हिवाळ्यासाठी खास: कमी कॅलरीजचे देसी सूप! वजन कमी करण्यासाठी आणि थंडीत ऊब देण्यासाठी बनवा 'ही' खास डाळ सूप रेसिपी
हे सूप मिक्स डाळी म्हणजे पिवळी मूग, मसूर, किंवा तुमच्या आवडीच्या इतर डाळी आणि भाज्या वापरून बनवले जाते. हे खूप पौष्टिक आणि शरीराला ऊब देणारे आहे.
साहित्य-
१/४ कप पिवळी मूग डाळ
१/४ कप मसूर डाळ
तुमच्या आवडीच्या कोणत्याही दोन डाळी घेऊ शकतात
१/२ कप भोपळ्याचे तुकडे
१/२ गाजर लहान कापलेले
१/२ कांदा जाडसर चिरलेला
१ टोमॅटो जाडसर चिरलेला
१ चमचा तेल किंवा तूप
१/४ चमचा जिरे
चिमूटभर हिंग
४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
१ इंच आल्याचा तुकडा किसलेला
१/४ चमचा हळद
चवीनुसार मीठ
चवीनुसार काळे मीठ
१/२ चमचा काळी मिरी पूड
१-२ कप पाणी
बारीक चिरलेली कोथिंबीर
थोडा लिंबाचा रस
कृती-
सर्वात आधी दोन्ही डाळी स्वच्छ धुऊन कमीतकमी ३० मिनिटे भिजत ठेवा. आता प्रेशर कुकरमध्ये भिजवलेल्या डाळी, सर्व भाज्या कांदा, गाजर, भोपळा, टोमॅटो, हळद आणि सुमारे २ कप पाणी घाला.
कुकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. आता वाफ गेल्यावर कुकर उघडा. मिक्सरच्या भांड्यात घेऊन हे मिश्रण एकदम बारीक वाटून प्युरी करून घ्या. सूपची जाडी तुमच्या आवडीनुसार ठेवा. मिश्रण खूप जाड वाटत असल्यास थोडे गरम पाणी घाला. आता एका कढईत तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिंग घालून तडतडू द्या. आता लसूण आणि किसलेले आले घालून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत परता. तडका तयार झाल्यावर लगेच बारीक केलेली डाळ-भाज्यांची प्युरी कढईत ओता. चवीनुसार मीठ, काळे मीठ आणि काळी मिरी पूड घाला. व मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे उकळू द्या, जेणेकरून सर्व फ्लेवर्स एकजीव होतील. जर सूप खूप घट्ट वाटत असेल तर थोडे गरम पाणी मिसळा. आता सूप एका बाऊलमध्ये काढा. व वरतून लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम नक्कीच सर्व्ह करा.
खास टीप
पौष्टिकतेसाठी तुम्ही डाळ शिजवताना त्यात पालक किंवा शेवग्याच्या शेंगा देखील घालू शकता. हे सूप प्रोटिनचा एक उत्कृष्ट स्रोत आहे आणि थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik