मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

आकाशात रंगणार अद्भुत सोहळा

... प्रा. डॉ. अविराज जत्राटकर
 
बुधवारी सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून एकाच वेळी 
अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना येत्या बुधवारी अवकाशात घडून येत आहे. माघ पोर्णिमा अर्थात ३१ जानेवारी २०१८ रोजी अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येईल. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सुमारे 3 लाख ५८ हजार किलोमिटर अंतरावर येईल त्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल. हा अवकाशीय सोहळा कोल्हापूर मधून उत्तम प्रकारे दिसू शकेल. महत्वाचे म्हणजे उघड्या डोळ्यांनी पण या घटनेचा आनंद लुटता येणार आहे. ३१ मार्च १८६६ नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल १५२ वर्षांनी असा योग जुळून येत आहे आणि आपणास या अवकाशीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्यही लाभणार आहे. हा सोहळा नागरिकांना तसेच विध्यार्थाना दुर्बिणीतून पाहता यावा  यासाठी राजाराम महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अविराज जत्राटकर व हौशी खगोलप्रेमी श्री. वसंत गुंडाळे यांच्या वतीने आर के नगर (खडीच्या गणपती समोरील टेकडी) कोल्हापूर येथे खास प्रयोजन केले आहे. याचा सर्व विध्यार्थ्यानी तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.
 
कधी पहाल?
बुधवारी ३१ तारखेला सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी चंद्रोदय होईल आणि चंद्र जवळपास ९० % ग्रासलेल्या स्थितीतच उगवेल. ६ वाजून ३० मिनिटांनी चंद्रबिंब पूर्णपणे ग्रासले जावून त्याचा रंग लालसर दिसेल. ही खग्रास स्थिती साधारण ७ वाजून २५ मिनिटा पर्यंत अनुभवता येईल. तिथून पुढे ग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल व ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण पूर्ण संपेल.
 
कुठे पहाल?
पूर्वेला चंद्र उगवताना.
 
कसे पहाल?
हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी सुद्धा पाहता येईल. 
 
सुपरमून म्हणजे काय?
चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लाख ८४ हजार किलोमिटर इतक्या अंतरावर असतो. पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो. ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते. अशा स्थितीत चंद्र नेहमी पेक्षा मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काही वेळा सुपरमून घडून येत असते. या पूर्वीचे सुपरमून याच महिन्यात १ तारखेला झाले होते.
 
ब्लुमून म्हणजे काय?
सर्व साधारणपणे एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते. ब्लुमून च्या वेळी चंद्र नेहमी सारखाच असतो, त्याचा रंग निळसर वगैरे असा काही नसतो.
 
ब्लड मून म्हणजे काय?
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते. अशा  वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे  विकीरण होते व बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो. यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारंगी दिसतो. चंद्राच्या या स्थितीला ब्लड मून असे म्हणतात. या नंतरचे खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून) २७ जुलै २०१८ रोजी होईल.
 
बुधवारी ३१ तारखेला या तीनही गोष्टी एकाच वेळी घडून येत आहेत. त्यामुळे या घटनेला खगोलशास्त्रीय दृष्ट्या विशेष असे महत्व आहे.