गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By वेबदुनिया|

हरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत

अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते. 'हर' हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते. 'हरी' हे भगवान विष्णूचे नाव आहे. हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत. पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते. कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले. या व्रतासाठी हरतालिका किवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो. ग्रंथामध्येही दोन्ही शब्द आढळतात.

हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे. शास्त्रात या व्रताबाबत 'हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च', अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, कलह, व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे. निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो. पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते. पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती.

पतीप्रती आपली भक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या व्रताचे पालन करण्यात येते. इच्छेनुसार पती मिळावा यासाठी मुलीही या व्रताचे पालन करतात. व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. व्रतापासून मिळणार्‍या फळाचे वर्णन 'अवैधव्यकारा स्त्रीणा पुत्र-पौत्र प्रर्वधिनी' असे करण्यात आले आहे. अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे. भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस 'हस्तगौरी, 'हरिकाली व 'कोटेश्वरी' व्रताचेही पालन करण्यात येते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास हरतालिका व्रत या नावानेही प्रसिद्ध आहे. यामध्ये आदी शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते, याचा संदर्भ आढळतो. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते. यामध्ये तेरा वर्षांपर्यंत शिव-पार्वती व श्रीगणेशाचे ध्यान करण्यात येते. चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करण्यात येते.