बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (16:03 IST)

गौरी गणपतीची गाणी

Jyeshtha Gauri 2024
सण आलाया हो, पंचमीचा मोठ्या आनंदाचा
बाई मी पंचमी पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी
बंधू गेल्याती हो, पंढरीला नेली नाही मला
 
सण आलाया हो, गवरीचा मोठ्या आनंदाचा
बाई मी गवर पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी
बंधू गेल्याती हो, मलयाला नेली न्हाई मला
 
सण आलाया हो, दसऱ्याचा मोठ्या आनंदाचा
बाई मी दसरा पुजला, नाना परी बंधू न्हाईत घरी
बंधू गेल्याती हो, जोतिबाला नेली न्हाई मला
 
सण आलाया हो, दिवाळीचा मोठ्या आनंदाचा
बाई मी दिवाळी पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी
बंधू गेल्याती हो, जेजुरीला नेली नाही मला
 
**************
 
अंगणी साखळी उभी गं
तिकडून आली सासू गं
जाच करती मला गं
पांगळी करावी तिला गं
अंगणी साखळी उभी गं
तिकडून आला सासरा गं
जाच करतो मला गं
आंधळा करावा त्याला गं
अंगणी साखळी उभी गं
तिकडून आली नणंद गं
जाच करती मला गं
नांदाय धाडा तिला गं
अंगणी साखळी उभी गं
तिकडून आला नवरा गं
गोड बोलतो मला गं
जेवायला वाढा त्याला गं
 
**************
 
गण्या गुलाल उधळीतो..
गण्या गुलाल उधळीतो..
त्याच्या गुल्लालाचा भार, आमच्या जोडव्या झाल्या लाल..
जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळीतो..
 
गण्या गुलाल उधळीतो..
गण्या गुलाल उधळीतो..
त्याच्या गुल्लालाचा भार, आमच्या पैंजण झाल लाल..
जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळीतो..
असेच साखळ्या, तोडे, अशी दागीने वापरुन गाणे लांबवता येते..
 
**************
माझा रहाट गं साजणी
गातो चौघीजणी
माझ्या रहाटावरची जाई
माझी एकलीच आई
माझ्या घरी का गं येईना
माझी भेट का होईना.
माझा रहाट गं साजणी
गातो चौघीजणी
माझ्या रहाटावरचा चाफा
माझा एकलाच बाप
माझ्या घरी का गं येईना
माझी भेट का होईना
माझा रहाट गं साजणी
गातो चौघीजणी
माझ्या रहाटावरचा झेंडू
माझा एकलाच बंधू
माझी घरी का गं येईना
माझी भेट का होईना.
 
**************
खालच्या आळीला गं वरच्या आळीला
 
कशाचा गलबला, कशाचा गलबला
पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला
अंगठी घेऊया, अंगठी घेऊया
अंगठी घेऊया गं, बारशा जाऊया
खालच्या आळीला गं वरच्या आळीला
 
कशाचा गलबला, कशाचा गलबला
पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला
तोरड्या घेऊया, तोरड्या घेऊया
तोरड्या घेऊया गं, बारशा जाऊया.
खालच्या आळीला गं वरच्या आळीला
 
**************

ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
बैलं झुंप रहाट्ला की पाणी जाऊदे पाटाला..
पाणी जाऊदे पाटाला की वाळ्कीच्या देटाला...
पाणी जाऊदे पाटाला की वाळ्कीच्या देटाला...
एवढ्या वाळका कशाला..एवढ्या वाळका कशाला
गौराईच्या ववश्याला गं गण्पतीच्या पुजेला..
गौराईच्या ववसा फुलांनी डरवळ्ला गं ऊदांनी परमळला...
 
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
बैलं झुंप रहाट्ला की पाणी जाऊदे पाटाला..
पाणी जाऊदे पाटाला की दोड्क्याच्या देटाला...
पाणी जाऊदे पाटाला की दोड्क्याच्या देटाला...
एवढ् दोडके कशाला..एवढ् दोड्के कशाला
गौराईच्या ववश्याला गं गण्पतीच्या पुजेला..
गौराईच्या ववसा फुलांनी डरवळ्ला गं ऊदांनी परमळला...
 
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
ऊठ ऊठ माळीदादा बैलं झुंप रहाटाला...
बैलं झुंप रहाट्ला की पाणी जाऊदे पाटाला..
पाणी जाऊदे पाटाला की खारकीच्या देटाला...
पाणी जाऊदे पाटाला की खारकीच्या देटाला...
एवढ्या खारका कशाला..एवढ्या खारका कशाला
गौराईच्या ववश्याला गं गण्पतीच्या पुजेला..
गौराईच्या ववसा फुलांनी डरवळ्ला गं ऊदांनी परमळला...
 
**************
गाणे गा रे पाखरा, ये रे नदी वाटेला
गौराई निघाली सासरा रे, येरे नदी वाटेला
एक दिवस- एक रात्र गौराई माझी राहिली
भाजी-भाकरी जेवली, रानोमाळ हिंडली
सोनियाच्या पावलांनी आली होती माऊली
गाणे गा रे पाखरा, ये रे नदी वाटेला
गौराई निघाली सासरा रे, येरे नदी वाटेला
दोन दिवस- दोन रात्री, गौराई माझी राहिली
पुरणपोळी जेवली, रानोमाळ हिंडली
सोनियाच्या पावलांनी आली होती माऊली
गाणे गा रे पाखरा, ये रे नदी वाटेला
गौराई निघाली सासरा रे, ये रे नदी वाटेला
तीन दिवस- तीन रात्री, गौराई माझी राहिली
दही-भात जेवली, रानोमाळ हिंडली
सोनियाच्या पावलांनी आली होती माऊली.
 
**************
 
पांढरी गं जाई, कातरी गं पानं
गौराई नेसलीया पिवळं पितांबर- धृ
 
नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला
वारुळाचा नागराजा धरी पदराला
नागराजा-नागराजा आम्ही काय केलं
कुंकवाचं लेणं आम्हा शंकरानं दिलं
 
पांढरी गं जाई, कातरी गं पानं
गौराई नेसलीया पिवळं पितांबर
 
नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला
वारुळाचा नागराजा धरी पदराला
नागराजा-नागराजा आम्ही काय केलं
डोरल्याचं लेणं आम्हा शंकरानं दिलं
 
पांढरी गं जाई, कातरी गं पानं
गौराई नेसलीया पिवळं पितांबर
 
नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला
वारुळाचा नागराज धरी पदराला
नागराजा-नागराजा आम्ही काय केलं
जोडव्याचं लेणं आम्हा शंकरानं दिलं
 
**************
 
सासुने आणली साडी.. सासुने आणली साडी..
पिवळी त्याची धडी..पिवळी त्याची धडी..
नाही गं माझ्या मनाला , घाला त्याची घडी..
 
सासर्याने आणली साडी.. सासर्याने आणली साडी..
नीळी त्याची धडी..नीळी त्याची धडी..
नाही गं माझ्या मनाला , घाला त्याची घडी..
 
दिरानी आणली साडी.. दिरानी आणली साडी..
हिरवी त्याची धडी..हिरवी त्याची धडी..
नाही गं माझ्या मनाला , घाला त्याची घडी..
 
जावेने आणली साडी.. जावेने आणली साडी..
काळी त्याची धडी..काळी त्याची धडी..
नाही गं माझ्या मनाला , घाला त्याची घडी..
 
पतीने आणली साडी.. पतीनेआणली साडी..
रेश्मी त्याची धडी..रेश्मी त्याची धडी..
गणपतीच्या सणाला मोडेन त्याची घडी..
 
**************
 
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली
 
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली
 
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली
 
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
बिलवराच्या नादी गवर माझी वाकली
 
**************

झिम्मा घालू झिम्मा, एवढ्या का राती
माझ्या झिम्म्याला झाली रात गं झाली रात
महादेवाच्या देवळात गं देवळात
असा महादेव नखरेदार गं नखरेदार
त्याच्या रथाला चक्र चार-चक्र चार
चारी चाकाला ऐंशी मोती गं ऐंशी मोती
ऐंशी मोत्याला नऊशे नाक गं नऊशे नाक
पोरी झिम्म्याला खाली वाक गं खाली वाक
 
