बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (18:07 IST)

राज्य शासनाचा पुढाकार उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा : लोकजागृती आणि विकासाभिमुख प्रबोधनाला प्रोत्साहन

ganesh
गणेशोत्सव हा सुरुवातीच्या काळात मुख्यत: धार्मिक स्वरुपाचा उत्सव म्हणून साजरा होत होता. त्याकाळी या उत्सवात प्रामुख्याने कथा कीर्तनादी कार्यक्रमही सादर केले जायचे. या गणेशोत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप 1893 सालापासून प्राप्त झाले. लोकजागृतीचे एक साधन म्हणून या उत्सवाचा उपयोग होईल हे ध्यानी घेत लोकमान्य टिळक आणि त्यावेळच्या नेत्यांनी या उत्सवाला व्यापक, सार्वजनिक व ज्ञानसत्रात्मक स्वरूप दिले.
 
उत्सवातून प्रबोधन
समाजातील ऐक्य भावना वाढावी, या हेतूने पूजाअर्चादी धार्मिक विधींबरोबर कीर्तने, प्रवचने, व्याख्याने आदी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच मेळे, पोवाडे, भावगीते, नकला, जादूचे प्रयोग असे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले. गणेशोत्सव  हे प्रचाराचे एक प्रभावी साधन करून पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटित करावे आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत करावी, हाही त्यात उद्देश होता. नकळत धार्मिक प्रवृत्तीबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने मेळ्यातील पदे व पोवाडे रचण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सार्वजनिक गणेशोत्सवाने केलेले लोकजागृतीचे कार्य उल्लेखनीय ठरते.
 
सार्वजनिक गणेशोत्सवामुळे नवे नवे कलाकार उदयास आले. सर्वसामान्य नागरिकांनीही या उत्सवाशी स्वत:ला जोडून घेतले. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवात व्याख्याने व प्रवचने देण्यासाठी बहुश्रुत पंडित, निष्णात वक्ते व थोर पुढारी येत. धार्मिक सलोखा राखण्यात सार्वजनिक गणेशोत्सव हे प्रभावी साधन  ठरले होते.
 
स्वातंत्र्योत्तर काळातील बदलते स्वरुप
गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आल्यापासून आजतागायत त्यात अनेक स्थित्यंतरे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात या उत्सवाचे स्वरूप धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय होते. त्यात राष्ट्रीय एकात्मता, स्वदेशी यांवर भर असे. स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले. सामाजिक प्रबोधनाचे देखावे, विकासात्मक कामाचे देखावे, विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेणारे देखावे, त्या अनुषंगिक कार्यक्रम आयोजित करण्यात ही मंडळे आता पुढाकार घेताना दिसतात. गेल्या साठसत्तर वर्षांच्या अनुभवावरून लोकजागृती आणि सामाजिक प्रबोधनाचा वारसा अनेक सार्वजनिक मंडळांनी जपला आणि अव्याहतपणे तो अजूनही सुरुच आहे असे दिसून येते. अशा सामाजिक भावना, लोकजागृती, प्रबोधनात्मक काम करणाऱ्या नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.
 
राज्य शासनाचा पुढाकार
सन 2022 पासून नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा राज्य शासन पारितोषिके देऊन गौरव करते. यावर्षीही गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
 
15 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी
या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. विविध माध्यमातून या स्पर्धेबाबतची माहिती राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहोचवली जात आहे. अधिक माहितीसाठी नोंदणीकृत गणेश मंडळांनी संपर्क क्रमांक 8169882898, 022-243122956 / 022-24365990 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते सायंकाळी 6) अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.
 
स्पर्धेचे निकष
या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.
 
….असे होणार गुणांकन
या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहित), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेले कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता अशा विविध निकषांसाठी गुणांकन दिले जाणार आहे.
 
निवड समिती
विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्हयातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.
 
गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. गणेश मंडळांकडून त्याला अधिकाधिक प्रतिसाद मिळतोय. तो वाढताच राहील, यात शंका नाही. गणपती बाप्पा मोरया!!!
Edited by : Ratnadeep Ranshoor