शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Updated : गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025 (08:15 IST)

श्री गजानन महाराज गुरुवार व्रत

जय गजानन
महाराष्ट्र राज्यातील विदर्भात एक दैदिप्यमान संतरत्न २३ फेबृवारी १८७८ ह्या दिवशी शेगाव येथे प्रकट झाले. हा दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. देविदास पातुरकरांच्या घराबाहेर उष्ट्या पत्रावळी वरील अन्नकण वेचून खात त्यांनी “अन्न हे पूर्णब्रम्ह” हा महत्वाचा पहिला संदेश सर्वांना दिला. ३२ वर्षाच्या अल्पशा कार्यकालात गजानन महाराजांनी अनेक लिलांनी अनेक भक्तांवर कृपा केली. श्री गजानन महाराजांचे भक्त हे त्यांना दत्तात्रयांचा अवतार म्हणजेच दत्त संप्रदायातील संत मानतात. संतकवी दासगणू लिखित श्री विजय ग्रंथामध्ये श्री गजानन महाराज हे समर्थ रामदास स्वामीचे अवतार असल्याचा उल्लेख आहे. परंतु महाराज नक्की कुठून आले, ह्याबद्दल कुणालाच काहीही माहिती नाही.
 
भक्तांनी श्री गजानन महाराजांची आराधना कशी करायची तर अतिशय साधेपणाने करायची असे सांगण्यात आले आहे. एकविस गुरुवारचे संत गजानन व्रत नियम जाणून घेऊया-
 
