बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By

गजानन महाराजांचा जन्म कधी झाला?

Shri Gajanan Maharaj Vijay Granth Adhyay 1
गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील विदर्भात स्थित शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आले आहे.
 
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपराचे गुरू होते. गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी प्रथमच दिसल्याचे सांगितले जाते. महाराजांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात.
 
गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत असून त्यांनी भक्ती मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहचता येते हा संदेश दिला आहे. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी 'श्रीगजानन विजय' ग्रंथामध्ये लिहिले आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात.
 
माघ वद्य 7 शके 1800, (23 फेब्रुवारी 1878) या दिवशी 30 वर्षाचे गजानन महाराज शेगांव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी ग्रंथात लिहिले आहे- "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"
 
असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कोलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले तेथे राहुन त्यांनी बाललीला दाखवल्या. मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभुती करून दिली. त्यांना गुरुदिक्षा दिली मग तिथुन गजानन महाराज शेगावी आले.
 
त्यांच्या शरीरयष्टीबद्दल या प्रकारे वर्णन देण्यात आले आहे की - सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर, गुडघ्यापर्यंत पोचणारे हात. पाय अनवाणी आणि हाती असलीच तर कापड गुंडाळेली एखादी चिलीम.
 
आपल्या अवतारकार्यातील 32 वर्षांचा काळ महाराजांनी संपूर्णपणे शेगाव व्यतीत केला असला तरी त्यांनी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून भ्रमण केल्याचे समजते. उन्हाळा असो वा पावसाळा ते वस्त्रविहीन अवस्थेत वायूच्या गतीप्रमाणे भरभर चालायचे.
 
विठ्ठलाच्या आज्ञेने गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली. भक्त ऋषीपंचमी हा दिवस महाराजांची पुण्यतिथी म्हणून पाळतात.