऐसी वासना धरुनी । पितयाते विनवुनी ।
शिष्य केला कच सगुणी । शुक्राचार्य विद्या सांगे ॥३७॥
 
ऐसा विद्याभ्यास करीत । दैत्यकुळी म्हणती निश्चित ।
देवगणी आले सत्य । कपटवेषे करूनि ॥३८॥
 
शिकूनिया विद्येसी । जाऊनि शिकवील देवांसी ।
कुडे होईल आम्हांसी । तेणे मनी चिंतावले ॥३९॥
 
काळ क्रमिता एके दिवसी । कच पाठविला समिधांसी ।
दैत्य जाती साह्येसी । तया कचाचे अवधारा ॥४०॥
 
रानी जाउनी समागमेसी । दैत्य मारिले कचासी ।
समिधा घेवोनि घरासी । दैत्य आपण येते झाले ॥४१॥
 
शुक्राचार्यांची कन्या । पितयासी परम मान्या ।
पितयासी विनवी धन्या । कच कैसा नाही आला ॥४२॥
 
कच आलियावाचूनी । भोजन न करी देवयानी ।
ऐसे ऐकता निर्वाणी । शुक्राचार्य चिंतावला ॥४३॥
 
ज्ञानी पाहे मानसी । मृत्यु झाला असे तयासी ।
मंत्र जपूनि संजीवनीसी । त्वरित घरी आणिला ॥४४॥
 
आणिक होता बहुत दिवस । दैत्य करिती अतिद्वेष ।
गेला होता वनवास । पुनरपि तयासी वधियेले ॥४५॥
 
मागुती वाचेल म्हणोनि । चूर्ण करिती छेदोनि ।
दाही दिशा टाकुनी । आले घरा पुनरपि ॥४६॥
 
दिवस गेला अस्तमानी । पुसतसे देवयानी ।
कच न दिसे म्हणोनि । पितयाते विनवीत ॥४७॥
 
कच माझा प्राणसखा । ना आणिशी जरी खाईन विखा ।
दावी मज तयाचे मुखा । म्हणोनि प्रलाप करीतसे ॥४८॥
 
कन्येवरी ममत्व बहुत । तेणे शुक्र ज्ञाने पहात ।
छिन्नभिन्न केले म्हणत । मंत्र जपला संजीवनी ॥४९॥
 
धन्य मंत्राचे सामर्थ्य । कच आला घरा त्वरित ।
देवयानी संतोषत । पितयाने आलिंगिली ॥५०॥
 
दैत्य मनी विचार करिती । काय केल्या न मरे म्हणती ।
गुरुकन्येसी याची प्रीति । म्हणुनि गुरु वाचवितो ॥५१॥
 
आता उपाय करू यासी । उदईक येईल एकादशी ।
मारूनि मिळवू पानेसी । गुरुमुखी पाजावे ॥५२॥
 
ऐशी निगुती करोनि । आली एकादशी दिनी ।
कचाते बाहेर नेवोनि । मारते जहाले दैत्य शिष्य ॥५३॥
 
प्राशन करविती गुरूसी । मिळवूनिया मद्यरसी ।
स्निग्ध मिळवूनिया बहुवसी । शुक्रगुरूसी देत झाले ॥५४॥
 
मागुती पुसे देवयानी । पितयाते विनवुनी ।
कचासी आणी म्हणोनि । रुदन करी आक्रोशे ॥५५॥
 
शुक्र पहातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी ।
खेद करीतसे मनी । कन्यालोभेकरोनिया ॥५६॥
 
विचार करिता सर्वा ठायी । दिसू लागला आपुले देही ।
संदेह पडला शक्रासी पाही । कैसे करावे म्हणोनि ॥५७॥
 
कन्येसी म्हणे शुक्र देखा । कच न ये आता ऐका ।
माझे उदरी असे निका । कैसा काढू तयासी ॥५८॥
 
यासी काढिता आपणासी । मृत्यु होईल परियेसी ।
काय अभिलाष असे त्यासी । म्हणोनि कन्येसी पुसतसे ॥५९॥
 
पितया विनवी देवयानी । अभिलाष होता माझे मनी ।
भार्या त्याची होउनी । दोघे राहू तुजपासी ॥६०॥
 
हाचि व्हावा माझा पति । ऐसे संकल्पिले चित्ती ।
न उठे जरी पुढती । तरी प्राण त्यागीन ॥६१॥
 
संदेह पडला शुक्रासी । बोधिता झाला कन्येसी ।
त्यास उठविता आपणासी । मृत्यू होईल अवधारी ॥६२॥
 
कन्या म्हणे पितयासी । सकळा तू वाचविसी ।
आपुला प्राण जाईल म्हणसी । हे आश्चर्य वाटतसे ॥६३॥
 
शुक्र म्हणे देवयानी । मंत्र असे संजीवनी ।
मजवाचोनि नेणे कोणी । माते कोण उठवील ॥६४॥
 
मंत्र सांगो नये कवणा । षट्‍कर्णी होता जाईल गुणा ।
कचाकरिता माझा प्राण । जाईल देखा अवधारी ॥६५॥
 
न ऐके कन्या देवयानी । पित्याचे चरण धरोनि ।
विनवीतसे कर जोडोनि । मंत्र आपणाते शिकवावा ॥६६॥
 
कचासी तू सजीव करी । तुज येईल मृत्यू जरी ।
मी मंत्र जपोनि निर्धारी । सजीव करीन तुजलागी ॥६७॥
 
शुक्र म्हणे कन्येसी । मंत्र सांगू नये स्त्रियांसी ।
दोष असता परियेसी । वेदशास्त्रसंमत असे ॥६८॥
 
स्त्रियांसी मंत्र पतिभक्ति । जपू नये मंत्रयुक्ति ।
सांगता दोष आम्हा घडती । मंत्रसामर्थ्य जाईल ॥६९॥
 
पितयासी म्हणे देवयानी । सुखे असा मंत्र जपोनि ।
प्राण जातो म्हणोन । मूर्च्छागत पडली ते ॥७०॥
 
शुक्राची कन्येवरी प्रीति । उठवूनि तिसी आलिंगिती ।
मंत्र तिसी सांगती । संजिवनी अवधारा ॥७१॥
 
आपुल्या पोटी कच होता । तोही होय ऐकता ।
मंत्र जहाला षट्‍कर्णता । मग जपला कचानिमित्त ॥७२॥
 
शुक्राचे पोटातुनी । कच निघाला फोडुनी ।
मंत्र जपे ती देवयानी । पितयाते उठविले ॥७३॥
 
तीन वेळा मंत्र जपता । कचे पाठ केला तत्त्वता ।
संतोष करी मनी बहुता । कार्य साधले म्हणोनि ॥७४॥
 
