सोमवार, 9 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (10:59 IST)

गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा भाग 2

सूर्यकुंडीं करीं स्नान । श्राद्धकर्म आचरोन । सांबादित्य पूजोन । जावें पुढें बाळका ॥११॥
वैजनाथकुंड बरवें । तेथें स्नान तुवां करावें । वैजनाथातें पूजावें । एकभावेंकरुनिया ॥१२॥
गोदावरीकुंडेसी । स्नान करा भक्तींसी । गौतमेश्वर लिंगासी । पूजीं बाळ ब्रह्मचारी ॥१३॥
अगस्तिकुंडीं जावोनि । अगस्तेश्वरा नमूनि । स्नान करीं मनापासोनि । पूजा करीं भक्तिभावें ॥१४
शुक्रकूपीं करीं स्नान । करी शुक्रेश्वर अर्चन । मग पुढें अन्नपूर्णा नमून । पूजा करीं भावेंसी ॥१५॥
धुंडिराजातें पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान । ज्ञानेश्वर अर्चोन । दंडपाणि पूजावा ॥१६॥
आनंदभैरव वंदोनि । महाद्वारा जाऊनि । साष्‍टांगेसी नमोनि । विश्वनाथा अर्चिजे ॥१७॥
ऐसें दक्षिणमानस । यात्रा असे विशेष । ब्रह्मचारी करी हर्ष । योगिराज सांगतसे ॥१८॥
आतां उत्तरमानसासी । सांगेन विधि आहे कैशी । संकल्प करोनिया हर्षी । निघावें तुवां बाळका ॥१९॥
जावें पंचगंगेसी । स्नान करीं महाहर्षी । कोटिजन्मपाप नाशी । प्रख्यात असे पुराणीं ॥२२०॥
पंचगंगा प्रख्यात नामें । सांगेन असतीं उत्तमें । किरणा धूतपापा नामें । तिसरी पुण्यसरस्वती ॥२१॥
गंगा यमुना मिळोनी । पांचही ख्याति जाणोनि । नामें असती सगुणी । ऐक बाळा एकचित्तें ॥२२॥
कृतयुगीं त्या नदीसी । धर्मनदी म्हणती हर्षी । धूतपापा नाम तिसी । त्रेतायुगीं अवधारा ॥२३॥
बिंदुतीर्थ द्वारापासी । नाम जाण विस्तारेंसी । कलियुगाभीतरीं तिसी । नाम झालें पंचगंगा ॥२४॥
प्रयागासी माघमासीं । स्नान करितां फळें जैसीं । कोटिगुण पंचगंगेसी । त्याहूनि पुण्य अधिक असे ॥२५॥
ऐशापरी पंचगंगेसी । स्नान करीं गा भावेंसी । बिंदुमाधवपूजेसी । पूजा करीं गा केशवा ॥२६॥
गोपालकृष्ण पूजोनि । जावें नृसिंहभुवनीं । मंगळागौरी वंदोनि । गभस्तेश्वर पूजावा ॥२७॥
मयूखादित्यपूजेसी । तुवां जावें भक्तींसी । पुनरपि जावें हर्षी । विश्वेश्वरदर्शना ॥२८॥
मागुती मुक्तिमंडपासी । तुवां जावें भक्तींसी । संकल्पावें विधींसी । निघावें उत्तरमानसा ॥२९॥
मग निघा तेथून । आदित्यातें पूजोन । अमर्दकेश्वर अर्चोन । पापभक्षेश्वरा पूजिजे ॥२३०॥
नवग्रहातें पूजोनि । काळभैरवातें वंदूनि । क्षेत्रपाळातें अर्चोनि । काळकूपीं स्नान करीं ॥३१॥
पूजा करोनि काळेश्वरा । हंसतीर्थी स्नान करा । श्राद्धपितृकर्म सारा । ऐक बाळा एकचित्तें ॥३२॥
कृत्तिवासेश्वरा देखा । पूजा करोनि बाळका । पुढें जाऊनि ऐका । शंखवापीं स्नान करीं ॥३३॥
तेथें आचमन करोनि । रत्‍नेश्वरातें पूजोनि । सीतेश्वरा अर्चोनि । दक्षेश्वर पूजीं मग ॥३४॥
चतुर्वक्रेश्वरीं पूजा । करीं वो बाळा तूं वोजा । पुढें स्नान करणें काजा । वृद्धकाळकूपा जावें ॥३५॥
काळेश्वराचे पूजेसी । तुवां जावें भक्तींसी । अपमृत्येश्वरा हर्षी । पूजा करीं गा बाळका ॥३६॥
मंदाकिनी स्नान करणें । मध्यमेश्वरातें पूजणें । तेथोनि मग पुढें जाणें । जंबुकेश्वर पूजावया ॥३७॥
वक्रतुंडपूजेसी । तुवां जावें भक्तींसी । दंडखात कूपेसी । स्नान श्राद्ध तूं करीं ॥३८॥
पुढें भूतभैरवासी । पूजिजे ईशानेश्वरासी । जैगीषव्यगुहेसी । नमन करुनि पुढें जावें ॥३९॥
घंटाकुंडीं स्नान करीं । व्यासेश्वरातें अर्चन करीं । कंदुकेश्वरातें अवधारीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४०॥
