शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

विवाहाच्या वाटेवर : सप्तपदी

घरात एकदा लग्न आहे म्हटलं की सारं घरच लग्नमय होऊन जातं. कार्यलय, विविध वस्तूंची खरेदी, पाहुणे सगळी नुसती कामांची यादी.. किती याद्या तयार केल्या तरी हे राहिलं ते राहिलं, असं होतंच नाही का?

विवाहाच्या बंधनातील ‘सप्तपदी’ हा विधी खूप महत्त्वाचा असतो. मला वाटतं जुन्या काळातल्या स्त्रिया लग्नाच्या वेळी वयाने लहान होत्या. शिक्षण जेमतेम झालेलं मग तिला जो उपदेश सप्तपदीतून दिला जात असे तो अर्थपूर्ण होताच. पण आपण आजच्या बदलत्या काळानुसार मुलीला सप्तपदीची नवी सूत्रं दिली तर ती तिला निश्चित उपयोगी पडतील असं वाटतं.

1) हे सौभाग्याकांक्षिणी! तू आता विद्यासंपन्न झाली आहेस. संगणकाचे ज्ञानही अवगत केले आहेस आणि सहजपणे तू तुझ्या नोकरीतही कौशल्यं प्राप्त केली आहेस. तुझ्या पायात सामर्थ्य आहे. पंखात भरारी घेण्याचं बळ आहे; पण आज तू दोन घराण्यांना तुझ्या सद्विचारांनी एकत्र बांधणार आहेस.

2) हे रमणी, तुझं हे दुसरं पाऊल आहे, त्या पावलावर तू पतीसमवेत सुंदर स्वप्न पूर्ण करणार आहेस. या पावलावर तुला सार्‍या घरात आनंद निर्माण करायचा आहे. तू आनंदी असशील तरच तुझं कुटुंब आनंदी होईल. त्यामुळे ‘आनंदी जीवन’ हे सूत्र लक्षात ठेव.

3) हे प्रज्ञावंत मुली, तू खूप शिकलीस आणि नोकरीही करतेस याचा अहंपणा करू नकोस. कुणास तुच्छ लेखू नकोस. माणसातलं माणूसपण जपत जपत सासु-सासर्‍यांवर आई-वडिलांसारखं प्रेम करण्याचं ठरवून तू तिकडं पाऊल उचलले आहेस.

4) हे विद्याश्री, तुला पतीची साथ आयुष्यभर हवी आहे असं मनोमन ठरवून चौथे पाऊल उचलणार आहेस. पतीच्या सोबत त्याच्या घरातील अनेकांशी तू नव्या नात्यांचा सुंदर गोफ बांधणार आहेस.

5) हे ललने, पाचवं पाऊल उचलताना तू हे लक्षात घे की घराचा ‘ताल’ आणि ‘तोल’ तुला छानपैकी सांभाळायंचा आहे. जेवढं प्रेम वाटेवरती देत जाशील त्याच्या दुप्पट प्रेमाने तुझी ओंजळ नक्की भरेल.

6) हे मानिनी, सहाव्या पावलाशी तू हे ठरवणार आहेस की ज्या योग्य, चांगल्या परंपरा, रीतिरिवाज आहेत ते तू पुढे नेणार आहेस. पण नवविचारांचे बदल घेऊन त्याची भर टाकणार आहेस. नव्या विचारांच्या दिशेने जाताना कुणी दुखावणार नाहीना म्हणून तू काळजी नक्कीच घेणार आहेस.

7) हे सृजनशालिनी, तू तुझ्या संसारवेलीवर काही दिवसांनी नवीन जीव निर्माण करणार आहेस. तो मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे. तुला समभावनेनं त्याचं थासांग पालन-पोषण करायचं आहे. या चिमुकल्या जिवाला नवीन जग दाखवाचं आहे हे लक्षात घे.

काय वाटतंय वाचून? आता नव्या युगातील विवाहाच्या वाटेवरच्या मुलींनी ते वाचून विचार करावा असं वाटतं. शेवटी रुखवतातील सप्तपदी महत्त्वाची आहे नाही का?