शुक्राचार्याते नमुनी । कच विनवी कर जोडुनी ।
माते दैत्य मारिती म्हणोनि । निरोप द्यावा मजलागी ॥७५॥
 
स्वामीचेनि विद्या शिकलो । तुझे कृपेने पूर्ण जहालो ।
देवकार्यार्थ संतोषलो । म्हणूनि चरणी लागला ॥७६॥
 
शुक्राचार्ये हर्षोनि । निरोप दिधला त्यालागोनी ।
पदर धरी देवयानी । पति व्हावे म्हणोनिया ॥७७॥
 
तूते मारिले तीन वेळी । मी वाचविले त्या काळी ।
विद्या शिकलासी पित्याजवळी । अवश्य वरावे मजलागी ॥७८॥
 
कच म्हणे ऐक बाळे । गुरुकन्या भगिनी बोले ।
तुवा आमुते वाचविले । माता होसी निर्धारी ॥७९॥
 
वरिता दोष आपणासी । दूषण ठेवितील सर्व ऋषि ।
भगिनी तू आमुची होसी । कैसी वरू म्हणे तो ॥८०॥
 
देवयानी कोपोनि । शाप दिधला ते क्षणी ।
वृथा विद्या होईल मानी । समस्त विसरे तात्काळी ॥८१॥
 
माझे अंतःकरणीची आशा । वृथा केली निराशा ।
विद्या न ये तुज लवलेशा । म्हणूनि शाप दिधला ॥८२॥
 
कच म्हणे तियेसी । वाया शापिले आम्हांसी ।
पुरुष वरील तुजसी । ब्रह्मकुळाव्यतिरिक्त ॥८३॥
 
तुझा पिता ब्रह्मज्ञानी । जाणे अमृतसंजीवनी ।
तुज शिकविले म्हणोनि । पुढे मंत्र न चाले ॥८४॥
 
ऐसा शाप देउनी । कच गेला निघुनी ।
संतोष झाला इंद्रभुवनी । दैत्यजीवन नव्हेची ॥८५॥
 
शुक्राचा संजीवनी मंत्र । कामा न ये झाला अपात्र ।
स्त्रियांसी न सांगावा मंत्र । म्हणोनि श्रीगुरु निरूपिती ॥८६॥
 
स्त्रियांलागी पतिसेवा । याची कारणे मंत्र न द्यावा ।
व्रतोपवास करावा । गुरु-पुरुष-निरोपाने ॥८७॥
 
सावित्री विनवी श्रीगुरूसी । व्रत आचरले बहुवसी ।
तुझे वाक्य आम्हांसी । व्रत एखादे निरोपावे ॥८८॥
 
तुजवरी माझा विश्वास । तुजवाचोनि नेणू आणिकास ।
व्रत तूचि आम्हांस । व्रत तुझी चरणसेवा ॥८९॥
 
भक्ति राहे तुझे चरणी । ऐसा निरोप द्यावा मुनि ।
म्हणुनी लागली चरणी । कृपा करी म्हणोनिया ॥९०॥
 
श्रीगुरु म्हणती तियेसी । सांगेन तुज व्रत ऐसी ।
स्थिर होय अहेवपणासी । राज्य पावे तुझा पति ॥९१॥
 
दंपत्य विनवी श्रीगुरूसी । तुझे वाक्य कारण आम्हासी ।
जैसा तू निरोप देसी । तेणे रीती रहाटू ॥९२॥
 
जो गुरुवाक्य न करी । तो पडे रौरवघोरी ।
तुझे वाक्य आम्हा शिरी । म्हणूनि चरणी लागली ॥९३॥
 
भक्तवत्सल श्रीगुरुनाथ । सांगता जहाला अतिप्रीत ।
विस्तारोनि समर्थ । व्रत तिसी सांगतसे ॥९४॥
 
सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरु म्हणती कौतुका ।
ऐकताती दंपती निका । अतिप्रीतिकरोनिया ॥९५॥
 
श्रीगुरु म्हणती तयांसी । सांगेन व्रत इतिहासी ।
ऋषि पुसती सूतासी । व्रत बरवे निरोपावे ॥९६॥
 
सूत म्हणे ऋषीश्वरा । व्रत सांगेन मनोहरा ।
स्त्रिया अथवा पुरुषा बरा । व्रत असे अवधारा ॥९७॥
 
नित्यानंद असे शांत । निर्विकल्प विख्यात ।
ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित । सकळाभीष्टे पाविजे ॥९८॥
 
संसारसागरात । विषयातुर आचरत ।
तेही पूजिता पूर्ण भक्त । त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥९९॥
 
विरक्त अथवा संसाररत । विषयातुर आसक्त ।
जे पूजिती पूर्ण भक्त । त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥१००॥
 
तेणे पाविजे पैलपार । ऐसे बोलती वेदशास्त्र ।
स्वर्गापवर्गा अधिकार । त्यासी होय परियेसा ॥१॥
 
विशेष व्रत असे ऐक । सोमवार व्रतनायक ।
ईश्वरार्चन करा विवेक । सकळाभीष्टे पाविजे ॥२॥
 
नक्त भोजन उपवासी । जितेंद्रिय करा विशेषी ।
वैदिक तांत्रिक पूजेसी । विधिपूर्वक सकळिक ॥३॥
 
गृहस्थ अथवा ब्रह्मचारी । सुवासिनी कन्याकुमारी ।
भर्तृविण विधवा नारी । व्रत करावे अवधारा ॥४॥
 
याचे पूर्वील आख्यान । सांगेन ऐका अतिगहन ।
ऐकता करी पावन । सकळासही परियेसा ॥५॥
 
स्कंदपुराणींची कथा । सर्व साद्यंत ऐका ।
पूर्वयुगी आर्यावर्तका । राजा एक अवधारा ॥६॥
 
चित्रवर्मा नाम त्यासी । धर्मात्मा राजा परियेसी ।
धर्ममार्ग आचरे हर्षी । अधर्माते शिक्षा करी ॥७॥
 
अखिल पुण्ये त्याणे केली । सकल संपत्ति वाढविली ।
समस्त पृथ्वी जिंकिली । पराक्रमेकरूनिया ॥८॥
 
सहपत्‍नी धर्म करिती । पुत्रकाम्ये शिवाप्रती ।
ऐसा किती काळ क्रमिती । कन्या झाली तयाते ॥९॥
 
अतिसुंदर सुलक्षण । पार्वतीरूपासमान ।
तेज फाके सूर्यकिरण । अतिलावण्य न वर्णवे ॥११०॥
 
वर्तावया जातकासी । बोलाविले ज्योतिषी ।
द्विज मिळाले अपारेसी । वर्तविती जातक ॥११॥
 
म्हणती कन्या सुलक्षण । नामे सीमंतिनी जाण ।
उमेसारखे मांगल्यपण । किंवा दमयंतीस्वरूप होय ॥१२॥
 
