गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (17:53 IST)

बोडणाची कहाणी Bodanachi Kahani

puja aarti
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला दोन सुना होत्या. एक आवडती होती. दुसरी नावडती होती. आवडतीला घरांत ठेवीत, चांगलं चांगलं खायला प्यायला देत. चांगलं ल्यायला नेसायला देत. तसं नावडतीला करीत नसत. तिला गोठ्यांतं ठेवीत. फाटकंतुटकं नेसायला देत. उष्टंमाष्टं खायला देत. असे नावडतीचे हाल होत असत.
 
एके दिवशीं कुळधर्म कुळाचार आला, तशी ब्राह्मणाच्या बायकोनं बोडणाची तयारी केली. सवाष्णींना बोलावणं केलं. पुढं तिनं देवाची पूजा केली. सगळ्याजणी मिळून बोडण भरलं. कहाणीं केली. पुढं देवीला नैविद्य दाखविला. नंतर सर्व माणसं जेवलीं. नावडतीला उष्टंमाष्ट वाढून दिलं. तेव्हां तिला समजलं कीं घरांत आज बोडण भरलं. नावडतीला रडूं आलं. मला कोणी बोडन भरायला बोलावलं नाहीं. सर्व दिवस तिनं उपास केला. रात्रीं देवीची प्रार्थना केली. नंतर ती झोंपी गेली.
 
रात्रीं नावडतीला स्वप्न पडलं. एक सवाशीण स्वप्नांत आली, तिला पाहून नावडती रडूं लागली. ती नावडतीला म्हणाली, “मुली मुली, रडूं नको. घाबरूं नको. पटकन कशी उभी रहा. रडण्याचं कारण सांग.” नावडती म्हणाली, “घरांत आज बोडण भरलं. मला कांहीं बोलावलं नाहीं. म्हणुन मला अवघड वाटलं.” सवाष्णीनं बरं म्हटलं. नावडतीला उभी केलं. तिला सांगितलं, “उद्या तूं गोठ्यांत दहींदूध विरजून ठेव. एक खडा मांड. देवी म्हणून त्याची पूजा कर. तूं एकटीच बोडण भर. संध्याकाळीं गाईगुरांना खाऊं घाल.” इतकं सांगितलं. पुढं ती अदृश्य झाली.
 
नावडती पुढं जागी झाली. जवळपास पाहूं लागली, तों तिथं कोणी नाहीं. नावडती मनांत समजली. देवीनं मला दर्शन दिलं. पुन्हां ती तशीच निजली. सकाळीं उठली. सवाष्णीनं सांगितलं तसं दही दूध विरजून ठेवलं. दुसरे दिवशी पहाटेस उठली, अंग धुतलं. एक खडा घेतला. देवी म्हणून स्थापना केली. पान फूल वाहून पूजा केली. नंतर लांकडाची काथवट घेतली. विरजून ठेवलेलं दहीं दूध त्यांत घातलं. देवीची प्रार्थना केली. पुढं एकटीनं बोडनं भरलं. देवीला नैवेद्य दाखविला. घरांतून आलेलं उष्टमाष्टं जेवणं जेवलं. भरलेलं बोडण झांकून ठेवलं. दुपारी गुरांना घेऊन रानांत गेली.
 
इकडे काय मौज झाली. नावडतीचा सासरा गोठ्यांत आला, झाकलेलं काय आहे म्हणून पाहूं लागला तो लाकडाची काथवट सोन्याची झाली, आंत हिरेमाणकं दृष्टीस पडलीं. बाहेर उडालेल्या ठिपक्यांची मोत्ये झाली. तीं त्यानं आंत भरलीं. मनांत मोठं आश्चर्य केलं. नावडतीनं हीं कुठून आणली म्हणून त्याला काळजी पडली.
 
इतक्यांत तिथं नावडती आली. “मुली मुली” म्हणून तिला हांक मारली. काथवट तिच्यापुढं आणली. हिरे मोत्यें दाखविलीं. हीं तू कुठून आणलींस म्हणून विचारलं. नावडतीनं स्वप्न सांगितलं, त्याचप्रमाणं मीं बोडण भरलं. तें झाकून ठेवलं. त्याचं असं झालं. काय असेल तें पाहून घ्या.” म्हणून म्हणाली. सासरा मनांत ओशाळा झाला. नावडतीला घरांत घेतलं. पुढं तिच्यावर ममता करूं लागला.
 
तर अशी नावडतीला देवी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, सुफळ संपूर्ण.