**************
राजस तळ्यावरी गौराई धुणं धुती
तिच्या गं डोरल्यावर सूर्या चमकतो
चमक चमक साडीवर, हिरवा रंग माडीवर
राजस तळ्यावरी गौराई धुणं धुती
तिच्या गं पैंजणावर सूर्या चमकतो
चमक-चमक साडीवर, हिरवा रंग माडीवर
राजस तळ्यावरी गौराई धुणं धुती
तिच्या गं पाटल्यावर सूर्या चमकतो
चमक चमक साडीवर हिरवा रंग माडीवर
 
**************
अंदाण द्या हो भाऊराया, काय देऊ गं बहिणाबाई
तुळशीमागली बाग शाही, हट्ट पुरव माझी आई.
माझ्या कंगन्या झुगर काळ्या, बंधू घडव नवीन माळा
नवीन माळंचा गं फासा रुंद, हिरवं लुगडं मला गं दंड
हिरव्या लुगड्याची निळी गं धडी, धडी रुतली माझ्या गं पोटा
सांगली-मिरजचा गं रंग खोटा, कोल्हापूरचा दर गं मोठा
बंधू हिंडतो चारी पेठा, हिरव्या शालूला काय गं तोटा...
 
**************
 
साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी
गणूनं काय हरवलं, गणूनं तोंड हरवलं
हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या
 
साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी
गणूनं काय हरवलं, गणूनं पैंजण हरवलं
हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या
 
साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी
गणूनं काय हरवलं, गणूनं साखळी हरवली
हरवली तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या
 
साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी
गणूनं काय हरवलं, गणूनं तोरड्या हरवलं
हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या
 
**************
 
सूर्य उगवला ठाण्याला, चंद्रभागेच्या कोन्याला
मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला
 
बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला
रजा नाही जायाला, पंचमीच्या सणाला
या घरचा उंबरा गं, कधी मला सुटंल
बाप माझा विठ्ठल गं कधी मला भेटंल
 
मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला
बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला
रजा नाही जायाला, गवरीच्या सणाला
या घरचा उंबरा गं, कधी मला सुटंल
आई माझी रुक्‍मिणी गं, कधी मला भेटंल
 
मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला
बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला
रजा नाही जायाला, दसऱ्याच्या सणाला
या घरचा उंबरा गं कधी मला सुटंल
भाऊ माझा पुंडलिक कधी मला भेटंल
**************

कारल्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी
जोडव्याचे जोड सांडलं काय करू मामाजी
सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं
करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी
 
भोपळ्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी
पैंजणाचं जोड सांडलं काय करू मामाजी
सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं
करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी
 
वाळकीच्या वेलाखाली का गौरी उभीशी
पाटल्याचं जोड सांडलं काय करू मामाजी
सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं
करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी
 
**************
गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी
हाय आंब्याच्या घसा गं वरी
आंब्याचा घस खायला बस
ताट केलंया चौरंगी बाई
 
गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी
हाय पेरूच्या घसा गं वरी
पेरूचा घस, खायला बस
ताट केलंया चौरंगी बाई
 
गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी
हाय चिक्कूच्या घसा गं वरी
चिक्कूचा घस, खायला बस
ताट केलंया चौरंगी बाई
 
**************
ऊठ, ऊठ माळीदादा, बैलं जूप रहाटाला
बैलं जूप रहाटालारे, पाणी जाऊ दे पाटाला -धृ
 
एवढं पाणी कशाला, खारकीच्या देठाला
एवढ्या खारका खारका कशाला, गौरीईच्या वौशाला
गौरीईचा वौसा गं, फुलांनी दरवळला
फुलांनी दरवळळा गं, उदांनी परिमळला
 
उठ, उठ माळीदादा, बैलं जूप रहाटाला
बैलं जूप रहाटाला रे, पाणी जाऊ दे पाटाला
एवढं पाणी कशाला, वाळकीच्या देठाला
एवढी वाळकं कशाला, गौराईच्या वौशाला
गौराईचा वौसा गं, फुलांनी दरवळला
फुलांनी दरवळला गं, उदांनी परिमळला
 
