बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (14:33 IST)

वटपौर्णिमा 2022 कधी आहे, पूजा विधी आणि कथा

vat savitri purnima
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
 
वटसावित्री धार्मिक व्रत
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.
 
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
 
जेष्ठ पौर्णिमा व्रत मुहूर्त
पौर्णिमा तिथी सुरवात 21:04:02 पासुन. जून 13, 2022 रोजी
पौर्णिमा तिथी समाप्ती 17:22:31 पर्यंत. जून 14, 2022 रोजी
 
पूजा विधी
ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी स्नान, ध्यान आणि पुण्य कर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जात असल्याने तिची पूजा पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
 
या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी.
बांबूच्या दोन टोपल्या घ्या, एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा.
माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप, दिवा, अक्षत, कुमकुम, माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे.
माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा.
यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान-दक्षिणा द्यावी आणि हरभरा आणि गूळ प्रसादाच्या स्वरूपात वाटावा.
 
प्रार्थना
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
 
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
 
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।। अशीही प्रार्थना केली जाते.
 
पारंपरिक कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
 
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
 
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
 
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.