बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 12 जानेवारी 2023 (09:26 IST)

गिरनार म्हणजेच गिरी नारायण

girnar datta temple
दत्त संप्रदायातील जवळपास प्रत्येकाचा असा अनुभव आहे की दर वेळेस गिरनार त्यांना नित्य नूतन भासतो, वेगळेच चैतन्य जाणवते. १०,००० पायऱ्या चढून जायच्या आहेत म्हणून बरेच नवखे भांबावून जातात, कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य असाच आहे. गिरनार खरोखरच प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहतो. पहिल्यांदा जाणारे भाविक "नंतर मी परत येणार नाही हो" असेच म्हणताना दिसतात. 
पण गिरनार हे असे अजब रसायन आहे की ते खरोखरच प्रत्येकाला भुरळ घालते. मग दत्तभक्त त्याच्या प्रेमातच पडतात. 
 
जर आपण गुजरात प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास केला तर बहुतांश प्रदेश हा सपाट आणि मैदानी आढळून येतो, मग जुनागढ लागले की गिरनारची भव्यता खरोखरच लक्ष वेधून घेते. बाकीचा सर्व प्रदेश मैदानी म्हणल्यावर मधेच एवढा मोठा पर्वत आला कुठून हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच. हे काम नक्कीच नैसर्गिक नाही तर एक दैवी रहस्य आहे हे जाणकार ओळखून आहेत. 
 
गिरनार पर्वत हा एका चिर निद्रेत झोपलेल्या साधूंसारखा भासेल, आणि जे महाराजांचे गुरूशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषाच्या कपाळावर मधोमध आहे. म्हणजेच आज्ञा चक्रावर आहे. 
 
थोडक्यात गिरनार ची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मूलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्र पर्यंत असा प्रवास होतो, असे मला वाटते. पहिल्या ७५०० पायऱ्या पर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो. 
खरे आहे कारण आपले कर्मबंध, इच्छा आकांक्षा, अतृप्त वासना मनुष्याला सारखे खाली खेचत असतात, कारण त्या मूलाधार चक्राशी संलग्न असतात, आता मूलाधार ते आज्ञाचक्र हा प्रवास काही सोपा आहे का? त्रास होणारच. सर्व विषय आणि विकारांचे दमन झाल्याशिवाय महाराज कसे भेटतील हो?
 
मग मनोधैर्य वाढविण्याचा एकच उपाय की दत्त महाराजांना पहिल्या पायरीवरच पूर्ण शरण जाणे, त्याशिवाय तरणोपाय नाही.अभिमान आणि अहंकार धरला तर महाराज सराईत गिर्यारोकांनासुद्धा ५०० पायऱ्या सुद्धा चढू देत नाहीत. आहे का नाही मजेदार अनुभूती !
 
गुरुशिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते, महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही. फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते, अश्रू दाटून येतात. कंठ सद्गदित होतो, अष्टभाव दाटून येतात. फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि हसरी मूर्ती दिसत राहते , तिथली प्रभावळच तशी आहे. ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात. उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात निलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळी सारख्या कोमल आणि तेजस्वी अश्या  दत्त महाराजांचे दर्शन होते. मग "दत्त दत्त ऐसें लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन , मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान" हे अगदी अनुभवास येते. म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो. सहस्त्रार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो.
 
अहो या समस्त ब्रह्मांडाचा नायक, मायबाप जिथे हजारो वर्षे तप करतो ती जागा सामान्य राहिल काय ? 
म्हणूनच तिथे बुद्धी कुंठीत होते. हे स्वाभाविक आहे. खूप जण प्रेमाने सांगतात की आमचा नमस्कार महाराजांना सांगा बर का !! पण खरे सांगू का तिथे गेल्यावर डोकं काम करायचे बंद होते, काहीच सुचत नाही. 
मग हजार पायऱ्या परत चढून आलो की एकदम लक्षात येते, अरे हे राहूनच गेले. मग तिथूनच महाराजांना निवेदन केले जाते. महाराजांना एकच विनंती, करुणा त्रिपदी मध्ये लिहिल्या प्रमाणे " तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता आणिता न दुजा त्राता." हे प्रभो आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणवेस अशी मी प्रार्थना करतो. 
 
साभार - सोशल मीडिया