बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

गंगेच्या काठावर मराठीचा मळा

महाराष्ट्रात मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पण महाराष्ट्राबाहेर रहाणाऱ्या तिथल्या 'परप्रांतीय' मराठी मंडळींनी मात्र अनेक वर्षांपासून आपली भाषा आणि संस्कृती टिकवली आहे. हरीद्वार हे तर उत्तर भारतातले एक धार्मिक शहर. तिथेही मूठभर मराठी मंडळी अनेक वर्षांपासून रहात आहेत. त्यांनी परप्रांतात राहून आपली संस्कृती, भाषा तिथे कशी टिकवून ठेवली आहे? त्याविषयी......

मी हरिद्वारची राहणारी आहे. असे एकून बर्‍याच लोकांना आश्चर्य वाटते कारण महाराष्ट्राचा आणि हरिद्वारचा तसा काही संबंध नाही. पण पोटापाण्यासाठी बाहेर पडलेल्या मराठी माणसासारखे आमचे कुटुंब येऊन हरिद्वारला स्थायिक झाले इथे बोटांवर मोजण्याइतकी मराठी कुटुंबे आहेत. पूर्वी ही संख्या जास्त होती पण माणसाचं मन उतारवयात आपल्या माणसांमधे रमतं तसं इथली कुटुंब आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या नातेवाईकांच्या आसपास महाराष्ट्रात कुठे कुठे परत जातात. पण तसे पहायला गेलो तर आम्ही इथे परप्रांतीयच.

उत्तराखंड हे उत्तर भारतीय राज्य असल्यामुळे हिंदीचं वर्चस्व भाषेवर राहणारच. पण तरीही मराठी कुटुंबांनी त्यांची मराठी बर्‍यापैकी टिकवून ठेवली आहे. घरातल्या वयस्कांची मराठी एकून इथल्या लहान मुलांना मराठी चांगल्या प्रकारे समजते, पण त्यांचे बोलणं तितकसं चांगलं नाही. एखाद्या मराठी माणसानी जर लक्ष देऊन एकले तर त्याला ते अवघड वाटेल. जसं ‘मला बहुत लांब जायचयं.’ ‘ती यायची होती पण शायद काही जमलेलं दिसत नाही.’, ‘ मी पोळ्यांचा आटा लावून घेते आणि गरम गरम पोळ्या उतरवते.’... इथले लोकं भेटल्यावर एकमेकांशी मराठीतूनच बोलतात पण मात्र नव्या पिढी जरा हिंदीतच सहज असते.

इथल्या स्थानिक लोकांना महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीय लोकांमध्ये काही फरक वाटत नाही. त्यांच्यासाठी उत्तर भारतीय सोडून सगळे लोक दक्षिण भारतीय आहेत. पण तरीही त्यांना मराठी लोकांच आणि महाराष्ट्राच्या खाद्य पदार्थांचं खूपच कौतुक आहे. पुरण पोळी, चिवडा, चकल्या आणि इतर बरेचसे खाद्यपदार्थ तिथल्या लोकांना चांगले माहिती झाले आहेत.

मराठी लोकांची संख्या कमी असल्यामुळे बर्‍याचवेळा लोक फक्त मराठी असल्यामुळे लोकांना ओळखतात. तिथे मराठी वस्ती कमी असली तरीही तिथे महाराष्ट्र मंडळ आहे. मंडळाचे कार्यक्रम वर्षभर होत असतात. त्यात गणेश उत्सवाची धूम असते, आणि कोजागिरी पौर्णिमा, संक्रांतीचे हळदी कुंकू आणि असे बरेच कार्यक्रम साजरे केले जातात.

मराठी लोकांची संख्या कमी असल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये एकता आहे आणि हेच कारण देखील आहे की तिथे मराठी संस्कृती टिकवण्यासाठी सार्वजनिकपणे मंडळाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त काहीही होत नाही. पण मात्र प्रत्येक मराठी कुटुंबांनी आपआपल्या घरात ही संस्कृती जपून ठेवली आहे. प्रत्येक घरात सर्व सण तसेच साजरे होतात जसे महाराष्ट्राच्या एखाद्या घरात होतात. म्हणून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचं ज्ञान आहे.

मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात झालेलं आंदोलन फक्त एक राजकीय पाऊल आहे, असे कोणत्याही राज्यातून इतर राज्यांच्या लोकांना काढणे भारतीय कायद्याविरूद्ध आहे. आणि भाषेसाठी असे करणे कोणत्याही बृह्नमराठी लोकांना हे पटत नाहीये. उद्या आम्हाला इथून काढलं तर आम्ही काय करायचं?

-प्रिया भवाळकर