गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Updated : बुधवार, 30 मार्च 2022 (17:59 IST)

Gudi Padwa 2022 : कधी आहे गुढीपाडवा? जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त

Gudi Padwa 2022 गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. यंदा गुढीपाडवा शनिवार 2 एप्रिल 2022 रोजी साजरा केला जाईल. 
 
गुढी पाडवा 2022 मुहूर्त 
2079 मराठी विक्रम संवत. सुरुवात
प्रथम तिथी सुरुवात 11:56:15 पासून, एप्रिल 1, 2022 रोजी
प्रथम तिथी सुरुवात 12:00:31 पर्यंत, एप्रिल 2, 2022 रोजी
 
यंदा शनिवारी गुढीपाडवा साजरा होत आहे. अशात नव वर्षाचा स्वामी शनी देव राहील. या दिवशी समृद्धीयोग तसेच रेवती नक्षत्र आहे. या दिवसापासून 2079 नल संवत्सर आणि श्री शालीवाहन शके 1944 प्रारंभ होईल.
 
या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
 
गुढीपाडवा या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या / धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, त्याभोवती रांगोळी काढली जाते. तयार केलेली गुढी उंच स्थानी लावतात.
 
गुढीला हळद-कुंकुं, गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.