शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

Ganapati bhakti Rahasya तू सुखकर्ता... भक्तिरहस्य

ganapati
श्रवणं कीर्तनं विष्णोःस्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्म निवेदनम्॥
गणेशाचे श्रवण,कीर्तन, स्मरण, चरणसेवा, पूजा, वंदन, दास्य व आत्मनिवेदन अशी नवविधाभक्ती निष्काम प्रेमाने जेणेकरून घडेल, ते अध्ययन. आपण हिरण्यकश्यपूच्या बाळाकडून म्हणजेच प्रल्हादाकडून शिकलो. या नवविधाभक्तीचे सरस विवरण समर्थांनी दासबोधात चौथ्या दशकात केलेले आहे. ते आपण जाणतोच. वरील प्रकारच्या कोणत्याही एका भक्तीने अनेक संत, महात्मे, भक्त उद्धरून गेलेले आहेत.
 
परिक्षित राजा श्रवण भक्तीने, शुक्राचार्य कीर्तन भक्तीने, प्रल्हाद राजा स्मरणाने, लक्ष्मी देवी पादसेवनाने, पृथू राजा पूजनाने, अक्रूर वंदनाने, हनुमंत दास्यभक्तीने, अर्जुन सख्याने, बली आत्मनिवेदन भक्तीने, याप्रमाणे कोणत्याही एका भक्तीच्या जोरावर अनंत जीव तरले आहेत.
 
श्री ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातले आद्य भक्तिपंथ प्रवर्तक होते. भक्ती सगुणाचीही करता येते व निर्गुणाचीही करता येते. देव सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. दोन्हीही देवाचीच अंगे आहेत. हे जरी खरे आहे तथापि सगुण दर्शनावाचून तच भक्तांची भूक शमलेली नाही. नारदांनी स्वतः प्रल्हादध्रुवाधिकांना देवाच्या सगुण रूपाचेच ध्यान देऊन सगुण दर्शन घडविले व ते स्वतः सगुणाचेच उपासक होते. सर्व साधुसंतांना व्यक्तिश:  देवाच्या सगुण रूपाचे दर्शन झाले आहे.
 
प्रेम हे भक्तीचे स्वरूप आहे. ते परम प्रेम विश्वात्मा जो श्री गणेश त्याच्या ठिकाणी निरतिशय ठेवून आपलेपणा विसरून जाणे ही खरी भक्ती आहे. प्रेमावाचून पूजा, पोथी, पुराण, भजन आणि कीर्तन हे व्यर्थ आहे.
 
॥ प्रेमेवीण श्रुतिस्मृति ज्ञान ।
प्रेमेवीण ध्यान पूजन।
प्रेमेवीण श्रवण कीर्तन ।
वृथा जाण नृपनाथा ॥
देव सुद्धा प्रेमाचाच भुकेला आहे.
अंतरीची घेतो गोडी। पाहे जोडी भावाची ॥
असा श्री मोरया प्रेमळ आहे.
 
भक्तीचे वर्म ज्याला सापडले तो, कृतकृत्य होतो. त्याला मरणाची भीती वा काळजी वाटत नाही. सर्व सृष्टी नाशिवंत व मायिक आहे, असेच तो सजतो. तो कसलाही, कोणाचाही द्वेष करीत नाही. तो भक्त अलौकिक विषयांचे सेवन करतो. लौकिक विषयांकडे त्याचे मन सहसा ढळत नाही. नीती ही भक्तीची दासी असून तिच्या  मागोमाग छायेप्रमाणे फिरणारी आहे. म्हणूनच भगवत्‌ प्रे हे जीविताचे खरे सार्थक आहे.
 
 भक्त श्री गजाननावाचून काहीच इच्छित नाही.
॥ तुझं मागणे ते देवा। घडो तुझी चरणसेवा ॥
॥ तुका म्हणे नाम ।तेणे पुरे माझे काम ॥
 
पोटामध्ये विष ठेवून देवाचे भजन कधीच करू नये आणि ते खरे भजन नव्हे. ते वाणिज्य आहे. ती खरी भक्तीही नाही. सकाम भक्तीचा सर्व संतांनी विरोधच केला आहे. विषय हवेत का, देव हवा? असा आपण आपल्याशीच विचार करायला हवा आहे. आणि श्री गजाननाबद्दल दृढता ठेवायला हवी आहे. चित्तात एक विषय तरी राहतील, नाहीतर श्री गणेश तरी. दोन्ही कसे राहतील?
 
अंधार आणि प्रकाश दोघे एकत्र कधीच नांदणार नाहीत. पोहे ही खाईन आणि गीतही गाईन. हे कसे घडू शकेल. भक्ताने कोणत्या कर्माचा न्यास करायचा, ते गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेच आहे.
 
काम्यांना कर्मणां न्यास तो न्यास होय.
 
नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध काम्य ही भक्तीमध्ये असलीच पाहिजेत. 
मध्यमांस सेवन, चौर्य परदाराभिलाषा इत्यादीही त्याज्य ठरले आहेत. काम्य कर्मे बंधक होतात. जन्म – मृत्यूच्या फेर्यांत पाडतात. म्हणून त्यांचा त्याग सांगितलेला आहे.
कर्माच्या मनाने, चित्ताने न्यास करावयाचा आहे. कर्मातून काढून ते मन श्री गजाननाकडे लावावाचे व देहाने लौकिक व अलौकिक वैदिक कर्मे करावयाची, असा न्यास पदाचा अर्थ सर्वसमंत आहे. ईश्वराचे ठिकाणी अनन्य, अव्यभिचारी, एकनिष्ठपणाची अखंड भक्ती ठेवण्यासाठी वरील नऊ भक्तीतून आपल्यला जावे लागेल. तरच देव गजानन आपल्याला सगुण रूपात किंवा निर्गुण रूपात जसा आहे तसा भेटेल. आपले चित्त स्वच्छ, निरामय,  निर्विकार होऊन केवळ त्या श्री गणेशाचेच ध्यान करेल. त्याची सत्यता मानेल.
 
विठ्ठल जोशी