गणेश चतुर्थीवर बाप्पाचे आगमन झाल्यावर भक्त वाट बघत असतात ती गौरीच्या आगमनाची. परंपरेनुसार अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते आणि ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन केले जाते. या दिवशी कुलाचाराप्रमाणे पूजन करुन देवीला महानैवेद्य दाखवला जातो. तसेच तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात.
देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख-समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते. आपआपल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते.
२०२५ मध्ये गौरी आवाहन कधी? शुभ मुहूर्त जाणून घ्या
२०२५ मध्ये ज्येष्ठा गौरी आवाहन रविवारी, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी आहे, तर सोमवार, १ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत आहे.
रविवारी, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी देवी गौरीचे आवाहन केले जाईल. ज्येष्ठा गौरीचे आवाहन सायं ५ वाजून २५ मिनटापर्यंत करता येईल.
सोमवारी, १ सप्टेंबर २०२५ रोजी देवी गौरीची पूजा केली जाते.
शुभ मुहूर्त: पूजेसाठी शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत आहे.
ज्येष्ठा गौरी विसर्जन मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०९.५० पर्यंत करता येईल.
काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनके पदार्थांचा नैवेद्य केला जातो. सवाष्णींना हळदी कुमकुम समारंभासांठी बोलावलं जातं. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती 5000 वर्षे जुन्या आहेत.
असे करतात हे पूजन
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
तिसर्या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.