रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (15:30 IST)

Shravan Somwar Katha कहाणी सोमवारची

somwarchi kahani
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला चार बायका होत्या. राजानं एकेकीला एकेक काम वाटून दिलं. पहिलीला दूधदुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं, चौथीला आपली सेवा करावयास सांगितली. अशी कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढं पुढं बायकाबायकांत भांडणं लागली. एक म्हणे, तूच का मुलांबाळांचं करावंसं? दुधदुभत्याचं का करुन नये? दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करु नये? तिसरी म्हणे, मीच का स्वयंपाकीण बाई व्हावे? अशी आपली चौघींची भांडणं लागली.
 
हे एके दिवशी राजाचे कानी गेलं. राजाचं मन उद्विग्न झालं. मुख चिंताक्रांत झालं. तसाच उठला. कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला, बसायला आसान दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं, चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं, राजानं सांगितलं. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. चारी राण्यांना एका ठायी हाक मारली, भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली, मीच का असं करावं? दुसरी म्हणाली, मीचा का असं करावं? अशी आपली चौघींनी कारणं सांगितली, राजा म्हणाला, मला आपली ह्यांना हीच कामं सांगाविशी वाटतात.
तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली. भांडणाचं कारण शोधून कांढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले, अगं अगं, तुला दुधदुभत्याचं काम सांगितलं आहे ना? ती म्हणाली, हो. तर मग ऐक आता. तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानांत नेहमी चरत असीस. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर दोन प्रहरी त्याजवर तूं दुधाच्या धारा धरीस, त्याजवर अभिषेक करीस, त्यामुळं तुला हा जन्म आला.
 
राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं, ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली. ती तू मान्य कर. नवराच मनी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग. म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील. अशा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं. सुखासमाधानानं वागू लागली.
 
पुढं काय झालं? ऋषी दुसर्‍या राणीकडे वळले. तिला विचारलं तू का गं भांडतेस? ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीण व्हावं? ह्याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं. कारण शोधून काढलं. ते म्हणाले, बाई बाई, आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरान्न मागत असीस. तेव्हा दर सोमवारी उपास करीस, भिक्षेला जास, पाचच घरी कोरान्न मागस, त्याचा स्वयंपाक करुन महादेवाला नैवेद्य दाखवीस. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं, ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल. अंती तुला कैलास लाभेल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली.
 
पुढं ऋषी तिसर्‍या राणीकडे वळाले. भांडणाचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस, स्वत: आपण उपास करीस, असा तुझा नेम असे. म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजानं ती तुला सांभाळायला लावली, ती तू आनंदाने सांभाळ, सुखानं वाग, ह्यातच तुझं कल्याण होईल, तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली.
 
पुढं काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचं कारण विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतील. आभाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली आणि छप्परपलंगावर बसविली. असं त्यानं तुला सुख दिलं. तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं, राजाला आनंदी केला व आपण निघून गेले. पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या, तशा तुम्ही वागा. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.