ज्येष्ठवापीं स्नान करणें । ज्येष्ठेश्वरातें पूजणें । सवेंचि तुवां पुढें जाणें । स्नान सप्तसागरांत ॥४१॥
तेथोनि वाल्मीकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी । भीमलोटा जाऊनि हर्षी । भीमेश्वर पूजावा ॥४२॥
मातृ-पितृकुंडेसी । करणें श्राद्धविधीसी । पिशाचमोचन तीर्थेसी । पुढें जावें अवधारा ॥४३॥
पुढें कपर्दिकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी । कर्कोटकवापीसी । स्नान करीं गा बाळका ॥४४॥
कर्कोटकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी । पुढें ईश्वरगंगेसी । स्नान दान करावें ॥४५॥
अग्नीश्वराचे पूजेसी । चक्रकुंडीं स्नानासी । तुंवा जावें भक्तींसी । श्राद्धकर्म करावें ॥४६॥
उत्तरार्क पूजोन । मत्स्योदरीं करीं स्नान । ओंकारेश्वर अर्चोन । कपिलेश्वर पूजीं मग ॥४७॥
ऋणमोचन तीर्थेसी । श्राद्धादि करावीं भक्तींसी । पापविमोचनतीर्थेसी । स्नानादि श्राद्धें करावीं ॥४८॥
तीर्थ कपालमोचन । स्नान श्राद्ध तर्पण । कुलस्तंभाप्रती जाऊन । पूजा करीं गा भक्तींसी ॥४९॥
असे तीर्थ वैतरणी । श्राद्ध करावें तेथें स्नानीं । विधिपूर्वक गोदानीं । देतां पुण्य बहुत असे ॥२५०॥
मग जावें कपिलधारा । स्नान श्राद्ध तुम्ही करा । सवत्सेसी द्विजवरा । गोदान द्यावें परियेसा ॥५१॥
वृषभध्वजातें पूजोन । मग निघावें तेथून । ज्वालानृसिंह वंदोन । वरुणासंगमीं तुम्हीं जावें ॥५२॥
स्नान श्राद्ध करोनि । केशवादित्य पूजोनि । आदिकेशव अर्चोनि । पुढें जावें परियेसा ॥५३॥
प्रल्हादतीर्थ असे बरवें । स्नान श्राद्ध तुवां करावें । प्रल्हादेश्वरातें पूजावें । एकभावें परियेसा ॥५४॥
कपिलधारा तीर्थ थोर । स्नान करावें मनोहर । पूजोनि त्रिलोचनेश्वर । असंख्यातेश्वरा पूजिजे ॥५५॥
पुढें जावें महादेवासी । पूजा करीं गा भक्तींसी । द्रुपदेश्वर सादरेंसी । एकभावें अर्चावा ॥५६॥
गंगायमुनासरस्वतींशीं । तिन्ही लिंगें विशेषीं । पूजा करीं गा भक्तींसी । काम्यतीर्थ पाहें मग ॥५७॥
कामेश्वरातें पूजोनि । गोप्रतारतीर्थ स्नानीं । पंचगंगेसी जाऊनि । स्नान मागुतीं करावें ॥५८॥
मणिकर्णिकास्नान करणें । जलशायीतें पूजणें । हनुमंतातें नमन करणें । मोदादि पंच विनायकांसी ॥५९॥
पूजा अन्नपूर्णेसी । धुंडिराज परियेसीं । ज्ञानवापीं स्नानेंसी । ज्ञानेश्वर पूजावा ॥२६०॥
पूजीं दंडपाणीसी । मोक्षलक्ष्मीविलासासी । पूजा पंचपांडवासी । द्रौपदीदुपदविनायका ॥६१॥
पूजा आनंदभैरवासी । अविमुक्तेश्वर हर्षीं । पूजोनिया संभ्रमेंसी । विश्वनाथ संमुख सांगें ॥६२॥
श्लोक ॥ उत्तरमानसयात्रेयं यथावद्या मया कृता । न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥६३॥
ऐसा मंत्र जपोनि । साष्टांगें नमस्कारुनि । मग निघावें तेथोनि । पंचक्रोशयात्रेसी ॥६४॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र ऐकतां संतोषीं । येणेंचि तूं पावशी । चारी पुरुषार्थ इह सौख्य ॥६५॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टे साधिजे ॥६६॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीखंडीं यात्रा निरोपित । कथा असती पुराणविख्यात । एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥२६७॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीमहायात्रानिरुपणं नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४१॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥२६७॥
 
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

गुरुचरित्रअध्यायबेचाळीसावा