गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (15:29 IST)

रोनाल्डोने मारली ५१ वी हॅट्ट्रिक, सामना बरोबरीत सुटला

फुटबॉल वर्ल्डमध्ये चुरशीच्या लढतीत पोर्तुगाल आणि स्पेन हा सामना बरोबरीत सुटला. निर्णायक क्षणी पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने संघाला ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघाच्या खात्यात एक–एक गूण जमा झाला आहे. पोर्तुगालतर्फे तिन्ही गोल रोनाल्डोने मारले असून त्याची फुटबॉल कारकिर्दीतील ही ५१ वी हॅट्ट्रिक ठरली.
 
या सामन्यात सगळ्याचे लक्ष खिस्तियानो रोनाल्डोवर होते. तर स्पेनकडे दिग्गज खेळाडूंची फौज होती. सामन्याची सुरुवात होताच चौथ्याच मिनिटाला स्पेनच्या खेळाडूच्या चुकीमुळे पोर्तुगालला गोल करण्याची आयती संधी मिळाली. पेनल्टी दरम्यान रोनाल्डोने ही संधी गमावली नाही. रोनाल्डोने चौथ्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल मारला आणि सामन्यात आघाडी घेतली.
 
मात्र, यानंतर स्पेनच्या डिएगो कोस्टाने २४ व्या मिनिटाला गोल मारुन संघाला बरोबरी मिळवून दिली. ४४ व्या मिनिटाला रोनाल्डोने दुसरा गोल मारल्याने पोर्तुगालने २ - १ अशी आघाडी घेतली. हाफ टाइमनंतर ५५ व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल मारुन पुन्हा एकदा संघाला बरोबरीत (२–२) आणले. अवघ्या तीन मिनिटांनी स्पेनच्याच नॅचोने तिसरा गोल मारला आणि स्पेनने ३- २ अशी आघाडी घेतली. यानंतर स्पेनच्या खेळाडूंनी उत्तम बचाव करत रोनाल्डो आणि त्याच्या टीमला गोल करण्यापासून रोखून ठेवले.
 
सामना संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना स्पेनच्या खेळाडूने चुक केली आणि ८८ व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवर अप्रतिम गोल मारत संघाला ३ - ३ अशा बरोबरीत आणले. रोनाल्डोची फुटबॉल कारकिर्दीतील ही ५१ वी हॅट्ट्रिक ठरली. तर फुटबॉल वर्ल्डकपमध्ये त्याची ही पहिलीच हॅट्ट्रिक आहे. फुटबॉल वर्ल्डकपमध्ये एका खेळाडूने एका सामन्यात तीन गोल केल्याची ही ५१ वी वेळ आहे.