लागबागच्या राजाची स्थापना, इतिहास व विसर्जन
लालबागच्या राजची स्थापना
लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली.
लालबागच्या राजाचा इतिहास
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती-करीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. इ.स. १९४६ साली `श्री' ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. इ.स. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात `श्री' ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. इ.स. १९४८ मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आली.