* व्रत कर्त्याने व्रताची पूजा आपल्या सवडीनुसार सकाळी किंवा सायंकाळी करावी.
* श्री गजानन महाराजांचे हे व्रत महाराजांवर श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती जसे की अबाल वृद्ध, स्त्री, पुरुष, बालक बालिका कोणत्याही जातीधर्माचे कोणत्याही राज्यातील किंवा कोणत्याही देशातील व्यक्ती करू शकतात. 
* हे व्रत पूर्ण निष्ठेने, शुचिर्भूत राहून, मनःपूर्वक, शांत चित्ताने करावे. 
* हे व्रत कुठल्याही एका गुरुवारी सुरु करून पुढील दर गुरुवारी असे २१ गुरुवारी करायचे आहे.
* हे व्रत एक पवित्र उपासना असल्यामुळे सुरु करायला किंवा उद्यापनासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. परंतु शक्य असल्यास गुरुपुष्य योगावर ह्या व्रताची सुरुवात करणे अतिशय उत्तम. अनके लोक व्रत साधारण ५,७,१४,२१ गुरुवार करतात.
* आपल्या मनातील भाव आणि भावना महाराजांना कळत असल्यामुळे संकल्प करण्याची गरज नाही
* व्रतकर्त्याने दर गुरुवारी शक्य असल्यास एकच वेळ भोजन घ्यावे. पूर्ण दिवस उपवास करू नये.
* आपण फक्त व्रत करावे त्याच्या फळाची इच्छा करू नये 
* गुरुवारी आपण निर्धारित केलेल्या वेळी व्रतकर्त्याने स्नान करुन पूजेची जागा स्वच्छ करुन तिथे चौरंग किंवा पाट ठेवावा आणि त्यावर लाल कापड़ अंथरावे.
* सुपारीची गणेश मानून पूजा करावी आणि गणेशाचे स्मरण करुन पूजेची सुरुवात करावी. आधी श्री गणेशाचे पूजन करावे.
* श्री गजानन महाराजांच्या फोटोला स्वच्छ वस्राने पुसावे. मूर्ती असल्यास मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. आणि स्वच्छ वस्राने पुसावे.
* श्री गजानन महाराजांच्या फोटोची अथवा मूर्तीची निर्मळ अंतःकरणाने व साधेपणाने पुजासाहीत्याचा वापर करून पूजा करावी. 
* श्री गजानन महाराजांच्या फोटोला कुंकू, हळद, अबीर, गुलाल, अष्टगंध, अक्षद आणि इतर उपलब्ध असलेले पूजा साहित्य वहावे. आणि ताज्या फुलांचा हार अर्पण करावा. मूर्तीला गुलाबाचे अथवा उपलब्ध असलेले कोणतेही सुगंधी फुल वाहावे. आणि २१ दुर्वा वाहाव्यात.
* दीप प्रज्वलन करून उदबत्ती लावावी.
* आपण महाराजांची शेगावहून आणलेली उदी (अंगारा) लावावी. अंगारा नसल्यास आपण लावलेल्या उद्बत्तीची राख अंगारा म्हणून महाराजांचे स्मरण करुन लावावी.
* शुद्ध अंतः करणाने श्री गजानन महाराजांची मनोमन प्रार्थना करून श्री गजानन मंत्राचा म्हणजेच “गण गण गणांत बोते” हा १०८ (एक माळ) जप करावा.
* पूजा आटोपल्यावर श्री गजानन विजय ग्रंथातील एक अध्याय वाचावा. (पहिल्या गुरुवारी पहिला, दुसर्या गुरुवारी दुसरा ..... एकविसाव्या गुरुवारी एकविसावा असे)
* श्री गजानन विजय ग्रंथातील ३, ७, १३, किंवा १४ आपल्या हेतूनुसार अध्याय वाचावा.
अध्याय ३ - आरोग्यविषयक समस्या
अध्याय ७ - संतती प्राप्तीसाठी
अध्याय १३- नोकरी, आरोग्यस किंवा विवाहासंबंधी समस्या अस्लास
अध्याय १४ - आर्थिक समस्या असल्यास 
* पारायण करण्याची योग्य पद्धत- १ दिवसात संपूर्ण ग्रंथ
३ दिवसात दररोज ७ अध्याय
७ दिवसात दररोज ३ अध्याय
किंवा २१ दिवसात दररोज एक अध्याय
* शक्य असेल तर दर गुरुवारी (व्रताच्या काळात ) श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणे अतिशय उत्तम फलदायी होते. संपूर्ण पारायणासाठी नेहमी वाचणार्यांसाठी चार व इतरांसाठी ५ ते ६ तास वेळ लागतो. पारायण करणे आवश्यक नाही, वेळ असेल तर अवश्य करावे कारण पारायण केल्याने मन शांत होऊन, मनाला शांतता स्थिरता लाभते.
* वाचन करताना चहा दुध कॉफी अथवा पाणी पिण्यासाठी थांबले तरी हरकत नाही. शक्यतो आसन सोडू नये.
* व्रताच्या दिवसात स्त्रियांना मासिक अडचण आल्यास जमत असेल तर फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहित धरु नये. जेवढे गुरुवार होणा नाही तेवढे अधिक करुन संख्या पूर्ण करावी.
* कुणाला गुढघ्याचा किंवा इतर त्रासामुळे खाली बसणे जमत नसल्यास खुर्चीत किंवा सोफ्यावर बसून पारायण करता येते. 
* श्री गजानन महाराजांना त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून जसे की पीठलं- ज्वारीची भाकरी, कांदा, हिरव्या मिरच्या अथवा मिरच्यांचा ठेचा आणि मोदक असा नैवेद्य अर्पण करावा 
* हे शक्य नसेल तर मिठाई, खडीसाखर, साखर, गुळ ह्यापैकी जे उपलब्ध असेल ते प्रसाद म्हणून ठेवावे. आणि घरातील तयार जेवणाचा नैवेद्य दाखवावा.
* व्रत चालू असतांना स्त्री भक्ताला मासिक अडचण असल्यास व्रत करू नये परंतु उपवास (एक वेळ जेवण) अवश्य करावा. हा गुरुवार व्रतामध्ये समाविष्ट करू नये. असे जेवढे गुरुवार होणार नाहीत , तेवढे गुरुवार पुढे व्रत चालू ठेवावे व २१ गुरुवारची संख्या पूर्ण करावी. 
* व्रत पूजा आटोपल्यावर श्री गजानन महाराजांची गजानन बावन्नी आणि गजानन अष्ट्टक, गण गण गणात बोते हे भजन म्हणावे 
* त्यानंतर तुपाचा दिवा लावून श्री गजाननाची आरती करावी व पुष्पांजली करून व्रत श्री गजानन चरणी अर्पण करावे.
* उपस्थित सर्वांना श्री गजाननाचा प्रसाद द्यावा.
ह्या व्रताचे इच्छित फळ लवकर प्राप्त होण्या साठी व्रत कर्त्याने कमीत कमी व्रताच्या काळात म्हणजेच पहिल्या गुरुवारपासून २१ व्या गुरुवार पर्यंत परनिंदा करणे, खोटे बोलणे, कुणालाही अपशब्द बोलणे, भांडणतंटा करणे, अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. किंबहुना मनात तसे विचार सुद्धा येवू देवू नयेत. 
व्रताच्या दिवशी सवडीनुसार घराजवळच्या श्री गजाननाच्या किंवा कोणत्याही देवतेच्या मंदिरात जावे. शक्य नसल्यास घरीच श्री गजानन महाराजांच्या मूर्ती किंवा फोटोला मनोभावे गुढगे टेकून नमस्कार करावा.
एकविस गुरुवारचे संत गजानन व्रत उद्यापन
श्री गजानन महाराजांची लीला अपरंपार आहे. भक्तांच्या हाकेला ते सदैव तत्परतेने प्रतिसाद देतात अशी त्यांची ख्याती आहे. व्रत सुरु झाल्यापासून लवकरच आपले इच्छित प्राप्त झाल्याचे आढळेल. जरी महाराजांच्या कृपेने आपल्या मनोकामना लवकरच पूर्ण झाल्या तरी सुध्दा व्रतोपासना ठरवलेल्या काळापर्यंत (म्हणजेच एकविस गुरुवार) चालू ठेवावी. शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे पंचोपचारे पूजा करावी आणि व्रत साधना करावी. व्रत उद्यापनाच्या दिवशी भुकेल्यांना अन्नदान करावे, गोरगरीबांना यथाशक्ती आर्थिक मदत करावी. आपल्यावर जशी श्री गजानन महाराजांची कृपा झाली तशी इतरांवर व्हावी या सद्भावनेने श्री गजानन महाराजांचा श्री गजानन विजय ग्रंथाच्या १, ५, ११ २१ प्रतीचे ग्रंथदान करावे.
अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चीदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरू संत श्री गजानन महाराज की जय