शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (15:53 IST)

दसर्‍याला सरस्वती देवी पूजन महत्त्व आणि विधी

विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जाऊन शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची परंपरा आहे. तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करुन प्रार्थना करावयाची असते की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा असते. 
 
या दिवशी मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते. सरस्वती देवीला विद्येची आराध्यदैवत मानलं जात असल्याने विद्यार्थी आपल्या पुस्तकांची पूजा करतात. साहित्यिक, ग्रंथकार आपल्या ग्रंथाची पूजा करतात. ज्या गोष्टींपासून आपल्याला ज्ञान मिळते त्या सर्व गोष्टींची पूजा करता येते. 
 
पूजा विधी 
पूजनासाठी एका दगडी पाटीवर श्री महासरस्वतीची प्रतिमा काढावी. कारण असे सांगितले जाते की पहिले वा‌‌ङ‌‌‍मय दगडावर‌ कोरले गेले होते व गायत्री देवीची पहिली प्रतिमा श्री परशुरामाने पाषाणावर काढली होती. 
 
श्रीसरस्वतीची प्रतिमा प्रथम प्रशुरामाने काढली होती व धारिणीने रेखाटली होती. परशुराम हे महाविष्णूचा सहावा अवतार होते आणि त्याच्या पत्‍नीचे नाव धारिणी होते, जी आल्हादिनी आहे. धारिणी ह्या भूदेवी वरुणाची कन्या आहे. 
 
पूजा स्थळ स्वच्छ करुन घ्यावं. तेथे पाट मांडून त्यावर लाल कपडा घालावा.
पाटावर सरस्वती काढलेली पाटी ठेवावी. जवळच सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी.
त्यासमोर मुलांची अभ्यासाची पुस्तकं किंवा इतर ज्ञानवर्धक पुस्तकं ठेवावीत.
जवळ आपट्याची पाने ठेवावी.
देवीच्या नावाने खाली तांदळाची रास करुन त्यावर कुंकुं लावलेला कलश स्थापित करावं. त्याला आजूबाजू आंब्याची पाने लावून मधोमध नारळ ठेवावा. 
देवीला, सरस्वती चिन्हांवर आणि पुस्तकांवर हळद-कुंकु व्हावं.
फुलं अर्पित करावी.
उदबत्ती, समयी आणि दिवा लावावा.
फळांचा नैवेद्य दाखवावा.
ज्ञानरूपी महासागर असलेल्या देवी सरस्वतीची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून देवी सरस्वतीची वंदना करावी.
 
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