भागीरथीऐसी रूपासी । लक्ष्मीसारिखी गुणराशी ।
ज्ञाने देवमतासरसी । जानकीसमान पतिव्रता ॥१३॥
 
सूर्यासारिखी होईल कांति । चंद्रासमान मनशांति ।
दहा सहस्त्र वरुषे ख्याति । पतीसह राज्य करील ॥१४॥
 
जातक वर्तवले तिसी । राव पावला अतिहर्षी ।
अखिल दाने विप्रांसी । देता जाहला अवधारा ॥१५॥
 
असता राव सभेसी । द्विज एक परियेसी ।
भय न धरिता वाक्यासी । बोलतसे अवधारा ॥१६॥
 
ऐक राया माझे वचन । कन्यालक्षण मी सांगेन ।
चवदावे वर्षी विधवापण । होईल इयेसी जाण पा ॥१७॥
 
ऐसे वाक्य परिसोनि । राव पडिला मूर्छा येवोनि ।
चिंता वर्तलि बहु मनी । विप्रवाक्य परिसता ॥१८॥
 
ऐसे सांगोनि ब्राह्मण । गेला निघोनि तत्क्षण ।
सर्व दुःखाते पावून । तळमळीत तेधवा ॥१९॥
 
ऐसे बालपण क्रमिता । सप्त वर्षे जाती तत्त्वता ।
चिंतीत होती मातापिता । वर्‍हाड केवी करावे ॥१२०॥
 
चवदावे वर्षी विधवापण । म्हणोनि बोलिला ब्राह्मण ।
तेणे व्याकुळ अंतःकरण । राजा-राजपत्‍नीचे ॥२१॥
 
कन्या खेळे राजांगणी । सवे सखयाते घेवोनि ।
बोलता ऐकिले विप्रवचनी । चौदावे वर्षी विधवत्व ॥२२॥
 
ऐसे ऐकोनि वचन । कन्या करीतसे चिंतन ।
वर्तता आली एक दिन । तया घरी ब्रह्मस्त्री देखा ॥२३॥
 
याज्ञवल्क्याचिया पत्‍नी । मैत्रेयी म्हणोनि ।
घरी आली देखोनि । चरण धरीत तेधवा ॥२४॥
 
भावे साष्टांग नमूनि । करसंपुट जोडोनि ।
विनवी करुणावचनी । माते प्रतिपाळी म्हणतसे ॥२५॥
 
सौभाग्य स्थिर होय जेणे । उपाय सांगे मजकारणे ।
चंचळ असे अंतःकरणे । म्हणूनि चरणी लागली ॥२६॥
 
कन्या विनवी तियेसी । ऐसे व्रत सांग आम्हांसी ।
आम्हा जननी तूचि होसी । व्रत सांग म्हणतसे ॥२७॥
 
ऐकोनि कन्येच्या वचना । बोले मैत्रेयी जाणा ।
शरण रिघावे उमारमणा । अहेवपण स्थिर होय ॥२८॥
 
सोमवार परियेसी । व्रत आचरी नेमेसी ।
पूजा करावी शिवासी । उपवास करुनी अवधारा ॥२९॥
 
बरवे सुस्नात होवोनि । पीतांबर नेसोनि ।
मन स्थिर करोनि । पूजा करावी गौरीहरा ॥१३०॥
 
अभिषेके पापक्षय । पीठ पूजिता साम्राज्य ।
गंधाक्षता पुष्पमाल्य । सौभाग्यसौख्य पाविजे ॥३१॥
 
सौगंध होय धूपाने । कांति पाविजे दीपदाने ।
भोग नैवेद्यार्पणे । तांबूलदाने लक्ष्मी स्थिर ॥३२॥
 
चतुर्विध पुरुषार्थ । नमस्कारिता त्वरित ।
अष्टैश्वर्यै नांदत । ईश्वरजप केलिया ॥३३॥
 
होमे सर्व कोश पूर्ण । समृद्धि होतसे जाण ।
करिता ब्राह्मणभोजन । सर्व देवता तृप्त होती ॥३४॥
 
ऐसे सोमवार व्रत । कन्ये करी वो निश्चित ।
भव आलिया दुरित । परिहरती महाक्लेश ॥३५॥
 
गौरीहरपूजा करिता । समस्त दुरिते जाती तत्त्वता ।
ऐकोनि सीमंतिनी तत्त्वता । अंगिकारिले व्रत देखा ॥३६॥
 
सोमवारचे व्रत । आचरे सीमंतिनी त्वरित ।
पिता देखोनि निश्चित । विवाहायोग्य म्हणोनि ॥३७॥
 
राजा विचारी मानसी । वर्‍हाड करावे कन्येसी ।
जैसे प्राक्तन असेल तिसी । तैसे घडो म्हणतसे ॥३८॥
 
विचारोनि मंत्रियांसी । पाठविता झाला राष्ट्रांसी ।
दमयंतीनळवंशी । इंद्रसेनाचा कुमारक ॥३९॥
 
चंद्रांगद वर बरवा । जैसा तेज चंद्रप्रभा ।
बोलाविले विवाहशोभा । कन्या दिधली संतोषे ॥१४०॥
 
राजे भूमांडलिक देखा । समस्त आले वर्‍हाडिका ।
वर्‍हाड झाले अतिकौतुका । महोत्साह नानापरी ॥४१॥
 
नाना द्रव्यालंकार । वर्‍हाडिका देई नृपवर ।
अखिल दाने देकार । विप्रालागी देता झाला ॥४२॥
 
पाठवणी केली सकळिका । जामात ठेविला कौतुका ।
कन्यास्नेह अनेका । म्हणोनि राहविले राजपुत्रा ॥४३॥
 
राजपुत्र श्वशुरगृही । स्त्रिया प्रीति अतिस्नेही ।
काळ क्रमिता एके समयी । जलक्रीडेसी निघाला ॥४४॥
 
कालिंदी म्हणिजे नदीसी । राजपुत्र परियेसी ।
सर्व दळ समागमेसी । गेला नदीसी विनोदे ॥४५॥
 
राजपुत्र निघे नदीत । सवे निघाले लोक बहुत ।
विनोदे असे पोहत । अतिहर्षे जलक्रीडा ॥४६॥
 
पोहता राजकुमार देखा । बुडाला मध्ये गंगोदका ।
आकांत झाला सकळिका । काढा काढा म्हणताती ॥४७॥
 
सवे सैन्य लोक सकळ । होते नावेकरी प्रबळ ।
उदकी पाहताती तये वेळ । न दिसे कोठे बुडाला ॥४८॥
 
उभय तटी सैन्यातून । धावत गेले राजसदना ।
व्यवस्था सांगती संपूर्ण । जामात तुमचा बुडाला ॥४९॥
 
