मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By
Last Updated : सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (12:37 IST)

उकडीचे मोदक Ukadiche Modak Recipe in Marathi

ukadiche modak
साहित्य : एक वाटी तांदुळाची पिठी (तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली), एक वाटी साखर किंवा गूळ, एक नारळ, दोन चमचे तूप, वेलची पूड, तेल, आवडत असल्यास भाजून कुटलेली अर्धी वाटी खसखस पूड.
 
सारण: खोवलेल्या नारळाच्या चवात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजत असताना मधून मधून हालवावे व भांड्याच्या तळाला चिकटू देऊ नये. शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. वेलची पूड घालून हालवून सारण सारखे करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे.
 
उकड : जितकी तांदळाची पिठी, तितकेच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेऊन त्यात पिठी घालून हालवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. आचेवरून खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेलपाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे.
 
मोदक : या उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नऊ अशा पाडाव्यात. काही जणी आपल्या आवडीनुसार आधी कळ्यापाडून नंतर सारण भरतात. हे तयार केलेले मोदक थोड्या पाण्यात बुडवून एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे. आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे.