शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: मॉस्को , सोमवार, 2 जुलै 2018 (10:46 IST)

पेनल्टी शूट आऊटवर रशियाचा स्पेनवर विजय

साखळी सामन्यांनंतर बादफेरीतील थरारात आणखीन भर घालणाऱ्या सामन्यात रशियाने स्पेनचा पेनल्टी शूट आऊटवर ४-३ असा पराभव करत विश्‍वचषक स्पर्धा २०१८च्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
 
निर्धारीत वेळेत १-१ ने बरोबरी राहिल्याने सामन्यात तिस मिनिटाचा अतिरीक्त वेळ दिला गेला त्यामुळे सामन्याचा थरार आणखीनच वाढला होता. त्यात अतिरीक्तवेळेतही गोल न झाल्याने हा सामना पेनल्टी शूट आऊट पर्यंत गेला ज्यात रशियाने आपल्या चारही संधींचे सोने करत गोल नोंदवला तसेच रशियाचा गोलकीपर इगोर ऍकिनफीवने स्पेनच्या कोके आणि आयगो अस्पासचे दोन गोल ब्लॉक करत स्पेनला बाहेरचा रस्ता दाखवला.
 
तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्याच मिनिटापासून स्पेनने रशियावर आक्रमण करायला सुरूवात केली, त्यामुळे संपुर्ण पहिल्या हाफ मधिल वेळेच्या 74 टक्‍केवेळ स्पेनच्या खेळाडूंच्या ताब्यात फूटबॉल होता ज्यात त्यांनी 5 ते 6 वेळा गोल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र 11 व्याच मिनिटाला स्पेनला मिळालेल्या कॉर्नर किक वर बॉल ब्लॉक करण्याच्या नादात रशियाच्याच सर्जी इग्नारोविचने आपल्याच जाळीत चेंडू मारल्याने सेल्फगोल झाला आणि स्पेनचे खाते उघडले.
 
त्यानंतर स्पेनच्या संघाने अधिक आक्रमक खेळ दाखवताना रशियाच्या खेळाडूंना चेंडूच मिळू दिला नाही मात्र वेळेच्या 26 टक्‍केवेळेत ताब्यात चेंडू असतानाही रशियाने आक्रमण केले आणि त्यांच्या या रणनितीला 41व्या मिनिटाला यश आले. त्यांच्या आर्टेम डज्युबाने सॉफ्ट किकवर गोल करत सामन्यात बरोबरी साधुन देत संघाचे खाते उघडले.