कालिंदी नदीच्या डोहात । संगतीने होते पोहत ।
अदृश्य झाला त्वरित । न दिसे कुमार बुडाला ॥१५०॥
 
ऐकोनि राजा पडे धरणी । मूर्च्छना येऊनि तत्क्षणी ।
कन्या ऐकताच श्रवणी । त्यजू पाहे प्राणाते ॥५१॥
 
राजा कन्येसी संबोखित । आपण गेला धावत ।
राजस्त्रिया शोक करीत । कन्यादुःखे अतिबहु ॥५२॥
 
सीमंतिनी करी शोका । म्हणे देवा त्रिपुरांतका ।
शरण रिघालिया देखा । मरण कैसे न आले मज ॥५३॥
 
मृत्यु चवदा वर्षी जाण । म्हणोनि धरिले तुमचे चरण ।
वृथा गेले व्रताचरण । सोमवार शिवाचे ॥५४॥
 
तव देणे अढळ सकळा । मज उपेक्षिले जाश्वनीळा ।
अपकीर्ति तुज केवळा । शरणागता रक्षिसी ॥५५॥
 
स्मरण करी श्रीगुरूसी । याज्ञवल्क्यपत्‍नीसी ।
सांगितले व्रत आम्हांसी । सौभाग्य स्थिर म्हणोनिया ॥५६॥
 
तिचिया वाक्ये करूनि । पूजिली शिवभवानी ।
वृथा झाली माझे मनी । शीघ्र विनवी शिवासी ॥५७॥
 
ऐसे दुःखे प्रलापत । सीमंतिनी जाय रडत ।
गंगाप्रवेश करीन म्हणत । निघाली वेगे गंगेसी ॥५८॥
 
पिता देखोनि नयनी । धरावया गेला धावोनी ।
कन्येते आलिंगोनी । दुःख करी अत्यंत ॥५९॥
 
सकळ मंत्री पुरोहित । सर्व सैन्य दुःख करीत ।
बोलाविले नावेकरी त्वरित । पहा म्हणती गंगेत ॥१६०॥
 
गंगा सकळ शोधिती । न दिसे कुमार कवणे गती ।
शोक करीतसे सीमंती । राजा संबोखी तियेसी ॥६१॥
 
राजकुमाराचे सेवक । करू लागले बहु दुःख ।
सांगो गेले पुत्रशोक । इंद्रसेनाकारणे ॥६२॥
 
ऐकोनिया इंद्रसेन । दुःख करी अतिगहन ।
भार्येसहित धावून । आला तया मृत्युस्थळा ॥६३॥
 
दोघे राव मिळोन । शोक करिती दारुण ।
हा हा कुमारा म्हणोन । ऊर शिर पिटताती ॥६४॥
 
हा हा पुत्रा ताता म्हणत । राजा गडबडा असे लोळत ।
मंत्री राजकुळ समस्त । नगरलोक दुःख करिती ॥६५॥
 
कोठे गेला राजसुत । म्हणोनि सीमंतिनी रडत ।
खिन्न झाले समस्त । मातापितर श्वशुरादि ॥६६॥
 
कोणे स्थानी पति गेले । म्हणोनि सीमंतिनी लोळे ।
ललाट हस्ते पिटिले । पार नाही शोकासी ॥६७॥
 
सीमंतिनी म्हणे पितयासी । प्राण त्यजीन पतिसरसी ।
वाचूनिया संसारासी । वैधव्य कोण भोगील ॥६८॥
 
पुसे सकळ द्विजासी । करावे की सहगमनासि ।
विप्र सांगती रायासी । प्रेतावेगळे करू नये ॥६९॥
 
प्रेत शोधावे नदीत । दहन करावे कन्येसहित ।
न दिसे बुडाला गंगेत । केवी सहगमन होईल ॥१७०॥
 
आता इसी ऐसे करणे । प्रेत सापडे तववरी राखणे ।
ऐकोनिया द्विजवचने । राजा कन्ये विनवीतसे ॥७१॥
 
ऐसे व्याकुळ दुःखे करिती । मंत्री पुरोहित म्हणती ।
जे असेल होणार गती । ब्रह्मादिका चुकेना ॥७२॥
 
होणार जहाली देवकरणी । काय कराल दुःख करोनी ।
ऐसे मंत्री संबोखुनी । रायाते चला म्हणती ॥७३॥
 
निघाले राजे उभयता । मंदिरा पावले दुःख करिता ।
इंद्रसेन अति दुःखिता । न विसरे कधी पुत्रशोक ॥७४॥
 
राज्य-व्यापार सोडूनि । दुःख करी पुत्रचिंतनी ।
गोत्रजी राज्य हिरूनी । कपटे घेतले तयाचेच ॥७५॥
 
सहभार्या रायासी । ठेविते झाले कारागृहासी ।
पुत्रशोके बहु त्यासी । राज्यभोग चाड नाही ॥७६॥
 
चित्रवर्मा राव देखा । कन्या ठेविली ममत्विका ।
प्राण त्यजू पाहे निका । लोक निंदितील म्हणोनि ॥७७॥
 
राव म्हणे कन्येसी । पुत्र नाही आमुचे वंशी ।
कन्या एक तू आम्हांसी । पुत्रापरी रहाटावे ॥७८॥
 
लोक निंदितील आम्हांसी । वैधव्य आले परियेसी ।
वर्ष एक क्रमिलियासी । पुढे आचार करी वो बाळे ॥७९॥
 
पित्याचे वचन ऐकोनी । करीतसे बहु चिंतनी ।
म्हणे देवा शूळपाणि । केवी माते गांजिले ॥१८०॥
 
ऐसे विचारुनी मानसी । व्रत आचरे तत्परेसी ।
सोमवार उपवासासी । ईश्वरपूजा करीतसे ॥८१॥
 
इकडे तो राजकुमार । बुडाला होता गंगापूर ।
गेला जेथे पाताळनगर । वासुकी जेथे राज्य करी ॥८२॥
 
नागलोकीचिया नारी । आल्या होत्या नदीतीरी ।
राजकुमार आला पुरी । नदीतटाकी वहातसे ॥८३॥
 
देखोनिया नागकन्या । काढिती संतोषे करोनिया ।
अमृता शिंपिती आणुनिया । सावध केला तयाते ॥८४॥
 
कन्या मिळूनि त्यासी । घेवोनि जाती तक्षकापासी ।
विचित्र नगर परियेसी । राजपुत्र पहात असे ॥८५॥
 
पाहे पाताळनगर-रचना । जैसी शोभा इंद्रभुवना ।
गोपुरे दिसती महारत्‍ना । विद्युल्लतेपरी ॥८६॥
 
