1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑगस्ट 2025 (13:10 IST)

Gajanan Maharaj Punyatithi 2025 गजानन महाराजांनी समाधी कधी घेतली?

Gajanan Maharaj Punyatithi 2025 date
विदर्भाची पंढरी अशी ओळख असणार्‍या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय संप्रदायाचे गुरू म्हणून पूजले जातात. त्यांचा जन्म नक्की कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात २३ फेब्रुवारी १८७८ साली दिसले होते. म्हणून त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात. तसेच गजानन महाराजांनी ऋषीपंचमी या दिवशी समाधी घेतली होती म्हणून हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात.
 
गजानन महाराजांनी समाधी कधी घेतली?
गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० (संजीवन समाधी) रोजी शेगाव येथे समाधी घेतली. गजानन महाराजांना जेव्हा आपल्या अवतार समाप्तीची वेळ आल्याचे समजले तेव्हा ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा असल्याचे सांगितले जाते परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. गजानन महाराजांनी ऋषिपंचमीच्या पुण्यदिवशी समाधी घेतली.
 
समधी घेण्यापूर्वी गजानन महाराजांनी भक्तांना काय संदेश दिला?
समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी भाविकांना धीर देत सांगितले की 
मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका । कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥
 
शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।
भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥
 
प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला ।
सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥
 
- अध्याय १९ वा
 
महाराजांनी समाधी घेतल्याचे समजतात लाखोंच्या संख्येने लोक त्या प्रसंगी हजर होते. श्रृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले असून संपूर्ण शेगावातून मिरवणूक काढून पहाटे मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. शास्त्राप्रमाणे देह उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळून मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, ’जय स्वामी गजानन’ आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.
 
संत गजानन महाराज समाधी सोहळा १९१०मध्ये झाला. १९६७ पासून श्री गजानन महाराज पालखी माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. शेगावची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत विदर्भाचे, खानदेशाचे व मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी हे वारकरी परंपरेनुसार, नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. पालखी अश्व, गज, अंबारीसह निघते.
 
महाराजांच्या आज्ञेवरुन गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. शेगावात नवीन मठ स्थापित झाला. श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगाव गावाच्या मधोमध आहे. हे मंदिर काळ्या पाषाणाचे आहे आणि श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. वरच्याबाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापल्या आहेत. श्री गजानन विजय या ग्रंथामधे त्यांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. या ग्रंथाचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छित मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.