रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : सोमवार, 20 जुलै 2020 (14:17 IST)

"दिपज्योती नमोस्तूते"

आज दीप अमावस्या. अंधारातून प्रकाशाकडे पायवाट दाखवणारा प्रकाशपूंज. लहान असो वा मोठा मार्गात येणाऱ्या खाचा खळग्या मधून योग्य वाट दाखवण्यास सक्षम असतो. बोगद्याच्या अंधारात दूर दिसणारी प्रकाश किरण, मनात आशा, विश्वास आणि प्रेरणा देते अन् सांगते की मार्ग किती ही खडतर असला तरीही माझ्या दिशेने ये. इथे प्रकाश, ऊर्जा, सकारात्मकता आहे आणि हीच आशा कठीण मार्गावर चालण्यासाठी हिंमत देते. वाट जीवनाची असो वा यशाची आशा किरणांनी मनात उत्साह आणि चैतन्याचा संचार होतो.
 
सांध्यप्रकाशात शांतपणे देवघरात तेवणाऱ्या समईच्या उजेडात उजळणारं देवघर मनाला शांतता, मांगल्या, घराला घरपण आणि देवत्वाची चाहूल देते.
 
आजच्या ह्या कठीण काळात जीवनाचं अस्तित्व एका सूक्ष्म कणाने नाकारले आहे. भीती, नैराश्याने व्यापले आहे, पुढे काय? अशा ज्वलंत प्रश्नांनी मन ग्रासले आहे अशा विकट परिस्थितीमध्ये आशेची दीपज्योतच मार्ग दाखवणार आहे. 
 
"शुभंकरोती कल्याणमं" हे तेजोमय, दिपोमय, ईश्वरीशक्ती ने परीपूर्ण दिपज्योती प्रत्येकाच्या मनातले नैराश्याचं सावट दूर करून अलौकिक चैतन्याचा प्रकाश प्रदान कर हीच मनापासून प्रार्थना.
 
 सौ.स्वाती दांडेकर