उठ, उठ माळीदादा, बैलं जूप रहाटाला
बैलं जूप रहाटाला रे, पाणी जाऊ दे पाटाला
एवढं पाणी कशाला, बदामाच्या देठाला
एवढं बदाम कशाला, गौराईच्या वौशाला
गौरीईचा वौसा गं, फुलांनी दरवळला
फुलांनी दरवळला गं, उदांनी परिमळला
 
**************
अगं या गवरीच्या महिन्यात, लागली गवर, गवर फुलायला.
बंधू लागला लागला बोलायला, जातो बहिणीला बहिणीला आणायला
 
कर शिदोरी शिदोरी भरपेट, भर शिदोरी शिदोरी काठोकाठ
गेला बहिणीला बहिणीला आणायला, आडव्या नदीला नदीला आला पूर
 
पाच फुलांची फुलांची केली नाव, त्यात बसले बसले बहीण भाऊ
वल्हं मारतो मारतो नामदेव, नामदेवाच्या देवाच्या एकादशी
 
भावजं तळती तळती अनारस, आला बहिणीला बहिणीला घेऊईनी
वाढ बहिणीला बहिणीला दूध-भात, रात्री म्हशीनं म्हशीनं दिली लाथ
 
तांब्या पडला पडला गोरणीत, कुठला वाढू मी वाढू मी दूध-भात
वाढ बहिणीला बहिणीला दही-भात, त्याही दह्याचं दह्याचं केलं ताक
कुठला वाढू मी वाढू मी दही-भात.
 
वाढ बहिणीला बहिणीला ताक-भात, त्याही ताकाची ताकाची केली कढी
त्याही कढीचा कढीचा नाश झाला.
कुठला वाढू मी वाढू मी कढी-भात.
 
**************

आषाढ मासी एकादशी, पहिली पंचमी कुण्या दिशी
अगं या पंचमीचा नाग, गणेशाला आली जाग, साजणीबाई
 
अगं या गणेशाची खीर, गवरीची भाजी चीर, साजणीबाई.
अगं या गवरीची भाजी, शंकराला पोळी ताजी, साजणीबाई
 
अगं या शंकराची पोळी, दसऱ्यानं दिली हाळी, साजणीबाई
अगं या दसऱ्याची घाटी, शिलंगणाला झाली दाटी, साजणीबाई
 
अगं या शिलंगणाचं सोनं, दिवाळीनं केलं येणं, साजणीबाई
अगं या दिवाळीचा दिवा, संक्रांतीनं केला धावा, साजणीबाई
 
अगं या संक्रांतीचा वौसा, शिमगा राहिला दोन मासा, साजणीबाई
अगं या शिमग्याची होळी, पाडव्यानं दिली हाळी, साजणीबाई
 
 
अगं या पाडव्याची गुडी, आक्कीतीनं टाकली उडी, साजणीबाई
अगं या आक्कीतीचं आळं, बेंदराला खावी फळं, साजणीबाई
अगं या बेंदराचा बैल, पंचमीला माहेरी येणं होईल, साजणीबाई
 
**************
 
सूर्या चमक; चमक माझं घर, मी का लोटतो, लोटतो दार-घर
अंगी चोळी ही चोळी हिरवीगार, ठस्याठस्यांचं नेसलं पीतांबर
पायी जोडवी, जोडवी झणकार, पायी मासोळ्या; मासोळ्या किनकारी
पायी पैंजण, पैंजण वंजभार, कमरपट्टीला, पट्टीला कुलपं चार
हाती पाटल्या पाटल्या नक्षीदार, पुढं बांगड्या बांगड्या हिरव्यागार
गळ्यात चिताक-चिताक शोभेदार, गळ्यात डोरलं डोरलं पाच पदर
चार तोळ्यांची तोळ्याची बोरमाळ, नाकी नथ ही नथ ही चमकीदार
कपाळी कुंकू हे कुंकू झळके लाल
लेक कुणाची, कुणाची तालेबार.
 
**************
 
साळुंकी सालकी, तुझी माझी पालखी
रामाची जानकी फुगडी फू, बाई फुगडी फू
गेले होते विहिरी, विसरली दोरी
फुगडी फू, बाई फुगडी फू.
गेले होती माडी, विसरली साडी
फुगडी फू, बाई फुगडी फू.
गेले होती माडी, विसरली कुडी
फुगडी फू, बाई फुगडी फू.
 
**************

साभार : सोशल मीडिया