इंद्रनीळ वैडुर्यैसी । मानिके मुक्ताफळांसी ।
महारम्य पुरी जैसी । सूर्यकांति मिरवत ॥८७॥
 
चंद्रकांतिसरसी भूमि । महाद्वारे कपाट हेमी ।
अनेक रत्‍ने नाही उपमी । ऐशा मंदिरा प्रवेशला ॥८८॥
 
पुढे देखिली सभा थोर । समस्त बैसले सर्पाकार ।
आश्चर्य करी राजकुमार । असंख्य सर्प दिसताती ॥८९॥
 
सभेमध्ये अतिशोभित । मध्ये बैसला पन्नगनाथ ।
जैशी सूर्यकांति फाकत । अति उन्नत बैसला ॥१९०॥
 
अनेक शत फणा दिसती । जैशी वीज लखलखती ।
पीतांबरे सज्योती । रत्‍नकुंडलमंडित ॥९१॥
 
अनेकरत्‍नखचित देखा । मुकुट मिरवती सहस्त्र एका ।
सहस्त्रफणी मिरवे तक्षका । ऐसा सभे बैसला असे ॥९२॥
 
रूपयौवन नागकन्या । नानापरी भरणे लेवोनिया ।
अनेक सहस्त्र येवोनिया । सेवा करिती तक्षकाची ॥९३॥
 
ऐशा सभास्थानी देख । राव बैसला तक्षक ।
देखोनिया राजकुमारक । नमन करी साष्टांगी ॥९४॥
 
तक्षक पुसे नागकन्यांसी । कैचा कुमार आणिलासी ।
सुलक्षण दिसतो कैसी । कोठे होता म्हणे तया ॥९५॥
 
नागकन्या म्हणती त्यासी । नेणो नाम याचे वंशी ।
वहात आला यमुनेसी । घेऊन आलो तुम्हांजवळी ॥९६॥
 
तक्षक पुसे राजकुमारासी । नाम कवण कवणे वंशी ।
काय कारणे आलासी । कवण देशी वास तुझा ॥९७॥
 
सांगे राजकुमार देख । आम्ही भूमंडळनायका ।
नैषध राजपति ऐका । नळनामे पुण्यश्लोक ॥९८॥
 
त्याचा पुत्र इंद्रसेन । जन्म आमुचा त्यापासून ।
चंद्रांगद नामे आपण । गेलो होतो श्वशुरागृहा ॥९९॥
 
जलक्रीडा करावयासी । गेलो होतो यमुनेसी ।
विधिवशे आम्हांसी । बुडालो नदी अवधारा ॥२००॥
 
वहात आलो नदीत । नागकन्या मज देखत ।
घेवोनि आल्या तुम्हांप्रत । पूर्वभाग्ये करूनि ॥१॥
 
पूर्वार्जित पुण्यवंशी । भेटी झाली चरणांसी ।
धन्य माझे जीवित्वासी । कृतार्थ झालो म्हणतसे ॥२॥
 
करुणावचन ऐकोनि । तक्षक बोले संतोषोनि ।
नको भिऊ म्हणोनि । धैर्य तया दिधले ॥३॥
 
शेष म्हणे रे बाळा । तू आहेसी मन निर्मळा ।
तुमचे घरी सर्वकाळा । दैवत कोण पूजितसा ॥४॥
 
ऐसे ऐकोनि राजकुमार । हर्षे जहाला निर्भर ।
सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर ॥५॥
 
सकळ देवांचा देव । नाम ज्याचे सदाशिव ।
वामांगी उमा अपूर्व । त्यालागी पूजू निरंतर ॥६॥
 
ज्यापासोनि जनित ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपमा ।
तो सदाशिव आम्हा । निज दैवत निर्धारे ॥७॥
 
तयाच्या सत्त्वगुणेसी । विष्णु उपजला परियेसी ।
प्रतिपाळक लोकांसी । तो सदाशिव आराधितो ॥८॥
 
ज्याच्या तामसगुणे जाण । एकादश रुद्रगण ।
उपजले असती याकारण । प्रलयकर्ता या नाव ॥९॥
 
धाता विधाता आपण । उत्पत्तिस्थितिलयाकारण ।
तेजासी तेज असे जाण । तैसा ईश्वर पूजितसो ॥२१०॥
 
पृथ्वी आप तेजासी । जो पूर्ण वायु आकाशी ।
तैसा पूजितसो शिवासी । म्हणे राजकुमार देखा ॥११॥
 
सर्वां भूती असे संपूर्ण । चिन्मय आपण निरंजन ।
जो रूपे असे अचिंतन । तो ईश्वर पूजितसो ॥१२॥
 
ज्याची कथा वेद जहाले । तक्षक शेष ज्याची कुंडले ।
त्रिनेत्री असे चंद्र मोळे । तैसा शंकर पूजितसो ॥१३॥
 
ऐसे ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन ।
राजकुमारा आलिंगोन । तुष्टलो तुष्टलो म्हणतसे ॥१४॥
 
तक्षक बोले तये वेळी । तुज देईन राज्य सकळी ।
तुवा रहावे पाताळी । आनंदे भाग्य भोगीत ॥१५॥
 
माझ्या लोकी जे जे रत्‍न । ते ते देईन तुजकारण ।
पावोनिया समाधान । सुखे येथे रहावे ॥१६॥
 
पाताळ लोकीची रचना । पहावी तुवा अनुपमा ।
कल्पवृक्ष मनोरमा । आहेत माझ्या नगरात ॥१७॥
 
अमृत न देखती स्वप्नी कोणी । ते भरले असे जैसे पाणी ।
तळी बावी पोखरणी । अमृताच्या माझ्या घरात ॥१८॥
 
नाही मरण तव येथे । रोगपीडादि समस्ते ।
नेणती कोणी स्वप्नावस्थे । ऐसे नगर माझे असे ॥१९॥
 
सुखे रहावे येथे स्वस्थ । तक्षक कुमारक सांगत ।
राजपुत्र असे विनवीत । करुणावचने ॥२२०॥
 

राजपुत्र विनवी तक्षकासी । मी एकलाची पितयाचे कुशी । भार्या चतुर्दश वर्षी । शिवपूजनी रत सदा ॥२१॥
 
नूतन झाले माझे पाणिग्रहण । गुंतले तेथे अंतःकरण । पाहीन मातापिताचरण । तेणे सर्वस्व पावलो ॥२२॥
 
आपण बुडालो नदीत । पिता माता दुःख करीत । पत्‍नी जीव त्यागील सत्य । हत्या पडे मस्तकी ॥२३॥
देखिले तव चरण आपण । तेणे झालो धन्य धन्य । रक्षिला आपण माझा प्राण । दर्शन करा मातापिता ॥२४॥
 
