शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (21:14 IST)

मनिषा कायंदे तिकडे कशा काय गेल्या, काही कळत नाही : भुजबळ

chagan bhujbal
नाशिक :मनिषा कायंदे तिकडे कशा काय गेल्या, काही कळत नाही. त्या मला कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते  नाशिकमध्ये बोलत होते. भुजबळ म्हणाले, मला मनिषा कायंदे उद्धव ठाकरेंसोबत राहतील, असे वाटत होते. पण त्यादेखील एकनाथ शिंदेंसोबत गेल्या. त्यांनी हा निर्णय का घेतला हे काही कळण्यास मार्ग नाही.
 
दरम्यान, ठाकरे गटातील एक-एक आमदार, पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाताना दिसत आहे.  याबाबत पत्रकारांनी विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे प्रमुख आहेत. त्यांचा पक्ष सांभाळण्यात ते सक्षम आहेत. त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे जुने नेते, शिवसैनिक आहेत. ते चर्चा करू शकतात. गळती थांबवू शकतात. त्यामुळे त्यांना काही सल्ला देण्याची गरज नाही.
 
शिवसेनेतील तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा  देतांना ते  म्हणाले की, अजूनही शिवसेना फुटली आहे हे मनाला पटत नाही असेही भुजबळ म्हणाले. १९७३ साली मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तर १९७८ साली बाळासाहेबांनी मला महानगरपालिकेतील शिवसेनेचा गटनेता केल. आता, जसा वर्धापन दिन होतोय तसाच तेव्हाही व्हायचा, गटनेता झाल्यानंतर बाळासाहेबांनी मला वर्धापन दिन किंवा दसरा मेळावा याठिकाणी बोलण्याची संधी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेने अनेक जबाबदाऱ्या दिल्या. महापौर झालो, आमदार झालो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शिवसेनेचे काम पोहोचवलं
 
यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन दोन गटांकडून साजरा केला जातोय. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला आहे. यापेक्षा जेव्हा येऊ घातलेल्या वेगवेगळ्या निवडणुका होतील त्यावेळी मतदानाच्या माध्यमातून लोक सांगतील की खरी शिवसेना कोणती आहे. राजकारणी काहीही बोलत असले तरी लोक त्यावर बरोबर लक्ष ठेऊन असतात आणि ठरवत असतात की खर काय आहे, खोट काय आहे, खरे कोण किंवा खोटे कोण आहे.
 
भुजबळ पुढे म्हणाले, आम्ही शिवसैनिक असताना कुठलाही कठीण प्रसंग असो शिवसैनिक ठामपणे बाळासाहेबांच्या पाठीशी उभे असायची, आमची एकी अगदी अभेद्य असायची. एकदा बाळसाहेबांचा शब्द आला की हे करा, की मग काय करू, कस करू, पोलीस येतील का, अटक होईल का असा कुठलाही विचार येत नव्हता. साहेबांचा शब्द सुटला की डू ऑर डाय  अशी परिस्थिती असायची आणि आम्ही तुटून पडायचो. परंतु आता ती शिवसेना काहीशी विस्कळीत व्हायला लागली आहे. परंतु शिवसेना ही अभेद्य रहावी अशी माझी मनोमन इच्छा आहे