तक्षक झाला संतोषित । नाना रत्‍ने त्यासी देत । अमृत पाजिले बहुत । आण्क दिधले स्त्रियेसी ॥२५॥
कल्पवृक्षफळे देती । अपूर्व वस्तु आभरणे त्यासी । जे अपूर्व असे क्षिती । अमोल्य वस्तु देता जहाला ॥२६॥
 
इतुके देवोनि कुमारकासी । तक्षक बोले परियेसी । जे जे काळी आम्हा स्मरसी । तव कार्य सिद्धि पावेल ॥२७॥
आणिक संतोषोनि चित्ती । वस्त्रे वाहने मागुती । तुरंग दिधले मनोगती । सवे दे कुमार आपुला ॥२८॥
 
चंद्रांगदकुमारासी । इतके दिधले आनंदेसी । निरोप दिधला परियेसी । वाहन तुरंग मनोहर ॥२९॥
तक्षका नमूनि त्वरित । वारूवरी आरूढ राजसुत । मनोवेगे मार्ग क्रमित । नागकुमार सवे जाणा ॥२३०॥
 
जिये स्थानी बुडाला होता । तेथे पावला क्षण न लागता । निघाला बाहेर वारूसहिता । नदीतटाकी उभा असे ॥३१॥
सोमवार त्या दिवशी । सीमंतिनी आली स्नानासी । सवे होत्या सखी सेवेसी । नदीतीरी उभी असे ॥३२॥
 
सीमंतिनी म्हणे सखियासी । आश्चर्य वाटे मानसी । उदकातुनी निघाला परियेसी । सवे असे नागपुत्र ॥३३॥
राक्षस होई की वेषधरू । रूप धरिले असे नरू । दिसतसे मनोहरू । तुरंगारूढ जाहला असे ॥३४॥
 
कैसे पहा हो रूप यासी । जेवी सूर्य प्रकाशी । दिव्यमालांबरे कैसी । सुगंध असे परिमळा ॥३५॥
दश योजनेपर्यंत । सुवास येतसे अमित । पूर्वी देखिला असे रूपवंत । भासे त्यासी पाहिला ॥३६॥
 
स्थिर स्थिर भयभीता । त्याचिया पहाती स्वरूपता । आपुला पतीसादृश्य म्हणता । रूप आठवी तये वेळी ॥३७॥
राजपुत्र पाहे तियेसी । म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी । गळसरी न दिसे कंठासी । हार नसे मुक्ताफळ ॥३८॥
 
अवलोकितसे अंगखूण । न दिसे हळदी करी कंकण । चित्ती व्याकुळ रूपहीन । सदृश दिसे प्राणेश्वरी ॥३९॥
मनी विचरी मागुता । रूप तिचे आठविता । तुरंगावरूनि उतरता । नदीतीरी बैसला असे ॥२४०॥
 
बोलावोनि तियेसी । पुसतसे अति प्रेमेसी । तुझा जन्म कवणे वंशी । पुरुष तुझा कोण सांगे ॥४१॥
का कोमाइलीस बाळपणी । दिससी शोके म्लान लक्षणी । सांगावे मज विस्तारोनि । अति स्नेहे पुसतसे ॥४२॥
 
ऐकोनि सीमंतिनी देखा । आपण न बोले लज्जे ऐका । सखियांसी म्हणे बालिका । वृत्तान्त सांगा समस्त ॥४३॥
सखिया सांगती तयासी । हे सीमंतिनी नाम परियेसी । चंद्रांगदाची महिषी । चित्रवर्म्याची हे कन्या ॥४४॥
 
इचा पति अतिसुंदर । चंद्रांगद नामे थोर । जळक्रीडा करिता फार । येथे बुडाला नदीत ॥४५॥
तेणे शोक करिता इसी । वैधव्य आले परियेसी । दुःख करीत तीन वर्षी । लावण्य इचे हरपले ॥४६॥
 
सोमवारव्रत करीत । उपवास पूजादि आचरत । आज स्नानानिमित्त । आली असे नदीसी ॥४७॥
इच्या श्वशुराची स्थिति देखा । पुत्रशोके विकळ ऐका । राज्य घेतले दायादिका । कारागृही घातले ॥४८॥
 
या कारणे सीमंतिनी । नित्य पूजी शूलपाणि । सोमवार उपोषणी । म्हणोनि करिती परियेसा ॥४९॥
इतके सख्या सांगती । मग बोले आपण सीमंती । किमर्थ पुसता आम्हांप्रती । आपण कोण कंदर्परूपी ॥२५०॥
 
गंधर्व किंवा तुम्ही देव । किन्नर अथवा सिद्ध गंधर्व । नररूप दिसता मानव । आमुते पुसता कवण कार्या ॥५१॥
स्नेह्भावे करोनी । पुसता तुम्ही अति गहनी । पूर्वी देखिले होते नयनी । न कळे खूण म्हणतसे ॥५२॥
 
आप्तभाव माझ्या मनी । स्वजन तसे दिसता नयनी । नाम सांगा म्हणोनि । आठवी रूप पतीचे ॥५३॥
आठवोनि पतीचे रूप । करू लागली अति प्रलाप । धरणी पडली रुदितबाष्प । महादुःख करीतसे ॥५४॥
 
तियेचे दुःख देखोनि नयनी । कुमार विलोकी तटस्थपणी । मुहूर्त एक सावरोनि । आपण दुःख करीतसे ॥५५॥
दुःख करोनिया देखा । प्रक्षाळिले आपुल्या मुखा । उगी राहे म्हणे ऐका । आमुचे नाम सिद्ध म्हणे ॥५६॥
 
सीमंतिनी करिता शोक अपार । जवळी आला राजकुमार । हाती धरली सत्वर । संबोखीतसे प्रेमभावे ॥५७॥
एकांती सांगे तियेसी । म्हणे तुझ्या भ्रतारासी । देखिले आम्ही दृष्टीसी । सुखी आता असावे ॥५८॥
 
तव व्रतपुण्ये करोनी । पति शीघ्र पहासी नयनी । चिंता करून नको म्हणोनी । तृतीय दिनी भेटेल ॥५९॥
तव पति माझा सखा । प्राण तोचि ऐका । संदेह न करी वो बालिका । आण शिवचरणाची ॥२६०॥
 
ऐसे एकांती सांगून । प्रगट न करी म्हणून । दुःख आठवले ऐकून । सीमंतिनी बाळिकेसी ॥६१॥
सुटल्या धारा लोचनी । प्रेमे रडे स्फुंदोनी । विचार करी सीमंतिनी । हाचि होय मम पति ॥६२॥
 
पतीसारिखे मुखकमळ । नयन सुंदर अति कोमळ । ध्वनि बोलता ज्याची मंजुळ । अति गंभीर बोलतसे ॥६३॥
मृदु वाणी पतीसरसी । तैसाची बोले तो हर्षी । धरिता माझिया करासी । अति मृदु लागले ॥६४॥
 
माझे पतीचे लक्षण । मी जाणे सर्व खूण । हाचि होय माझा प्राण । समस्त चिन्हे असती ॥६५॥
यास देखोनि नयनी । धारा सुटल्या प्रेमे जीवनी । नवलपरी विचारूनी । मागुती अनुमान करीत ॥६६॥
 
दैवहीन असे आपण । कैसा पति येईल म्हणोन । बुडाला नदीत जाऊन । मागुती कैसी भ्रांति म्हणे ॥६७॥
मेला पति मागुती येता । ऐशी न ऐकिली कानी कथा । स्वप्न देखिले की भ्रांता । काय कळते माझे मना ॥६८॥
 
धूर्त होय की वेषधारा । राक्षस यक्ष किंवा किन्नरी । कपटे प्रगटला नदीतीरी । म्हणोनि कल्पना करीतसे ॥६९॥
किंवा पावला शिवव्रते । की धाडिला गिरिजानाथे । संकट जाणोनि आमुच्या येथे । मैत्रेयीकारणे धाडिला ॥२७०॥
 
ज्यास प्रसन्न शंकर । त्यास कैचा दुःखविकार । चिंतिले पाहिजे निर्धारे । ऐसे चिंती सीमंतिनी ॥७१॥
ऐसे होता राजकुमार । आरूढला वारूवर । निरोप मागे प्रीतिकर । सीमंतिनी नारीसी ॥७२॥
 
निघाला अश्व मनोवेगे । पातला नगरा अतिशीघ्रे । वासुकीपुत्र होता संगे । तया पाठवी नगरांत ॥७३॥
त्वा जावोनि वैरियांसी । इष्टती सांगा वादीयासी । न ऐकता तव बोलासी । संहारीन बोलावे ॥७४॥
 
ऐसे वचन ऐकोनि । त्वरित पावला राजभुवनी । उभा राहोनि कठोर वचनी । बोलतसे नगराधिपतीसी ॥७५॥
चला शीघ्र कुटुंबेसी । चंद्रांगदाचे भेटीसी । तक्षकाचे दर्शनासी । गेला होता पाताळी ॥७६॥
 
कालिंदीये नदीत । बुडाला हे ऐकोनिया मात । तुम्ही केला स्वामीघात । राज्य घेतले इंद्रसेनाचे ॥७७॥
आता सांगेन तुम्हांसी । चाड असे जरी प्राणासी । शरण जावे तयासी । इंद्रसेना स्थापोनी ॥७८॥
 
तक्षकासारखा मैत्र जोडला । दिधले नवनागसहस्त्रबळा । शीघ्र लागा चरणकमळा । चंद्रांगदाचे जाऊनी ॥७९॥
न ऐकाल माझ्या वचना । तरी आताचि घेतो प्राणा । तक्षके पाठविले आपणा । पारिपत्याकारणे हो ॥२८०॥
 
ऐसे वचन ऐकोनी । शत्रु भयाभीत मनी । हीन बुद्धि केली जाणोनी । आता शरण रिघावे ॥८१॥
जरी करू बलात्कार । तक्षक करील संहार । लोकात होई निंदा फार । प्राण जाईल आपुला ॥८२॥
 
ऐसे विचारूनि मानसी । बाहेर आणिती इंद्रसेनासी । नाना वस्त्रे आभरणेसी । सिंहासनी बैसविला ॥८३॥
सकळ विनविती त्यासी । अपराध घडला आम्हांसी । प्राण राखा वेगेसी । म्हणोनि चरणी लागले ॥८४॥
 
राया इंद्रसेनासी । तक्षकपुत्र सांगे त्यासी । तुमचा पुत्र आला परियेसी । वासुकी भेटी गेला होता ॥८५॥
ऐकोनि राव संतोषी त्यासी । आठवोनि अधिक दुःखासी । मूर्छा येवोनि धरणीसी । पत्‍नीसहित पडियेला ॥८५॥
 
नागकुमरे उठविले त्यासी । दुःख कासया करावे हर्षी । येईल पुत्र भेटीसी । त्वरे करोनि आतांची ॥८६॥
मग राव अतिहर्षी । बोलावित मंत्रियांसी । नगर श्रृंगारावयासी । निरोप दिधला तये वेळी ॥८७॥
 
ऐसा निरोप देऊन । भेटी निघाला आपण । सकळ दायाद स्वजन । राणीवसा आदिकरूनि ॥८९॥
मंत्रीपुरोहितासहित । निघाले लोक समस्त । कौतुक पाहो म्हणत । मेला पुत्र कैसा आला ॥२९०॥
 
आनंद झाला सकळिका । राव मानि महाहरिखा । पाहीन म्हणे पुत्रमुखा । अति आवडीने अवधारा ॥९१॥
सवे वाजंत्र्यांचे गजर । नगरलोका संतोष थोर । करिताती जयजयकार अति उल्हास करिताती ॥९२॥
 
ऐसे जाऊनि पुत्रासी । भेटी झाली रायासी । चंद्रांगद पितयासी । नमस्कारी साष्टांगे ॥९३॥
अति प्रेमे पुत्रासी । आलिंगी राव त्वरेसी । सद्गदित कंठेसी । नेत्री सुटल्या अश्रुधारा ॥९४॥
 
पुत्रासी म्हणे इंद्रसेन । आलासी बाळा माझा प्राण । श्रमलो होतो तुजविण । म्हणोनि सांगे दुःख आपुले ॥९५॥
मातेते आलिंगोन । दुःख करी ती अतिगहन । विनवीत तिये संबोखोन । मजनिमित्त कष्टलिसी ॥९६॥
 
पुत्र नव्हे मी तुमचा शत्रु । जाऊनि आपुले सुखार्थु । तुम्हा दुखविले की बहुतु । नेदीच सुख तुम्हाते ॥९७॥
आपण जावोनि पाताळी । राहिलो सुखे शेषाजवळी । तुम्ही कष्टलीत बहुतकाळी । मजनिमित्त अहोरात्र ॥९८॥
 
काष्ठासरी अंतःकरण । माझे असे की सत्य जाण । माताजीव जैसे मेण । पुत्रानिमित्त कष्ट बहुत ॥९९॥
मातापितयांचे दुःख । जो नेणे तोचि शतमूर्ख । उत्तीर्ण व्हावया अशक्य । स्तनपान एक घडीचे ॥३००॥
 
मातेवीण देव देखा । पुत्रासि नाही विशेखा । कवण उत्तीर्ण नव्हे ऐका । माता केवळ मृडानी ॥१॥
दुःख देत जननीसी । तो जाय यमपुरासी । पुत्र नव्हे त्याचे वंशी । सप्तजन्मी दरिद्री ॥२॥
 
ऐसे मातेसि विनवूनी । भेटतसे तो भाऊबहिणी । इष्ट सोयरे अखिल जनी । प्रधानासमवेत नागरिका ॥३॥
इतुकिया अवसरी । प्रवेश केला नगराभीतरी । समारंभ केला अति थोरी । पावले निजमंदिरा ॥४॥
 
तक्षकाचे पुत्रासी । गौरविले सन्मानेसी । वस्त्रे भूषणे रत्‍नेसी । इंद्रसेने अतिप्रीती ॥५॥
चंद्रांगद सांगे पितयासी । तक्षक उपकार विस्तारेसी । प्राण वाचविला आम्हासी । द्रव्य दिधले अपार ॥६॥
 
सुंदर वस्त्रे आभरणे । दिधली होती तक्षकाने । पिता देखोनि संतोषाने । म्हणे धन्य तक्षक ॥७॥
निरोप दिधला नागपुत्रासी । बोळविले तयासी । भृत्य पाठविले वेगेसी । चित्रवर्म्याचे नगरात ॥८॥
 
राव म्हणे तये वेळी । सून माझी दैवे आगळी । तिचे धर्मै वाचला बळी । पुत्र माझा अवधारा ॥९॥
तिणे आराधिला शंकर । तेणे कंकण चुडे स्थिर । तेणे वाचला माझा कुमर । सौभाग्यवती सून माझी ॥३१०॥
 
म्हणोनि पाठविले वेगेसी । लिहोनिया वर्तमानासी । चित्रवर्मरायासी । इंद्रसेन रायाने ॥११॥
हेर निघाले सत्वरी । चित्रवर्म्याचिये नगरी । व्यवस्था सांगितली कुसरी । चंद्रांगदशुभवार्ता ॥१२॥
 
संतोषे राजा ऐकोनि देखा । करिता झाला महासुखा । दाने दिधली अपार ऐका । रत्‍ने भूषणे हेरांसी ॥१३॥
इंद्रसेन राजा सत्वर । पुनरपि करावया वर्‍हाड थोर । चंद्रांगद बडिवार । सेना घेवूनि निघाला ॥१४॥
 
महोत्साह झाला थोर । वर्‍हाड केले धुरंधर । चंद्रांगद प्रीतिकर । सीमंतिनीसी भेटला ॥१५॥
पाताळींची अमोल्य वस्तु । प्राणेश्वरीसी अर्पित । पाजिता झाला अमृत । महानंद प्रवर्तला ॥१६॥
 
कल्पवृक्षफळ देखा । देवोनि तोषविला नायका । अमोल्य वस्त्राभरणी देखा । दश योजने तेज फाके ॥१७॥
ऐसा उत्साह विवाह केला । आपुले पुरीसी निघाला । सीमंतिनीचे वैभवाला । जोडा नसे त्रिभुवनी ॥१८॥
 
मग जावोनि नगरासी । राज्यी स्थापिला पुत्रासी । दहा सहस्त्र पूर्ण वर्षी । राज्य केले चद्रांगदे ॥१९॥
सीमंतिनी करी व्रतासी । उपवास सोमवारासी । पूजिले गौरीहरासी । म्हणोनि पावली इष्टार्थ ॥३२०॥
 
ऐसे विचित्र असे व्रत । म्हणोनि सांगे श्रीगुरुनाथ । ऐक सुवासिनी म्हणत । अति प्रीती निरूपिले ॥२१॥
ऐसे करी वो आता व्रत । चुडे कंकणे अखंडित । कन्या पुत्र होती बहुत । आमुचे वाक्य अवधारी ॥२२॥
 
दंपत्य विनवी श्रीगुरूसी । तुमची चरणसेवा आम्हांसी । पुरविती मनोरथासी । आम्हा व्रत कायसे ॥२३॥
आमचा तू प्राणनायक । तुजवाचोनि नेणो आणिक । तव स्मरणमात्रे असे निक । म्हणोनि चरणी लागली ॥२४॥
 
श्रीगुरु म्हणती तयासी । आमुचे निरोपे करा ऐसी । व्रत आचरा सोमवारासी । तेचि सेवा आम्हा पावे ॥२५॥
निरोप घेऊनि श्रीगुरूचा । नेम धरिला सोमवाराचा । भेटीलागी तयाच्या । मातापिता पावली ॥२६॥
 
ऐकोनिया कन्यापुत्रवार्ता । संतोषली त्याची माता । द्रव्य वेचिले अपरिमिता । समाराधना ब्राह्मणांसी ॥२७॥
पूजा करिती श्रीगुरूसी । आनंद अति मानसी । समारंभ दिवानिशी । बहुत करिती भक्तीने ॥२८॥
 
ऐशापरी वंदोनी । श्रीगुरूचा निरोप घेउनी । गेली ग्रामा परतोनी । ख्याती झाली चहू राष्ट्री ॥२९॥
पुढे त्या दंपतीसी । पाच पुत्र शतायुषी । झाले आशीर्वादेसी । श्रीगुरूरायाच्या ॥३३०॥
 
प्रतिवर्षी दर्शनासी । दंपती येती भक्तीसी । ऐसे शिष्य परियेसी । श्रीगुरूचे माहात्म्य ॥३१॥
ऐसे श्रीगुरुचरित्र । सिद्ध सांगे पवित्र । नामधारक अतिप्रीती । ऐकतसे अवधारा ॥३२॥
 
गंगाधराचा कुमर । सरस्वती विनवी गुरुकिंकर । स्वामी माझा पारंपार । श्रीनृसिंहसरस्वती ॥३३॥
ऐसा वरदमूर्ति देखा । सकळ जन तुम्ही ऐका । प्रसन्न होईल तात्काळिका । न धरावा संदेह मानसी ॥३४॥
 
साखर स्वादु म्हणावयासी । उपमा द्यावी कायसी । मनगटीचे कंकणासी । आरसा कासया पाहिजे ॥३५॥
प्रत्यक्ष पाहता दृष्टान्तेसी । प्रमाण कासया परियेसी ।ख्याती असे भूमंडळासी । कीर्ति श्रीगुरुयतीची ॥३६॥
 
ऐका हो जन समस्त । सांगतो मी उत्तम होत । सेवा करिता श्रीगुरुनाथ । त्वरित होय मनकामना ॥३७॥
अमृताची आरवटी । घातली असे गोमटी । पान करा हो तुम्ही घोटी । धणीवरी सकळिक ॥३८॥
 
श्रीगुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय पतित पावनु । नाम ज्याचे कामधेनु । तो चिंतिले पुरवित ॥३९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सीमंतिनी आख्यान विख्यात । पंचत्रिशत्‍ अध्यायात । कथासार सांगितली ॥३४०॥
 
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सीमंतिन्याख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ।
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥३५॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ओवीसंख्या ३४० ॥